टॅटू काढणं ही आता सामान्य बाब झालेली आहे. पण, टॅटू काढण्यामागचं नेमकं कारण काय असतं… आवड हे एक उत्तर तर आहेच, पण यामागे अनुवांशिकता हेसुद्धा कारण असू शकतं का? याचं उत्तर युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न डेन्मार्कने केलेल्या एका अभ्यासातून समोर आलं आहे.
टॅटू काढणं हे आवडीनुसार किंवा व्यक्तीच्या कलावर अवलंबून नसून याला संगोपन कारणीभूत असल्याचे या अभ्यासातून दिसून आले आहे.

टॅटूचा इतिहास
टॅटू म्हणजे त्वचेवर शाई आणि काही विशिष्ट रंगद्रव्ये एकत्रित करून गोंदवले जाणारे एखादे चित्र किंवा नाव. रंगद्रव्याचे कण शरीराच्या त्वचेवरील मधल्या थरावर (डर्मिस) सुईच्या साह्याने अशाप्रकारे गोंदवले जातात की ते कायम त्वचेवर राहतात.
१९९१ मध्ये काही गिर्यारोहकांना उत्तर इटलीत ओत्झी नावाच्या एका माणसाचे अवशेष सापडले. त्याच्या शरीरावर टॅटू काढलेले होते. या अवशेषांच्या आधारे टॅटू काढण्याची पद्धत ही पाच हजार वर्षांपूर्वीची असल्याचे निदर्शनास आले.

स्मिथसोनियन मासिकानुसार, प्रत्यक्ष शरीरावर टॅटू काढण्याचे सर्वात जुने उदाहरण इजिप्शियन काळातले होते. सुमारे २००० वर्षांपूर्वीच्या काळातील अनेक मादी ममींवर ते आढळून आले होते. पण, १९९१ मध्ये ओत्झी या माणसाचे अवशेष सापडल्यावर ही पद्धत आणखी जुन्या काळातील असल्याचे स्पष्ट होते. कार्बन डेटिंग केल्यानंतर हे अवशेष सुमारे पाच हजार २०० वर्षांपूर्वीचे असल्याचे समजले.

केवळ पुरुषांच्याच नाही तर महिलांच्याही शरीरावर टॅटू काढले होते. सुमारे ४ हजार वर्षांपूर्वीच्या काळातील मूर्तींवर तसंच १२०० वर्षांपूर्वीच्या काळातील कबरीतल्या चित्रातील व्यक्तींच्या अंगावर टॅटू काढलेले होते. तसंच १३०० वर्षांपूर्वीच्या काळातही मूर्ती रूपातील सर्वांच्या पायांवर टॅटू काढलेले होते, अशी माहिती या मासिकात दिलेली आहे.

टॅटू काढण्याचा उद्देश
प्राचीन इजिप्तमध्ये टॅटू काढणे ही केवळ महिलांचीच प्रथा मानली जात असे. मादी ममींच्या टॅटूकडे उत्खनन करणाऱ्या पुरुषांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले, कारण ते उत्खननकर्ते त्यांच्याकडे संशयास्पदरीत्या पाहत आणि त्यांचे वर्णन काही प्रकरणांमध्ये नृत्य करणाऱ्या मुली असं केलं जात असे.

प्राचीन इजिप्तमध्ये याबाबत कोणतेही स्पष्ट लिखित पुरावे नाहीत. १९ व्या शतकातील इजिप्तमध्ये होत असल्याप्रमाणे, एखाद्या समुदायातील वृद्ध महिला या तरुण महिलांसाठी टॅटू बनवत असण्याची शक्यता असू शकते. आजही काही भागांत असे टॅटू काढले जातात.

टॅटू आणि जनुकांमध्ये काय संबंध आहे?
युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न डेन्मार्कच्या संशोधकांच्या मते, टॅटू काढणाऱ्या आणि न काढणाऱ्यांमध्ये कोणताही अनुवंशिक संबंध नाही. एकसारख्या दिसणाऱ्या जुळ्या व्यक्तींना मोनोझायगोटिक जुळे असं म्हणतात. एकसारख्या न दिसणाऱ्या जुळ्यांना डायझायगोटिक जुळे म्हणतात. मोनोझायगोटिक जुळे नेहमी एकाच जैविक वैशिष्ट्यांनुसार असतात, तर डायझायगोटिक जुळे एकसारखे किंवा वेगवेगळ्या जेंडरचे असू शकतात.

जर जुळ्या जोडीतील दोघांनीही टॅटू काढला असेल, तर त्यांना कॉन्कॉर्डंट म्हणजेच सुसंगत असे म्हटले जाते. जर त्या दोघांनीही टॅटू काढला नसेल तरीही त्यांना कॉन्कॉर्डंट हेच म्हटले जाते. जर दोन्हीपैकी एकाने टॅटू काढला असेल तर त्यांना डिसकॉन्कॉर्डंट म्हणजेच विसंगत म्हटले जाते, असे या अभ्यासात आढळले आहे.

संशोधकांना एकाच लिंगाच्या मोनोझायगोटिक जुळ्यांमध्ये जास्त सुसंगती असते की डायझायगोटिक जुळ्यांमध्ये याबाबतही जास्त उत्सुकता होती. यावरून असे दिसून येते की, टॅटू काढू इच्छिणाऱ्या व्यक्तींचा अनुवांशिक फरकांशी फारसा संबंध नाही.

२०२१ मध्ये दक्षिण कोरियातील सोल नॅशनल युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ मेडिसिनच्या संशोधकांनी BJOG जर्नलमध्ये २००१ ते २०१९ दरम्यान जन्मलेल्या तीन हजार ३८६ मोनोझायगोटिक आणि डायझायगोटिक जुळ्या जोड्यांमध्ये आढळलेल्या अनेक विविध जन्म दोषांसंदर्भात सुसंगता नोंदवली गेली होती.

टॅटूमुळे आरोग्याला होणारा धोका
टॅटूमुळे त्वचेचे संक्रमण, अ‍ॅलर्जी आणि डाग यांसारखे धोके उद्भवू शकतात. संशोधकांनी टॅटू आणि कर्करोग यांच्यातील संभाव्य दुव्याचा अभ्यास केला असता आतापर्यंत तरी टॅटू कर्करोगास कारणीभूत असल्याचे कोणतेही ठोस पुरावे मिळालेले नाहीत. तसंच याबाबत काहीतरी योगायोग असू शकतो, असा अंदाज संशोधकांचा आहे.
टॅटूसाठी वापरल्या जाणाऱ्या काही प्रकारच्या शाईंमध्ये अझो नावाचा एक घटक असतो, जो कारच्या पेंटमध्येही वापरला जातो. उंदरांवर केलेल्या एका प्रयोगात, टॅटूमध्ये वापरल्या जाणाऱ्या लाल शाईमुळे अझो रंगद्रव्यांच्या संपर्कात आल्याने यकृताच्या कर्करोगाचा धोका वाढतो असं एका संशोधनातून दिसून आले आहे.

काळी शाईसुद्धा जास्त धोकादायक असल्याचे मानले जाते. ऑस्ट्रेलियन सरकारच्या २०१६ च्या अहवालात असे आढळले होते की, चाचणी केलेल्या ८३ टक्के काळ्या शाईमध्ये पॉलिसायक्लिक अ‍ॅरोमॅटिक हायड्रोकार्बन्स नावाचा कर्करोगास कारणीभूत असलेला कार्सिनोजेनिक घटक असतो. टॅटू काढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सुयांचं निर्जंतुकीकरण न केल्यामुळे हेपेटायटिस-सी आणि एचआय़व्हीचा धोका होऊ शकतो. याव्यतिरिक्त डाग, त्वचेचे संक्रमण अशा तक्रारी उद्भवू शकतात.
त्वचेच्या काही संसर्गाप्रमाणेच अ‍ॅलर्जीसुद्धा एक विशिष्ट प्रकारची शाई वापरल्याने होते. जर तुम्हाला कोणत्याही अ‍ॅलर्जीचा त्रास वारंवार होत असेल किंवा तुमची त्वचा जास्त संवेदनशील असेल तर याचा धोका मोठ्या प्रमाणात आहे.

एपिडर्मिस, डर्मिस आणि हायपोडर्मिस असे तीन थर आपल्या त्वचेवर असतात. टॅटू काढण्याच्या प्रक्रियेत त्वचेच्या मधल्या (डर्मिस) थरावर खोलवर एक जखम केली जाते. नवीन टॅटू काढताना झालेली जखम बरी होईपर्यंत प्रचंड काळजी घ्यावी लागते.
टॅटू काढण्याआधी टॅटू आर्टिस्ट परवानाधारक आहे की नाही हे पाहणे गरजेचे आहे. तसंच ते स्वच्छतेचे सर्व नियम पाळतात की नाही हेही पहावे. महत्त्वाचं म्हणजे टॅटू काढली जाणारी सुई प्रत्येक माणसागणिक नवीन वापरली जाते याची खात्री करून घ्यावी.