-भक्ती बिसुरे
झोप आणि चांगले आरोग्य यांचा अत्यंत जवळचा संबंध आहे, हे आपण जाणतोच. किमान सात ते आठ तास झोप ही निरामय आरोग्यासाठी आवश्यकच, असे तज्ज्ञ सांगतात. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीही त्याबाबत आग्रही असतात. मात्र, ज्यांची झोप मुळातच कमी असते किंवा ज्यांना झोपेच्या तक्रारी असतात, त्यांना किमान सात ते आठ तास झोप आवश्यक हा आग्रह काहीसा भीतिदायकच ठरतो. आपली झोप पूर्ण होत नाही याचाही तणाव त्यांना येणे शक्य आहे. मात्र, काही व्यक्तींना कमी झोपही पुरेशी ठरते, याचे कारण त्यांच्या गुणसूत्रांमध्ये म्हणजे डीएनएमध्ये झालेले बदल हे होय. ‘सायंटिफिक अमेरिकन’ या नियतकालिकाने याबाबत शोधनिबंध प्रकाशित केला आहे. गुणसूत्रे आणि कमी झोप यांचा परस्पर संबंध यांबाबत हे विश्लेषण.
संशोधन का आणि कसे?
एक व्यक्ती आणि तिचा मुलगा अशा दोघांना खूप कमी झोप घेतली तरी ते पुरेसे ठरते. त्यांच्या आरोग्यावर, स्मरणशक्तीवर आणि चलनवलनावर त्याचा कोणताही परिणाम होत नाही, उलट इतर काही माणसांपेक्षा ते अधिक कार्यक्षमच आहेत, हे लक्षात आल्यानंतर अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांनी या पितापुत्रांच्या गुणसूत्रांचा अभ्यास केला असता, त्यात काही आनुवांशिक उत्परिवर्तन असल्याचे दिसून आले. संशोधकांनी त्यांच्या गुणसूत्रांमध्ये दिसलेला बदल जाणीवपूर्वक काही उंदरांमध्ये केला असता त्यांच्या झोपेचे प्रमाणही कमी झाल्याचे निरीक्षण संशोधकांनी नोंदवले. शिवाय झोप कमी झाल्याचे कोणतेही दुष्परिणाम उंदरांमध्येही दिसले नाहीत. या पिता-पुत्रांची झोप अत्यंत दर्जेदार आहे. मानवाला झोप पूर्ण झाली, विश्रांती मिळाल्याची भावना निर्माण होण्यास सात ते आठ तास लागत असल्यास यांना मात्र चार किंवा सहा तासांची झोपही पुरेशी ठरते. त्यामुळेच आरोग्यावर दुष्परिणाम न करणारी कमी झोपही पुरेशी ठरण्यासाठी उपयुक्त औषधांबाबतची कल्पनाही शास्त्रज्ञांना खुणावू लागली आहे.
शास्त्रज्ञांच्या कल्पना काय?
हार्वर्ड मेडिकल स्कूलचे पॅट्रिक फ्यूलर म्हणतात, की गुणसूत्रांमधील बदलांमुळे कमी झोपही पुरेशी आणि आरोग्यदायी ठरणे हे आश्चर्यकारक आहे. यावरून एखाद्या औषधाची कल्पना सुचते. कमी झोप पुरेशी ठरणाऱ्या पिता-पुत्रांच्या शरीरातील जनुकीय लाभ प्रदान करणारे औषध घ्या आणि कमी झोपूनही आरोग्यदायी जीवन जगा. असे झाले तर अनेकांना ते आवडेल, मात्र प्रत्यक्षात तशी शक्यता नाही. आपण का झोपतो या मेंदुविज्ञानाच्या जगातील सर्वात मोठ्या रहस्याची उकल करण्याच्या दिशेने त्यामुळे महत्त्वाचे पाऊल टाकले जाईल, असेही फ्यूलर म्हणतात. मात्र त्याच वेळी अशी कल्पना ही केवळ कल्पना म्हणूनच ठीक आहे, असा इशाराही काही संशोधक देतात.
धोक्याचा इशारा काय?
कमीत कमी झोप पुरेशी ठरवणारे औषध ही कल्पना रंजक असली तरी प्रत्यक्षात तसे काही घडणे मानवी आरोग्य आणि समाजाच्या आरोग्याच्या दृष्टीने हिताचे नसल्याचा स्पष्ट इशारा मानसिक आरोग्याच्या क्षेत्रातील कार्यरत तज्ज्ञ देतात. स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या मानसोपचार आणि वर्तन विज्ञान विभागाच्या जेमी झीत्झर म्हणतात, की कोणत्याही दुष्परिणामांसह (साईड इफेक्ट्स) असे औषध तयार झाले तरी ते अजिबात योग्य नाही. असे औषध घेण्यास भाग पाडले जाणे, ते घेण्यासाठी दबाव आणणे आणि अधिक काम करून घेणे हे घडणे शक्य आहे. झोप कदाचित आवश्यक नसेल, मात्र विश्रांती अत्यावश्यक आहे, याकडे झीत्झर सर्वांचेच लक्ष वेधतात. झोपेला पर्याय म्हणून औषध विकसित करण्यात ऊर्जा खर्च करण्यापेक्षा कर्करोग, अल्झायमर, उच्चरक्तदाब अशा आजारांना प्रतिबंध करणारी निरोगी झोप माणसाला मिळेल याबाबतच्या प्रयत्नांची अधिक गरज असल्याचे मेंदुविकार शास्त्रातील काही प्राध्यापक अधोरेखित करतात.
समान जनुकांच्या व्यक्तींची लक्षणेही समान…
मेंदुविकार शास्त्राच्या प्राध्यापक यिंग हुई फू यांच्या निरीक्षणांनुसार, अमेरिकेतील पिता-पुत्रांप्रमाणेच जनुकीय बदल असलेल्या व्यक्तींमध्येही कमी झोप पुरेशी आणि आरोग्यदायी असण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. इतर सर्व व्यक्तींप्रमाणेच कमी झोप पुरेशी ठरणाऱ्या व्यक्तीही सारख्याच सक्रिय, आनंदी, कार्यक्षम असतात. त्यांना सतत व्यग्र राहणे आवडते, वेळ वाया घालवणे त्यांना जमत नाही. बहुतेक सर्वच माणसे त्यांच्या शरीराच्या गरजेपेक्षा कमी झोपत असतील तर झोपेच्या कमतरतेमुळे कार्यक्षमता, स्मरणशक्ती, वर्तन यांमध्ये बदल दिसतात. आठवडाभर कमी झोप आणि आठवड्याच्या सुट्टीत ती झोप भरून काढणे आरोग्यदायी आहे, असे काही जण समजतात, मात्र प्रत्यक्षात तसे नाही. कमी झोप आणि कार्यक्षमतेवरील परिणाम यांचा परस्पर संबंध प्रत्येक व्यक्तीबाबत वेगळा असू शकतो. त्याबाबत चाचण्या करून झोपेची गुणवत्ता सुधारण्याचा निर्णय आणि उपाय प्रत्येक व्यत्तीने करण्याची गरज असल्याचे फू यानिमित्ताने नोंदवतात.