Elephanta Caves UNESCO World Heritage Site: गेल्याच आठवड्यात बुधवारी (१८ डिसेंबर रोजी) मुंबईहून घारापुरीकडे जाणाऱ्या बोटीला भारतीय नौदलाच्या स्पीडबोटीने धडक दिली आणि अपघात झाला. या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला तर अनेक जखमी झाले. त्याच निमित्ताने पर्यटक बोटींची सुरक्षा, स्पीडबोटींचा स्वैरसंचार, अलिबाग-घारापुरीसाठी सुरक्षित जलमार्ग, अलिबाग-रायगड-घारापुरीचे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून असलेले महत्त्व यावर सर्वत्र चर्चा सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर घारापुरीचा २००० वर्षांहून प्राचीन इतिहास नेमकं काय सांगतो आणि दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक या स्थळाला भेट का देतात; याचा घेतलेला हा आढावा!

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

श्री ते जागतिक वारसा स्थळ

मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी असली तरी भर समुद्रात फेसाळणाऱ्या लाटांचा सामना करणाऱ्या जगप्रसिद्ध घारापुरी (एलिफंटा) बेटाने कधी काळी श्रीपुरी, लक्ष्मी पुरी होण्याचा मान मिळवला होता. श्री किंवा लक्ष्मी ही नावं समृद्धीवाचक आहेत. त्यामुळेच या बेटाचे तत्कालीन आर्थिक महत्त्व वेगळे सांगायला नको. काळ्या खडकात कोरलेल्या या अद्वितीय लेणींमुळे या बेटाला जागतिक ओळख प्राप्त झाली आहे. या बेटाची स्थानिक ओळख घारापुरी अशी आहे. निळ्याशार सागराच्या पाण्यात आंबा, चिंच, नारळ आणि पोफळीच्या झाडांनी डवरलेल्या या बेटाच्या सौंदर्यात या ठिकाणी असलेल्या प्राचीन अवशेषांनी भर घातली आहे.

Martin, R. Montgomery (1858) The Indian Empire. Volume 3. London Printing and Publishing Company.

अधिक वाचा: युनेस्को: जागतिक वारसा यादीत ‘या’ हिंदू मंदिरांचा समावेश… का महत्त्वाची आहेत ही मंदिरे ?

जागतिक वारशाचा मान

इतिहास, संस्कृती आणि निसर्ग असा आगळा मिलाफ या बेटावर घडून आलेला आहे. यामुळेच बेटावरील लेणींना १९८१ साली UNESCO ने ‘जागतिक वारसा स्थळ’ म्हणून घोषित केले. एलिफंटा बेट हे अपोलो बंदरापासून ७ मैल (११ किमी) पूर्वेला आणि ट्रॉम्बेपासून ६ मैल (९.७ किमी) दक्षिणेला स्थित आहे. हे छोटेसे बेट दोन टेकड्यांनी तयार झालेले असून एका अरुंद दरीने विभागले आहे. या टेकड्या सुमारे ५०० फूट (१५० मीटर) उंच आहेत. बेटाच्या मध्यभागातून एक खोल दरी उत्तर ते दक्षिण दिशेने पसरलेली आहे. पश्चिमेकडील टेकडी स्तूप टेकडी म्हणून ओळखली जाते.

एलिफंटा नावामागची कथा

घारापुरी बेटांना एलिफंटा हे नाव पोर्तुगीजांनी दिले आहे. पूर्वी हत्तीचे शिल्प या बेटाच्या मुख्य प्रवेशापाशी होतं. पोर्तुगीजांनी दगडात कोरलेला हा मोठा हत्ती बोटीवरून मुंबईला आणला. सध्या हा दगडी हत्ती भायखळ्याच्या जिजामाता उद्यानासमोर उभा आहे. तर दुसरा हत्ती मुंबईला आणत असताना बोट बुडाल्याने सागरतळाशी गेला, असे मानले जाते.

शैव व बौद्ध तत्त्वज्ञानाचे अस्तित्त्व

भारताच्या इतिहासात सर्वात जास्त मानव निर्मित लेणी ही महाराष्ट्रात आढळतात. असे असले तरी त्या सर्व लेणींमध्ये घारापुरी लेणींचे महत्त्व विशेष आहे. कारण इतर सर्व लेणी ही सह्याद्री पर्वतरांगा किंवा किनारी भागात आढळतात. तर घारापुरीची लेणी बेटावर भर समुद्रात आहेत. या बेटावर आढळणारी लेणी या शैव आणि बौद्ध दोन तत्त्वज्ञानांना समर्पित आहेत. इसवी सनाच्या पाचव्या ते आठव्या शतकादरम्यात ही लेणी उत्कीर्ण करण्यात आल्याचे मानले जाते (अभ्यासकांमध्ये कालगणनेविषयी मतैक्य नाही). या लेणीमध्ये पूर्वी चित्रकलेचे पुरावे होते. परंतु, हवामानातील बदल आणि मानवी हस्तक्षेप यामुळे सर्व लेणींमधील चित्रं- रंग नष्ट झाले आहेत.

लेणींचा इतिहास

ही लेणी कोणी खोदली, यासंबंधी निश्चित माहिती उपलब्ध नाही. शिवाय तत्संबंधी एकही लिखित पुरावा वा लेख उपलब्ध नाही. १५३४ साली हे बेट पोर्तुगीजांच्या ताब्यात गेले. पोर्तुगीजांना या स्थळावर मोठा शिलालेख सापडला होता. डिओगो डी कौटो (१६ व्या शतकातील पोर्तुगीज इतिहासकार आणि लेखक) याने त्याच्या नोंदीत म्हटले आहे की, “जेव्हा पोर्तुगीजांनी वसई आणि त्याच्या आजूबाजूचा भाग ताब्यात घेतला तेव्हा त्यांनी या मंदिराच्या प्रवेशद्वारावर असलेला प्रसिद्ध शिलालेख काढून टाकला आणि तो पोर्तुगीज राजाकडे पाठवला. परंतु, तो शिलालेख वाचण्यास सक्षम असा हिंदू किंवा मुसलमान कोणीच सापडला नाही. नंतर राजा डॉम लाओ-तिसरा (Dom João III) यानेही या शिलालेखाच्या भाषांतरासाठी प्रयत्न केले पण त्यात यश आले नाही.”

कालखंडाविषयी वाद

या लेणींचा कालखंड सांगणारा एकही शिलालेख उपलब्ध नसल्यामुळे एलिफंटा लेणींच्या कालखंडाचा अंदाज उपलब्ध पुरातत्त्वीय अवशेष आणि लेणीच्या कला आणि स्थापत्य शैलीवरून केला जातो. जेम्स बर्गेस, जेम्स फर्ग्युसन, स्टेला क्रॅम्रीश आणि हिरानंद शास्त्री यांनी या लेणींची कालमर्यादा ५व्या ते ८व्या शतकादरम्यान असल्याचे मानले आहे, परंतु त्यांनी या कालखंडाचे समर्थन केलेले नाही. डॉ. मीराशी, डॉ. वॉल्टर स्पिंक आणि डॉ. वाय. आर. गुप्ते यांनी या लेणीच्या कालखंडावर सविस्तर चर्चा केली आहे. डॉ. गुप्ते यांनी या लेणींना मौर्य वंशाशी जोडले आहे, तर डॉ. मीराशी यांनी त्यांचा संबंध कलचुरी राजवटीशी जोडला आहे. डॉ. वॉल्टर स्पिंक यांनी आपल्या ‘द ग्रेट केव्ह अॅट एलिफंटा’ या पुस्तकात या लेणींचा संबंध कलचुरी राजवंशाशी जोडला आहे. त्यांच्या मते, या लेणी कलचुरी राजांच्या काळातील (६व्या शतकातील) आहेत. डॉ. रमेश गुप्ते यांनी डॉ. मीराशी आणि डॉ. स्पिंक यांच्या मताला विरोध करत या लेणींवर चालुक्यांचा प्रभाव असल्याचे ठामपणे सांगितले आहे. चालुक्य शैलीतील शिल्पांमध्ये मण्ययज्ञोपवीत (मोत्यांनी मढवलेले पवित्र जानवे) आणि अन्य वैशिष्ट्ये आढळतात, जी एलिफंटा लेणींतील शिल्पांमध्ये दिसून येतात असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे ही लेणी नेमकी कोणत्या राजवंशाच्या कालखंडात खोदली गेली याविषयी अभ्यासकांमध्ये एकवाक्यता नाही.

पोर्तुगीजांचा प्रभाव

पोर्तुगीजांच्या काळात या लेणींची प्रचंड नासधूस करण्यात आली. पोर्तुगीजांनी महत्त्वाचा शिलालेख काढून टाकला आणि शिल्पांना लक्ष्य करून नेमबाजीच्या सरावासाठी त्यांचा वापर केला, त्यामुळे अनेक शिल्पे तुटलेल्या अवस्थेत दिसतात. पोर्तुगीजांनी १६६१ साली हे बेट इंग्रजांच्या ताब्यात दिले. त्यानंतरच या लेणींचे होणारे नुकसान थांबले.

अधिक वाचा: Ukrainian egg: युनेस्कोच्या वारसा यादीत प्राचीन युक्रेनियन अंड्याला स्थान !

मुख्य शैव लेणी

या बेटावरील मुख्य लेणी ही शिवाला समर्पित करण्यात आलेली आहे. मुख्य लेणी ३८.४० मीटर खोल आणि ३७.८० मीटर रुंद आहे. ओळीने रचलेल्या स्तंभांमुळे सभागृह कॉरिडॉरमध्ये विभागले गेले आहे. या सभागृहाच्या छताला आधार देण्यासाठी २४ स्तंभ आहेत. लेणीच्या मागील टोकाला प्रसिद्ध त्रिमुखी महेशमूर्ती आहे. या मूर्तीतील अघोर-भैरव, तत्पुरुष महादेव आणि वामदेव यांचे भिन्न भाव स्पष्ट दिसतात. तर मंडपात सर्वोतोभद्र शिवालय आहे. या शिवाय लेणीमध्ये आढळणारी अर्धनारीश्वर, गंगावतरण, शिवपार्वती विवाह, अंधकासूरवधमूर्ती, उमामहेश्वर, तांडवनृत्य, रावणानुग्रह इ. शिल्पे प्रमाणबद्धता, भावरेखाटन या दृष्टींनी विशेष उल्लेखनीय आहेत.

दोन हजार वर्षांचा इतिहास

घारापुरीतील इतर काही शिल्पं सध्या मुंबईच्या छत्रपती शिवाजी वस्तू संग्रहालयात ठेवण्यात आली आहेत. त्यामध्ये चतुर्मुख ब्रह्मदेवाची मूर्ती विशेष उल्लेखनीय आहे. ही मूर्ती शांत मुद्रा आणि प्रमाणबद्धतेसाठी ओळखली जाते. इतर शिल्पांमध्ये नटराजाची कबंधमूर्तीआणि महिषासुरमर्दिनीची मूर्ती यांचा उल्लेख आवर्जून करावा लागतो. शैव लेणीशिवाय बौद्ध लेणीही या बेटावर आढळतात. लेणीशिवाय इतरही काही पुरातत्त्वीय अवशेष येथे सापडले आहेत.जे प्राचीन व्यापाराविषयी मुबलक माहिती पुरवतात. शिवाय स्तूप टेकडीवरील इ. सनपूर्व दुसऱ्या शतकातील विटांच्या स्तूपांचे अवशेष या बेटाचा इतिहास तब्बल २००० वर्षांहून मागे घेऊन जातात.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why do thousands of tourists visit the elephanta caves gharapuri leni every day svs