अमोल परांजपे
पाकिस्तानच्या ग्वादार बंदरावर बुधवारी अतिरेकी हल्ला झाला. यात आठ बलोच हल्लेखोर आणि दोन सुरक्षारक्षक मारले गेले. ग्वादार हे पाकिस्तानच्या व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचे बंदर असलेल्या बलुचिस्तान प्रांताला बंडखोरीचा मोठा इतिहास आहे. पाकिस्तानातील सत्ताधाऱ्यांवर असलेल्या या नाराजीची नाळ भारत-पाकिस्तान फाळणीशीही जोडली गेली आहे.
ग्वादार बंदरावर हल्ला का झाला?
बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह या मोहिमेंतर्गत पाकिस्तानातील हे बंदर चीनकडून विकसित करण्यात येत आहे. त्यामुळे या भागात चिनी अधिकारी, अभियंत्यांची मोठी संख्या आहे. आपल्या प्रदेशातील चीनच्या या हस्तक्षेपाला बलुचिस्तानमधील स्थानिक संघटनांचा विरोध आहे. यातील बहुतेक संघटना या सशस्त्र दहशतवादी आहेत. बुधवारी ‘बलुचिस्तान लिबरेशन आर्मी’ या संघटनेने ग्वादार बंदराला लक्ष्य केले. यावेळी झालेल्या चकमकीत आठ दहशतवादी मारले गेले आणि पाकिस्तानी सत्ताधाऱ्यांनी अतिरेकी हल्ला परतवून लावल्याचे सांगत स्वतःची पाठ थोपटून घेतली. बलुचिस्तान भागात केवळ बलोच संघटनाच नव्हे, तर तहरिक इ तालिबान पाकिस्तान ही बंदी घालण्यात आलेली अतिरेकी संघटनाही सक्रिय आहे. मात्र चिनी आस्थापनांवर हल्ले करणे ही बलोच संघटनांचीच कार्यशैली राहिली आहे.
हेही वाचा >>>युद्धनौका, ड्रोन, हवाई दलाचे विमान आणि मरीन कमांडोज… भारतीय नौदलाने सोमाली चाच्यांना ४० तासांत असे आणले वठणीवर!
हल्लेखोर संघटना कोणती आहे?
बलुचिस्तान लिबरेशन आर्मीमधील ‘मजीद ब्रिगेड’ या गटाने ग्वादार बंदरावरील हल्ल्याची जबाबदारी स्वाकारली आहे. पाकिस्तानी सुरक्षा दले आणि चिनी आस्थापना, अधिकाऱ्यांवर आत्मघातकी हल्ले करण्यासाठी २०११ साली उदयास आलेली ही माजिद ब्रिगेड कुप्रसिद्ध आहे. माजी पंतप्रधान झुल्फिकार अली भुत्तो यांच्या एका सुरक्षारक्षकाचे नाव या गटाने धारण केले आहे. ७०च्या दशकात भुत्तो यांनी बलुचिस्तानातील बंडखोरांवर कठोर कारवाई सुरू केल्यानंतर या माजिदने त्यांच्या हत्येचा अयशस्वी प्रयत्न केला व तो त्यात मारला गेला. इराण आणि अफगाणिस्तानला सीमा लागून असल्यामुळे या दोन देशांतील अतिरेकी संघटनाही बलुचिस्तानमार्गे पाकिस्तानात घुसून कारवाया करत असतात.
बलुचिस्तानचा पाकिस्तानमध्ये बळजबरीने समावेश?
भारतातून इंग्रज निघून जात असताना देशाची फाळणी झाली. त्यावेळी बलुचिस्तान प्रांतातील मकरान, लास बेला, खारान आणि कलात या चार मुख्य प्रदेशांमध्ये तेथील मूलवासी राजांची सत्ता होती. या प्रमुखांची निष्ठा ब्रिटनच्या गादीला वाहिली गेली होती. यातील कलातचे सरदार सर्वात ताकदवान होते व अन्य प्रदेश त्यांचे मंडलिक असल्याप्रमाणे होते. स्वातंत्र्यावेळी कलातचे अखेरचे ‘खान’ अहमद यार खान यांनी स्वतंत्र बलोच राष्ट्राची जाहीरपणे मागणी केली. पाकिस्तानचे निर्माते मोहम्मद अली जिना यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध असल्याने आपली ही मागणी मान्य होईल, याची खान यांना खात्री होती व ती एका अर्थी मान्यही झाली होती. कारण ११ ऑगस्ट १९४७ रोजी तत्कालिन पाकिस्तान सरकारने बलुचिस्तानबरोबर ‘मैत्रीचा करार’ केला होता. याचा अर्थ बलुचिस्तानचे स्वतंत्र अस्तित्व पाकिस्तानने मान्य केले होते. मात्र रशियाचा प्रभाव वाढण्याच्या भीतीने ब्रिटनचा स्वतंत्र बलुचिस्तानला विरोध होता. त्यातच कलातला बाजूला सारून अन्य तीन प्रदेशांच्या सुल्तानांनी पाकिस्तानात सामील व्हायचा निर्णय घेतला. त्यामुळे कलातच्या चारही बाजूंना पाकिस्तान असा नकाशा तयार झाला असता. या पार्श्वभूमीवर ऑक्टोबर १९४७मध्ये पाकिस्तानी राज्यकर्त्यांचा सूर बदलला व बलुचिस्तानच्या विलिनीकरणासाठी प्रयत्न सुरू झाले. त्यातच खान यांना भारतात विलीन व्हायचे असल्याची अफवा ऑल इंडिया रेडियोच्या हवाल्याने पसरविली गेली. परिणामी २६ मार्च १९४८मध्ये पाकिस्तानने बलुचिस्तानमध्ये सैन्य घुसवले व दुसऱ्या दिवशी त्या प्रांताचे पाकिस्तानात विलिनीकरण करण्यात आले.
हेही वाचा >>>लोकसभा निवडणुकीत राजकीय पक्षांचे नवे शस्त्र ‘AI’
बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास काय?
विलिनीकरणाच्या कराराची शाई वाळण्यापूर्वीच बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानविरोधी वारे वाहू लागले. जुलै १९४८मध्ये खान यांचा भाऊ, राजपुत्र अब्दुल करीम यांनी कराराविरोधात बंड पुकारले. त्यानंतर १९५८-५९, १९६२-६३ व १९७३ ते १९७७ या कालखंडात वेगवेगळ्या स्वातंत्रलढाया झाल्या. २००३पासून सुरू झालेला सशस्त्र विरोध आजतागायत सुरू आहे. याकाळात पाकिस्तानी सैन्याने अत्यंत क्रूर पद्धतीने बंड दडपण्याचा अनेकदा प्रयत्न केला. अनन्वित अत्याचार, मनमानी अटकसत्रे, छळ, खटले न चालवताच फाशी देणे अशा बातम्या येऊ लागल्या. २०११ साली अम्नेस्टी इंटरनॅशनल या आंतरराष्ट्रीय सामाजिक संघटनेच्या अहवालानुसार येथे पाकिस्तानचे ‘किल अँड डंप’ धोरण आहे. यात अनेकदा गणवेशधारी सैनिक केवळ संशयावरून कार्यकर्ते, शिक्षक, पत्रकार, वकील यांना ताब्यात घेतात. त्यांचा छळ केला जातो व नंतर गोळ्या घालून मृतदेह फेकून दिले जातात. मुळातच पाकिस्तानची निर्मिती धर्माच्या आधारावर झाली असली, तरी तेथील विविध मुस्लिम पंथांचे एकमेकांशी वाकडे आहे. बलोच हे सिंधी किंवा पंजाबी मुस्लिमांपेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा प्रांत असलेला बलुचिस्तान नैसर्गिक साधनसंपत्तीनेही संपन्न आहे. सिंधी-पंजाबी राज्यकर्ते आपल्या प्रांताचे केवळ शोषण करतात, अशी बलोच नागरिकांची भावना अवास्तव नाही. कारण पाकिस्तानातील सर्वात गरीब आणि तुरळक वस्त्या असलेला प्रांतही हाच आहे.
amol.paranjpe@expressindia.com