चिन्मय पाटणकर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते फेब्रुवारी या कालावधीत देशाच्या सोन्याची आयात ७३ टक्के अर्थात ४५.१ अब्ज डॉलर्सनी वाढ झाली आहे. अर्थव्यवस्था आणि सोन्याचा निकटचा संबंध आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचा परिणाम सोन्याच्या मागणीवर आणि सोन्याच्या दरांवरही झाला आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीच्या या पार्श्वभूमीवर एप्रिल ते फेब्रुवारी या कालावधीत सोन्याच्या आयातीमध्ये झालेल्या वाढीचे कारण समजून घेणे आवश्यक ठरते.

भारतात सोन्याला महत्त्व का?

भारतीय संस्कृतीमध्ये सोने आणि दागिन्यांना फार महत्त्व आहे. तसेच सोन्या-चांदीच्या दागिन्यांबरोबरच मौल्यवान खड्यांनाही मोठ्या प्रमाणात पसंती दिली जाते. सोन्याचे दागिने भेट म्हणून देण्याचीही प्रथा आहे. तसेच सोन्याकडे दीर्घकालीन गुंतवणूक म्हणूनही पाहिले जात असल्याने सर्वसामान्यांकडून वेगवेगळ्या मुहूर्तांवर सोने खरेदी केली जाते. जागतिक पातळीवर सोन्याची सर्वाधिक आयात करणाऱ्या देशांमध्ये चीन आघाडीवर आहे. त्याखालोखाल भारत दुसऱ्या स्थानी आहे. सोन्याची आयात करून प्रामुख्याने देशातील दागिने उद्योगाची गरज भागवली जाते. सोन्याच्या दागिन्यांच्या निर्यातीसाठी मोठ्या प्रमाणात सोन्याची गरज असते. ती सोने आयात करून भागवली जाते. सोन्याच्या दागिन्यांच्या निर्यातीमध्ये भारत अग्रगण्य देशांपैकी एक आहे.

सोन्याची आयात वाढली कशी?

मार्च २०२०मध्ये करोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यावर देशातील सोन्याच्या मागणीमध्ये घट झाली होती. करोनामुळे जगभरातील देशांमध्ये निर्बंध लागू करण्यात आल्याचा परिणाम सोन्याच्या आयातीवरही झाला होता. त्यामुळे सोन्याच्या पुरवठ्यामध्येही घट झाली होती. २०१९-२०मध्ये सोन्याची आयात ४३० टनांपर्यंत घटली होती. मात्र करोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्यावर सोन्याच्या मागणीत एकाएकी वाढ झाल्याचे चित्र आहे.

विश्लेषण : अमेरिकेनं व्याजदर वाढवल्याचा भारतीय शेअर बाजारावर, RBI पॉलिसीवर काय परिणाम होणार?

कोणत्या देशातून सर्वाधिक आयात?

२०२१-२२ या वर्षातील एप्रिल ते फेब्रुवारी या कालावधीत देशाची सोन्याची दर महिन्याची सरासरी आयात ७६.५७ टन होती. तर एप्रिल ते फेब्रुवारी या कालावधीतील एकूण आयात ८४२ टन इतकी होती. ही आयात २०१८-१९ आणि २०१९-२० या दोन वर्षांतील दरमहा सरासरी आयातीइतकीच झाली. यापूर्वी २०१५मध्ये १ हजार ४७ टन आणि २०१७मध्ये १ हजार ३२ टन सोन्याची आयात झाली होती. भारताने ज्या देशांकडून सोन्याची आयात केली, त्यात सर्वाधिक वाटा स्वित्झर्लंडचा (४६९.६६ टन) आहे. त्यानंतर संयुक्त अरब अमिराती (१२०.१६ टन), दक्षिण आफ्रिका (७१.६८ टन) आणि गिनी (५८.७२ टन) या देशांचा क्रमांक लागतो.

सोने आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचा संबंध काय?

सोने आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचा जवळचा संबंध आहे. कारण सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या सात टक्के वाटा मौल्यवान खडे आणि दागिने उद्योगाचा आहे. तसेच देशाच्या निर्यातीमधील जवळपास १५ टक्के वाटा याच उद्योग क्षेत्राचा आहे. या क्षेत्रातून रोजगार निर्मितीही होत असल्याने या क्षेत्राचे महत्त्व मोठे मानले जाते. देशात जवळपास दीड हजार टन सोन्याचे उत्पादन होते. त्यापैकी सर्वाधिक उत्पादन कर्नाटकमध्ये होते.

विश्लेषण : रशिया सवलतीच्या दरात तेल का विकत आहे?

मागणी वाढल्याने आयातीमध्ये वाढ?

पीएनजी अँड सन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित मोडक सांगतात, की करोना काळात असलेल्या निर्बंधांमुळे लग्नसराईवेळी होणारा दागिन्यांवरील खर्च, पर्यटन, मनोरंजन आदींवरील खर्च कमी झाला. तर करोना महासाथीनंतरच्या काळात लोकांचा फॅशन आणि लाइफस्टाइल उत्पादनांकडे असलेला कल कमी झाला. परिणामी लोकांकडून १० ते १५ हजार रुपयांचे दागिने किंवा सोने खरेदी करून गुंतवणूक करण्यात येऊ लागली. त्यामुळे सोन्याची मागणी जवळपास ४० टक्क्यांनी वाढली. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध सुरू झाल्यानंतर सोन्याचे भाव दहा दिवसांत १९२० डॉलर प्रति औंसवरून वाढत जाऊन २०७० डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचली. भारतीय बाजारात ५१ हजार रुपये प्रति दहा ग्रॅमवरून ५४५०० रुपये प्रति दहा ग्रॅम झाली. अमेरिकेने घातलेल्या निर्बंधांमुळे रशियाला डॉलर्समध्ये व्यवहार करता येत नसल्याने त्यांनी सोन्याचा चलनासारखा वापर सुरू केला. त्यामुळे रशियाकडून सोन्याच्या मागणीत वाढ झाली. तसेच युद्धामुळे भूराजकीय अस्थिरता निर्माण झाल्यानेही सोन्याची मागणी वाढली.

chinmay.patankar@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why does gold import in india increased amid russia ukraine war print exp 0322 pmw