-सिद्धार्थ खांडेकर
बुद्धिबळ जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनने पुढील वर्षी होणाऱ्या लढतीत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा हा निर्णय धक्कादायक असला, तरी अनपेक्षित नाही. यापूर्वी २०२१मध्ये त्याने या लढती पुरेशा आव्हानात्मक वाटत नसल्यामुळे आपण त्यांत खेळणार नसल्याचे जाहीर केले होते. मात्र त्याने बुद्धिबळातून संन्यास घेतलेला नसून, सर्व प्रकारांमध्ये तो यापुढेही खेळत राहील. कार्लसनने हा निर्णय का घेतला, जगज्जेतेपदाची लढत आता कोणात्या खेळाडूंमध्ये होईल आणि या लढतीविषयी उत्सुकता कार्लसन नसल्यामुळे कायम राहील का, या मुद्द्यांचा विश्लेषणात्मक आढावा –

Continue reading this story with Loksatta premium subscription
Already a subscriber? Sign in

मॅग्नस कार्लसनच्या निर्णयामागे कारण काय?

मॅग्नस कार्लसन भारताच्या विश्वनाथन आनंदला हरवून चेन्नईत २०१३मध्ये पहिल्यांदा जगज्जेता बनला. यानंतर आतापर्यंत तो पाच लढतींमध्ये खेळला आणि जिंकला. सन २०१३ आणि २०१४ (वि. विश्वनाथन आनंद), २०१६ (वि. सर्गेई कार्याकिन, रशिया), २०१८ (वि. फॅबियानो करुआना, अमेरिका), २०२१ (वि. इयन नेपोम्नियाशी, रशिया) या त्या लढती होत. आनंद हा आधीच्या पिढीचा प्रतिनिधी, तर उर्वरित तिघे म्हणजे कार्याकिन, करुआना आणि नेपोम्नियाशी हे नवीन पिढीतले आहेत. भविष्यात अलीरझा फिरुझा (हा मूळ इराणचा, सध्या फ्रान्सकडून खेळतो) किंवा तत्सम खूपच तरुण तरीही विलक्षण हुशार प्रतिस्पर्धी समोर असल्यास खेळण्याचा विचार करू. अन्यथा सलग आठ वर्षे जगज्जेतेपदाच्या लढतींमध्ये खेळल्यानंतर त्यांमध्ये उत्साहजनक आणि प्रेरणाजनक असे  काही राहिलेले नाही. उलट या सगळ्याचा आता कंटाळा येतो, असे कार्लसनने नेपोम्नियाशीविरुद्ध गेल्या डिसेंबरमध्ये दुबईतील लढत जिंकल्यानंतर जाहीर केले होते.  

या लढती एकतर्फी होत्या का? 

आनंदविरुद्धची पहिली लढत आणि नेपोम्नियाशीविरुद्धची पाचवी लढत या आकडेवारीवरून एकतर्फी भासू शकतात. चेन्नईतील लढतीमध्ये त्यावेळच्या २२ वर्षीय कार्लसनने त्यावेळच्या विद्यमान जगज्जेत्या आनंदचा ३-० असा पराभव  केला. नेपोम्नियाशीविरुद्ध गेल्या वेळचा सामना कार्लसनने ७.५-३.५ असा  सहज जिंकला. २०१४मधील आनंदविरुद्धची लढत कार्लसनने ६.५-४.५ अशी जिंकली. कार्याकिन आणि करुआनाविरुद्धच्या लढती टायब्रेकरमध्ये गेल्या आणि तेथे कार्लसनने बाजी मारली. येथे एक नोंद घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, आनंद  (२०१४) आणि कार्याकिन (२०१६) या दोघांनाच कार्लसनविरुद्ध प्रत्येकी एकेक डाव जिंकता आला आहे. टायब्रेकरमध्ये गेलेल्या जलद प्रकारातील डावांमध्ये कार्लसन पराभूत झालेला नाही. पाच लढतींमध्ये कार्लसन पारंपरिक आणि जलद प्रकारात ६३ डाव खेळला. त्यात १६ डाव जिंकला, २ हरला, उर्वरित बरोबरीत सुटले. तेव्हा या लढती काही अपवाद वगळता एकतर्फी होत्या हे खरे आहे. विशेषतः प्रचंड गाजावाजा झालेला नेपोम्नियाशी गतवर्षीच्या लढतीत सुरुवातीला चांगला प्रतिकार केल्यानंतर फारच खराब खेळला. याचा परिणाम कदाचित कार्लसनवर झाला असावा. 

कार्लसनच्या दृष्टीने तुल्यबळ प्रतिस्पर्धी कोण आहेत?

फ्रान्सचा अलीरझा फिरुझा आणि चीनचा डिंग लिरेन या दोघांची नावे कार्लसनने घेतली होती. विशेषतः अलीरझा फिरुझा. २८०० एलो रेटिंग गाठणारा सर्वांत युवा बुद्धिबळपटू ही फिरुझाची कामगिरी. आव्हानवीर ठरवण्यासाठी झालेल्या कँडिडेट्स स्पर्धेत फिरुझाही सहभागी झाला होता. तरी त्याला सूर गवसला नाही. या स्पर्धेत इयन नेपोम्नियाशीने चमकदार कामगिरी करत अजिंक्यपद पटकावले. पण तो बेभरवशाचा मानला जातो. जगज्जेतेपदाच्या लढतीसाठी अत्यावश्यक असलेली एकाग्रता आणि सातत्य त्याच्यात गेल्या खेपेला तरी दिसून आले नव्हते. चीनचा डिंग लिरेन हा प्रतिभावान बुद्धिबळपटू असून त्याचा उल्लेख कार्लसननेही केला आहे. लिरेनचे रेटिंग उच्च असून तो सध्या जागतिक क्रमवारीत कार्लसनपाठोपाठ दुसऱ्या स्थानावर आहे. कँडिडेट्स स्पर्धेत तो नेपोम्नियाशीपाठोपाठ दुसऱ्या स्थानावर   राहिला. 

मग आता जगज्जेतेपदाची लढत कोणत्या खेळाडूंमध्ये होईल?

आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संघटनेच्या (फिडे) सध्याच्या नियमानुसार विद्यमान जगज्जेत्याने जगज्जेतेपदाच्या लढतीत खेळण्यास नकार दिल्यास, कँडिडेट्स स्पर्धेतील विजेता आणि उपविजेत्यांतील लढतीतून नवीन जगज्जेता ठरवला जाईल. माद्रिद येथे नुकत्याच झालेल्या कँडिडेट्स स्पर्धेत इयन नेपोम्नियाशी विजेता आणि डिंग लिरेन उपविजेता ठरला होता. त्यामुळे पुढील वर्षी हेच दोघे जगज्जेतेपदासाठी झुंजतील.

यापूर्वी कोणी जगज्जेतेपदावर पाणी सोडले?

सर्वांत प्रसिद्ध उदाहरण अर्थातच रॉबर्ट ऊर्फ बॉबी फिशर याचे. पन्नास वर्षांपूर्वी त्याने तत्कालीन सोव्हिएत रशियाच्या बोरिस स्पास्कीला पराभूत करून बुद्धिबळातील त्या देशाच्या साम्राज्याला धक्का दिला होता. मात्र, नियम व अटी मान्य न झाल्यामुळे फिशर १९७५मध्ये रशियाच्या अनातोली कारपॉवविरुद्ध खेळलाच नाही. १९९३मध्ये तत्कालीन जगज्जेता गॅरी कास्पारॉव्ह आणि त्याचा आव्हानवीर इंग्लंडचा नायजेल शॉर्ट यांनी ‘फिडे’पासून फारकत घेऊन स्वतंत्र संघटना स्थापन केली. त्यामुळे काही काळ बुद्धिबळ जगतात दोन-दोन जगज्जेते दिसून आले होते. १९९९मध्ये अधिकृत जगज्जेता अनातोली कारपॉवने, जगज्जेतेपदाच्या लढतीसाठी थेट द्वंद्वाऐवजी स्पर्धेचा अवलंब केला जात असल्याचा निषेधार्थ न खेळण्याचा निर्णय घेतला. तर १९४६मध्ये रशियाच्या अलेक्झांडर अलेखाइनचा तो जगज्जेता असताना मृत्यू झाला होता. 

कार्लसनच्या निर्णयामुळे जगज्जेतेपदाचे वलय मावळेल का?

बुद्धिबळ जगतात कार्लसनने मिळवलेले २८८२ हे रेटिंग अभूतपूर्व आहे. प्रदीर्घ काळ सर्वाधिक काळ अव्वल स्थानावर राहिलेला नॉर्वेचा हा बुद्धिबळपटू कॉर्पोरेट जगताचा बऱ्यापैकी लाडका आहे. नॉर्वे आणि इतरत्र त्याच्या उपस्थितीमुळे पुरस्कर्ते मोठ्या प्रमाणावर बुद्धिबळाकडे वळले. तो अजूनही खेळत राहील. परंतु सर्वांत बलशाली बुद्धिबळपटू जगज्जेतेपदाच्या लढतीत दिसणार नाही याचा परिणाम आर्थिक गणितावर निश्चित होऊ शकतो. आता ही लढत एक रशियन आणि एक चिनी बुद्धिबळपटूमध्ये होणार असल्यामुळे पाश्चिमात्य पुरस्कर्त्यांनी आतापासूनच नकार कळवण्यास सुरुवात केली आहे. बुद्धिबळ या खेळातील मेरुमणी म्हणवली जाणारी जगज्जेतेपदाची लढत कार्लसनच्या निर्णयामुळे भविष्यात निस्तेज होण्याची शक्यता आहे खास. 

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why does magnus carlsen find the world chess championship boring print exp scsg