जवळपास संपूर्ण एप्रिल महिन्यात ईशान्य भारतात जोरदार पाऊस, बर्फवृष्टी झाली. काय होती त्यामागची कारणे, त्याविषयी…
ईशान्य भारतात पाऊस, बर्फवृष्टी का झाली ?
जवळपास संपूर्ण एप्रिल महिन्यात ईशान्य भारतात, त्यातही प्रामुख्याने सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयात जोरदार पाऊस आणि बर्फवृष्टी झाली. एप्रिल महिन्यात उत्तरेकडून येणाऱ्या आणि हिमालयाच्या रांगामध्ये सक्रिय असणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रवाहात सातत्य राहिले. हे थंड वारे हिमालयीन रांगा ओलांडून उत्तराखंड, नेपाळ, तिबेट मार्गे सिक्कीम आणि पुढे अरुणाचल प्रदेशच्या उत्तरेकडील भागात धडकतात. त्यामुळे या उत्तरी थंड वाऱ्यांमुळे प्रामुख्याने सिक्कीम आणि अरुणाचलच्या वरच्या भागात बर्फवृष्टी आणि सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयात पाऊस पडतो. फक्त उत्तरी थंड वाऱ्यांचा प्रभाव असेल, तर तीन-चार दिवस पाऊस, तीन-चार दिवस खंड, असा टप्प्याटप्प्याने पाऊस पडतो. पण, याच काळात बंगालच्या उपसागरात केंद्राच्या दिशेने येणारे उच्च दाबाचे आवर्ती आणि केंद्राच्या विरुद्ध दिशेने बाहेर पडणारे प्रत्यावर्ती वारे सक्रिय असतात. बंगालच्या उपसागरात आवर्ती किंवा प्रत्यावर्ती वारे सक्रिय असले, तरीही ते बंगालच्या उपसागरावरून मोठ्या प्रमाणावर बाष्प आणतात. हे बाष्पयुक्त वारे दुर्गम डोंगर, दऱ्याखोऱ्यात स्थिरावतात आणि भरपूर पाऊस देतात. या बाष्पयुक्त वाऱ्यांचा आणि उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा संयोग झाला, तरी सिक्कीम आणि अरुणाचलच्या उत्तरेकडील भागात बर्फवृष्टी होते. यंदा उत्तरेकडील थंड वारे एप्रिल महिनाभर सतत सक्रिय राहिले आणि बंगालच्या उपसागरात उच्च दाबाचे आवर्ती आणि प्रत्यावर्ती वारे सक्रिय असल्यामुळे ईशान्य भारतात संपूर्ण महिनाभर पाऊस पडत राहिला.
हेही वाचा : शांतिगिरी महाराज कोण? त्यांची नाशिकमधील उमेदवारी महायुतीसाठी डोकेदुखी का ठरतेय?
यंदा ईशान्य भारतात किती पावसाचा अंदाज?
जून ते सप्टेंबर, या पावसाळ्याच्या किंवा नैर्ऋत्य मोसमी वाऱ्याच्या काळात ईशान्य भारतात प्रचंड पाऊस पडत असतो. नैर्ऋत्य मोसमी पावसाची एक शाखा (ईशान्य-नैर्ऋत्य मोसमी वारे) बंगालच्या उपसागरावरून ईशान्य भारताच्या दिशेने जाते. बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त हवा नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या दाबामुळे ईशान्य भारताकडे ढकलली जाते. दुर्गम डोंगररांगामुळे वारे वाहण्यास अडथळा निर्माण होतो आणि गारो, खासी, जयंतिया आदी लहान-मोठ्या डोंगररांगामध्ये मुसळधार पाऊस पडतो. ४८६९ फूट उंचीवरील चेरांपुजी, मासिनराम या भागांत देशातील सर्वाधिक पर्जनवृष्टी होते. यंदाच्या पावसाळ्यात मात्र ईशान्य भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
हेही वाचा : कोव्हिशिल्ड लस दुष्परिणामांमुळे मागे घ्यावी लागली? ॲस्ट्राझेनेका म्हणते मागणीपेक्षा साठा अधिक!
उन्हाळ्यातील पर्जन्यवृष्टीचा फायदा काय?
उन्हाळ्यात ईशान्य भारतात होणाऱ्या पावसामुळे ब्रह्मपुत्रा नदीसह अनेक लहान-मोठ्या नद्यांना पाणी मिळते. उंचावरील भागात फारशी शेती होत नाही. पण, तुलनेने सपाट किंवा नदी खोऱ्यांच्या परिसरात आसाम, त्रिपुरा आणि मेघालयात आणि पश्चिम बंगालमध्ये उन्हाळी भाताची लागवड केली जाते. या उन्हाळी भातासाठीची लागवड मार्च महिन्याच्या अखेरीस किंवा एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत होते. कमी दिवसांतील स्थानिक, देशी वाणाच्या भाताची लागवड होत असल्यामुळे हा भात जूनच्या मध्यापर्यंत काढणीला येतो. तसेच नदी खोऱ्यातून जनावरांसाठी चारा पिके, मका, तृणधान्ये, भाजीपाला पिकांचेही उत्पादन घेतले जाते. त्यामुळे उन्हाळ्यात ईशान्य भारतात पडणाऱ्या पावसामुळे ईशान्य भारतातील शेती, भाजीपाला पिकांना फायदा होतो. दर वर्षी उन्हाळ्यात पाऊस होत असल्यामुळे शेतकरी उन्हाळी पिकांचे नियोजन करतात. ब्रह्मपुत्रा नदीला पाणी मिळत असल्यामुळे अगदी पश्चिम बंगालपर्यत नदीकाठावरील शेतीची सिंचनाची सोय होते.
dattatray.jadhav@expressindia.com