गाझा पट्टीत हमास आणि इस्रायलदरम्यान युद्ध सुरू होऊन दोन आठवडे होत आले आहेत. हमासने ७ ऑक्टोबरला केलेल्या हल्ल्याला उत्तर म्हणून इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी ८ ऑक्टोबरला युद्ध जाहीर केले. अपेक्षेप्रमाणे अमेरिकेने सुरुवातीलाच आपण इस्रायलच्या बाजूचे आहोत असे स्पष्ट केले. त्यानंतर आधी परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन आणि नंतर संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांनी इस्रायलचा दौरा केला. अध्यक्ष जो बायडेन यांच्या इस्रायलभेटीच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि इस्रायलचे संबंध कसे राहिले आहेत याचा आढावा.
अमेरिका आणि इस्रायल यांचे द्विपक्षीय संबंध कसे आहेत?
अमेरिका आणि इस्रायल हे दोन्ही देश जवळचे मित्र आणि भागीदार आहेत. काही समान मूल्यांच्या आधारावर ही मैत्री भक्कमपणे उभी असल्याचे सांगितले जाते. इस्रायलला अमेरिकेने सातत्याने राजकीय प्रोत्साहन, आर्थिक व लष्करी साहाय्य आणि राजनैतिक पाठिंबा दिला आहे. दुसरीकडे, अमेरिकेत ज्यूंचे असलेले प्रभावी अस्तित्व नवीन नाही. अमेरिकेच्या संस्थापकांवर ज्यू धर्माचा असलेला प्रभाव त्यांच्या राज्यघटनेतून दिसतो असा काहींचा दावा आहे. अमेरिकेच्या स्वातंत्र्ययुद्धामध्ये ज्यूंनी योगदान दिले होते. अमेरिकेच्या अध्यक्षांनीही वेळोवेळी ज्यू परंपरेचा प्रभाव, ज्यू धर्मीयांचे योगदान या बाबी मान्य केल्या आहेत.
हेही वाचा – मनी लाँडरिंग प्रकरणात ‘राजकीय पक्ष’ही आरोपी? मद्य घोटाळ्यात ‘आप’वर गुन्हा दाखल होऊ शकतो?
अमेरिका आणि इस्रायलच्या राजनैतिक संबंधांचा इतिहास काय आहे?
दुसऱ्या महायुद्धानंतर इस्रायलची संकल्पना आणि स्थापनेला अमेरिकेने पाठिंबा दिला. इस्रायलची १९४८ साली स्थापना झाल्यानंतर त्याला सर्वात आधी अमेरिकेने मान्यता दिली. मात्र, सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये दोन्ही देशांचे संबंध तितकेसे दृढ नव्हते. अध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांनी १९६२ मध्ये इस्रायलबरोबर विशेष मैत्री असल्याचे जाहीर केले. तसेच, इस्रायलला शांततेत राहण्याचा अधिकार आहे असेही सांगितले. खऱ्या अर्थाने १९६७च्या युद्धानंतर दोन्ही देशांमधील मैत्री खऱ्या अर्थाने बहरली.
१९६७च्या युद्धामध्ये काय घडले?
१९६७च्या युद्धात इस्रायलने अरब राष्ट्रांचा पराभव केला. त्या युद्धामध्ये त्यांची प्राणहानी कमी झाली आणि त्यांनी पॅलेस्टाईनचा गाझा व पश्चिम किनारपट्टीसह काही भाग ताब्यात घेतला. त्या वेळी अमेरिका व्हिएतनाम युद्धात गुंतलेली असल्याने त्यांना या युद्धात लष्करी सहभाग घेणे शक्य नव्हते. त्याच वेळी अमेरिकेला पश्चिम आखातात सोव्हिएत रशियाच्या प्रभावाची चिंता वाटत होती. हे युद्ध भडकले असते तर सोव्हिएत रशिया आणि अमेरिकेदरम्यानचे शीतयुद्ध अधिक तीव्र झाले असते. मात्र, इस्रायलने युद्ध सहाच दिवसांमध्ये संपवले. त्या वेळी अमेरिकेला इस्रायलचे महत्त्व अधिक जाणवले आणि दोन्ही देशांदरम्यानचे संबंध त्यानंतर खऱ्या अर्थाने घट्ट झाले.
इस्रायलला पाठिंबा देणे अमेरिकेला स्वतःच्या हिताचे का वाटते?
अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील संबंध हे नैतिक आधारावर नसून व्यूहरचनात्मक आहेत, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पश्चिम आशियाई देशांमध्ये अमेरिकेच्या दृष्टीने सत्तासंतुलन राखण्यासाठी इस्रायल महत्त्वाची भूमिका बजावतो. इस्रायलमुळे या भागात स्थैर्य कायम राहते अशी अमेरिकेची धारणा आहे. पश्चिम आखातात राजकीय अस्थैर्याची स्थिती निर्माण झाली तर तिथून होणाऱ्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. तसे झाल्यास, त्या तेलावर अवलंबून असलेल्या अमेरिकेसमोर समस्या निर्माण होतील.
सध्या दोन्ही देशांदरम्यानचे संबंध कसे आहेत?
सध्याच्या दोन्ही राष्ट्रप्रमुखांचे संबंध चढउताराचे राहिले आहेत. बिन्यामिन नेतान्याहू आणि जो बायडेन यांच्यामधील राजकीय मतभेदांमुळे कधीकधी त्यांचे संबंध ताणले गेले. नेतान्याहू यांच्या अति-उजव्या सरकारवर बायडेन यांनी टीका केली होती. मात्र, या युद्धामुळे दोन्ही नेत्यांमधील संबंध पुन्हा दृढ झाले आहेत. युद्ध सुरू झाल्यापासून अमेरिकेने इस्रायलला राजनैतिक, आर्थिक आणि लष्करी पाठिंबा कायम असल्याचे पुन्हा स्पष्ट केले आहे. मागील आठवड्यात इस्रायलच्या दौऱ्यावर गेलेल्या अँटनी ब्लिंकन यांनीही अमेरिका इस्रायलला कधीही एकटे सोडणार नाही असे जाहीर केले.
अमेरिका इस्रायलला कशा प्रकारे साधनसामग्री पुरवते?
अमेरिकेने इस्रायलला विनाअट मदतपुरवठा सुरूच ठेवला आहे. दुसऱ्या महायुद्धापासून अमेरिकेने इस्रायलला वेळोवेळी केलेली एकूण आर्थिक मदत १५,८०० कोटी डॉलर इतकी आहे. अमेरिकेने इतर कोणत्याही देशाला इतक्या मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत केलेली नाही. या युद्धामध्ये अमेरिकेने आतापर्यंत तरी सैन्य पाठवण्याची घोषणा केलेली नाही. मात्र, लष्करी मदतसामग्री पाठवली आहे. त्याशिवाय दोन्ही देशांदरम्यान सध्या ५ हजार कोटी डॉलरचा वार्षिक व्यापार होतो.
हेही वाचा – भारत २०३५ पर्यंत ‘अवकाश स्थानक’ उभारणार? कोणत्या देशांकडे असे स्थानक आहे?
अमेरिका-इस्रायल मैत्रीबद्दल सामान्य अमेरिकी नागरिकांना काय वाटते?
अमेरिकेमध्ये इस्रायली दबावगट (लॉबी) अतिशय प्रबळ आहे. त्यांना अमेरिकेतील आणि जगभरातील धनाढ्य ज्यूंकडून भरपूर निधी मिळतो. त्या जोरावर अमेरिकेतील जनमानसांचे मत स्वतःच्या बाजूने वळवण्यास इस्रायलला चांगले यश आले आहे. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये अमेरिकी नागरिकांचा, विशेषत: डेमोक्रॅटिक पक्षाच्या समर्थकांकडून इस्रायलला मिळणारा पाठिंबा कमी होऊ लागला आहे. मार्च २०२३ मध्ये एका सर्वेक्षणामध्ये इस्रायलींपेक्षा पॅलेस्टिनींना मिळणाऱ्या पाठिंब्यात अल्प का होईना वाढ झाल्याचे दिसून आले. अमेरिका इस्रायलला जितकी मदत करते तितका फायदा मात्र मिळत नाही असा युक्तिवाद केला जात आहे. अनेक वर्षांपासून इस्रायलने पॅलेस्टाईनवर क्रूरपणे मिळवलेले नियंत्रणही अमेरिकी लोकांना खटकू लागले आहे. त्याच वेळी, अमेरिकेच्या राजकीय नेत्यांना इस्रायलबरोबर असलेली मैत्री आवश्यक वाटते हेही तितकेच खरे आहे.