अमली पदार्थांची तस्करी ही देशभरात मोठी समस्या बनत चालली आहे. भारत देश तीन बाजूंनी समुद्राने वेढलेला आहे. अशा स्थितीत अमली पदार्थांच्या तस्करीसाठी सागरी मार्गाचा सर्वाधिक वापर केला जातो. गेल्या काही महिन्यांत देशातील विविध बंदरांवर अमली पदार्थांचा मोठा साठा पकडला आहे. भारतीय नौदल, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो, डीआरआय, भारतीय तटरक्षक दल, स्थानिक पोलीस आणि इतर अनेक यंत्रणांच्या माध्यमातून अमली पदार्थांच्या तस्करीवर नियंत्रण ठेवलं जातं. असं असूनही, देशाच्या विविध भागांत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची तस्करी होत आहे. गेल्या काही महिन्यांत हजारो कोटींचे ड्रग्ज फक्त बंदरांवरच पकडले गेले. बहुतांश घटनांमध्ये हे ड्रग्ज मुंबई किंवा गुजरातच्या बंदरांवर पकडण्यात आले आहेत.
अलीकडेच, नौदल आणि एनसीबीने केरळमध्ये एका इराणी जहाजातून आणलेले २०० किलोपेक्षा अधिक हेरॉईन जप्त केले आहे. ज्याची किंमत सुमारे १२०० कोटी रुपये इतकी आहे. त्यानंतर शनिवारी भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसने ३५० कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त केले. गेल्या काही महिन्यांत गुजरातमधील मुंद्रा बंदरासह इतरही अनेक बंदरांवर हजारो कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत.
भारतात अमली पदार्थांची तस्करी कुठून केली जाते?
अफगाणिस्तानातून भारतात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची तस्करी केली जाते. मात्र, काही वेळा पाकिस्तान, नेपाळ आणि इतर देशांमार्गेही भारतात ड्रग्जची तस्करी होते. अशा स्थितीत अफगाणिस्तानात तालिबान राजवट अस्तित्वात आल्यापासून भारतात अमली पदार्थांची तस्करी झपाट्याने वाढली आहे. विशेष म्हणजे अफूची शेती हीच अफगाणिस्तानच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे. भारताशिवाय जगातील इतरही अनेक देशांत ८० ते ८५ टक्के ड्रग्जची तस्करी अफगाणिस्तानातून होते. भारतातील पंजाब, राजस्थान आणि काश्मीरमध्ये सीमेजवळील भागात ड्रोनद्वारे ड्रग्ज तस्करी करण्याच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे.
कोणत्या मार्गाद्वारे अमली पदार्थांची तस्करी मोठ्या प्रमाणात होते?
अमली पदार्थांच्या तस्करीसाठी सागरी मार्ग हा सर्वात सुरक्षित मार्ग मानला जातो. फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोठे पार्सल आणि इतरही अनेक गोष्टींमध्ये ड्रग्ज लपवून तस्करी केल्याचं अनेकदा आढळून आलं आहे. अफगाणिस्तानातून भारतात ड्रग्ज आणण्यासाठी इराणच्या बंदरांची मदत घेतली जाते. वास्तविक, विमानतळ आणि रेल्वे स्थानकांप्रमाणे बंदरांवर सुरक्षा व्यवस्था ठेवणं अवघड असतं, तरीही सीमाशुल्क अधिकारी आणि गुप्तचर पथके अचानक छापेमारी करत मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज जप्त करतात.
सागरी मार्गाने ड्रग्ज तस्करी करण्यामागचे एक प्रमुख कारण म्हणजे एकाच वेळी मोठ्या प्रमाणात ड्रग्ज तस्करी करता येते. मालवाहू जहाजातून येणाऱ्या कंटेनरमध्ये वेगवेगळ्या प्रकारे ड्रग्ज लपवून ही तस्करी केली जाते. सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी एक चूक केली तर एकाचवेळी शेकडो क्विंटल ड्रग्ज भारतात आणलं जाऊ शकतं. सध्या देशात ई-कॉमर्स वेबसाइट्स, कुरिअर सेवा आणि डार्कनेटच्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची तस्करी केली जाते.
अमली पदार्थांचा व्यवसाय झपाट्याने वाढतोय
एप्रिल २०२१ पासून आतापर्यंत देशातील विविध बंदरे आणि विमानतळांवर सुमारे चार हजार किलोहून अधिक ड्रग्ज पकडले आहेत. त्याची किंमत अंदाजे ३० हजार कोटी इतकी आहे. २०१७ मध्ये २१४६ किलो हिरॉईन जप्त केलं होतं. तर २०२१ मध्ये ७२८२ किलो हेरॉईन जप्त करण्यात आलं आहे. म्हणजे हिरॉईनच्या तस्करीतही वाढ झाली आहे. २०१७ मध्ये २५५१ किलो अफू जप्त करण्यात आली होती. दुसरीकडे, २०२१ मध्ये ४३८६ किलो अफू जप्त करण्यात आली आहेत. देशात गांजा तस्करीचेही प्रमाण वाढले आहे. २०१७ मध्ये ३५२५३९ किलो आणि २०२१ मध्ये जवळपास दुप्पट म्हणजेच ६७५६३१ किलो गांजा जप्त करण्यात आला.
अमली पदार्थांच्या तस्करीचा भारताला धोका का आहे?
ड्रग्ज व्यापाराच्या बाबतीत भारत हे पुरवठा, मागणी आणि तस्करीचे केंद्र बनत आहे. म्हणजेच इथून पुरवठा होतो, इथून मागणी होते आणि ड्रग्स तस्करीचा मार्गही भारतातून जातो. एका अहवालानुसार, देशातील सुमारे १० कोटी लोक ड्रग्जच्या आहारी गेले आहेत. त्यामुळे ड्रग्ज तस्करीचा भारताला धोका आहे.