भारतात वाघांप्रमाणेच हत्तींचीदेखील गणना होत आहे. मात्र, यावेळी गणनेची अंतिम आकडेवारी मिळण्यास विलंब होणार आहे. यावर्षी व्याघ्रगणनेला आणि आकडेवारीलादेखील उशीर झाला होता. परिणामी दोन टप्प्यांत आकडेवारी जाहीर करण्यात आली. वाघांप्रमाणेच हत्तींची शिकार, हस्तीदंतांची तस्करी होत असल्याने ही गणना आवश्यक आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हत्ती गणनेची आकडेवारी मिळण्यास उशीर का?

भारतात वाघांप्रमाणेच हत्तींचीदेखील गणना होत आहे. मात्र, यावेळी गणनेची अंतिम आकडेवारी मिळण्यास विलंब होणार आहे. ईशान्येकडील राज्यांमध्ये गणनेच्या अंदाजाला उशीर होत आहे. उत्तरेकडील हिमालयाच्या पायथ्याशी, ईशान्य राज्ये, पूर्व-मध्य भारत आणि देशाच्या दक्षिणेकडील भागांमध्ये जंगली हत्ती आढळतात. ईशान्येकडील भागात मुसळधार पाऊस, पूर आणि वनकर्मचाऱ्यांची मर्यादित क्षमता यामुळे तपशील संकलन आणि विश्लेषण अद्याप पूर्ण झाले नाही. त्यामुळे भारतातील जंगली हत्तींची संख्या जाणून घेण्यासाठी पुढील वर्षापर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

हेही वाचा >>>जाहिरातींशी संबंधित नियम १७० हटविण्याच्या आदेशावरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले; नेमके कारण काय?

आकडेवारी कधी हाती येणार?

भारतात नेमके हत्ती किती हे जाणून घेण्यासाठी जून २०२५ पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. डेहरादून येथील भारतीय वन्यजीव संस्था ईशान्येकडील वनकर्मचाऱ्यांना सप्टेंबर-ऑक्टोबर २०२५ मध्ये प्रशिक्षण देणार आहे. त्यानंतर नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीत पहिल्या टप्प्यातील तपशील गोळा होईल आणि तो भारतीय वन्यजीव संस्थेला पाठवला जाईल. हत्तीच्या गणनेसाठी नवीन पद्धतीचा वापर करण्यात येत असल्यानेही या अंदाजाला उशीर होत आहे.

हेही वाचा >>>‘हा’ देश प्राण्यांच्या जीवावर उठला; ७०० हून अधिक प्राणी मारण्याचे सरकारने दिले आदेश, कारण काय?

हत्तींची गणना कधी केली जाते?

हत्तींची गणना दर पाच वर्षांतून एकदा केली जाते. ती प्रामुख्याने हत्तींची संख्या मोजणाऱ्या राज्यांवर अवलंबून असते. अलिकडच्या वर्षांत विष्ठेच्या नमुन्यांचे विश्लेषण करण्यासारखे तंत्रदेखील हत्तींमधील जन्मदर आणि लोकसंख्येच्या ट्रेंडचा अंदाज लावण्यासाठी वापरण्यात आले आहे. २०१७ मधील शेवटच्या गणनेनुसार, भारतात २९ हजार ९६४ हत्ती होते, जे जागतिक आशियाई हत्तींच्या संख्येच्या ६० टक्के आहे. सध्या देशातील १४ राज्यांमध्ये सुमारे ३१ वनक्षेत्रे हत्तींसाठी संरक्षित आहेत. गेल्या तीन वर्षांत दांडेली हत्ती राखीव कर्नाटक राज्याने अधिसूचित केले आहे, नागालँडने सिंगफन एलिफंट रिझर्व्ह आणि छत्तीसगढमधील लेमरू हत्ती रिझर्व्ह यांचा नवीन जंगलांमध्ये समावेश आहे.

सर्वाधिक हत्ती कोणत्या राज्यात?

कर्नाटक राज्यात सर्वाधिक हत्ती आहेत. जगभरात असणाऱ्या एकूण हत्तींपैकी ६० टक्क्यांहून अधिक जंगली आशियाई हत्ती भारतात आहेत. २०१७ मध्ये झालेल्या गणनेनुसार, भारतात एक लाख दहा हजार चौरस किलोमीटर क्षेत्रफळात २९ हजार ९६४ हत्तींचे वास्तव्य आहे. ईशान्य प्रदेशात १० हजार १३९ हत्ती आहेत. पूर्व-मध्य प्रदेशात ३ हजार १२८, वायव्य भागात २ हजार ८५ आणि दक्षिण भागात ११ हजार ९६० हत्ती आहेत. कर्नाटक राज्यात सर्वाधिक ६ हजार ४९ हत्ती आहेत.

हत्तीच्या अवयवांची तस्करी कशी रोखणार?

२०२१ मध्ये केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने हत्तीच्या विष्ठेपासून डीएनए नमुने गोळा करण्यासाठी आणि त्यांचे विश्लेषण करण्यासाठी एक नवीन कार्यपद्धती जाहीर केली. यामुळे अवयवांची अवैध तस्करी रोखण्यास मदत होईल, अशी अपेक्षा अभ्यासकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. हत्तीची बेकायदेशीर शिकार, हस्तीदंताची तस्करी रोखण्यासाठी या नवीन कार्यपद्धतीचा उपयोग होईल, असे अभ्यासकांचे मत आहे.

मागील पाच वर्षांत किती हत्ती गमावले?

मागील पाच वर्षांत भारताने ५२८ हत्ती गमावले. हत्तीच्या मृत्यूची आकडेवारी पावसाळी अधिवेशनात जाहीर करण्यात आली. त्यानुसार अवैध शिकार, विषबाधा, वीजप्रवाह आणि रेल्वे अपघात यासह अनैसर्गिक कारणांमुळे गेल्या पाच वर्षांत भारताने ५२८ हत्ती गमावले. हत्तीचे सर्वाधिक मृत्यू हे रेल्वे अपघातात झाले आहेत. मानव-हत्ती संघर्षामुळे या कालावधीत भारतात २ हजार ८५३ मानवी मृत्यू झाले. भारत वगळता अन्य देशात हत्तीची शिकार व अधिवास नष्ट होत असल्याने हत्तींची संख्या लक्षणियरित्या कमी होत आहे.   

rakhi.chavhan@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why elephant census is as important as tiger census print exp amy