टेस्ला, ट्विटर, स्पेस एक्स अशा मोठ्या कंपन्यांचे मालक, जगप्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्क रोज त्याच्या उठाठेवींसाठी चर्चेत असतात. नोव्हेंबर २०२२ मध्ये ट्विटर ४४ अब्ज डॉलरला विकत घेतल्यानंतर एलॉन मस्क रोजच काही ना काही कारणांमुळे बातम्यात असतात. आज सकाळपासून ट्विटरवरील निळ्या रंगाची चिमणी जाऊन त्याठिकाणी तपकिरी रंगातील कुत्र्याचे चिन्ह दिसू लागल्यानंतर पुन्हा एकदा सोशल मीडियावर त्यांची चर्चा सुरू झाली. अर्थातच चिमणी असो किंवा कुत्रा चर्चेच्या केंद्रस्थानी असतात एलॉन मस्क. जगातील आघाडीच्या उद्योगपतींच्या यादीत एलॉन मस्कचे नाव घेतले जाते. त्यामुळे त्यांच्या उठाठेवी या आपल्याला वरकरणी गमतीचा भाग वाटत असल्या तरी तो शेवटी ठरला उद्योगपतीच ना. आताही त्याने चिमणी की कुत्रा असा नवा वाद निर्माण करत ‘त्या’ क्रिप्टोकरन्सीला गडगंज नफा कमवून दिला आहे. ही क्रिप्टोकरन्सी कोणती? त्याचा लोगो कुत्र्याचाच का? हा कुत्रा खरा की खोटा? यासंबंधी माहिती घेऊयात.
ट्विटरच्या लोगोमधील कुत्रा खराखुरा
ट्विटरवर आज सकाळपासून जो कुत्र्याचा लोगो दिसतोय, तो खऱ्याखुऱ्या कुत्र्याचा आहे. जपानमधील प्राथमिक शाळेच्या शिक्षिका अत्सुको सॅटो यांच्याकडे शिबा इनू (Shiba Inu) प्रजातीचा कबोसू (Kabosu) नावाचा कुत्रा होता. मऊ केस, तपकिरी रंग असलेली ही कुत्र्याची प्रजाती हुबेहूब कोल्ह्यासारखी दिसते. २०१० साली कबोसूचे काही फोटो अत्सुकोने सोशल मीडियावर पोस्ट केले. सोशल मीडिया तेव्हा समाजमनाची पकड घेत होता. नव्या गोष्टींना त्याकाळात चटकन प्रसिद्धी मिळत होती. कबोसूचे देखील रुसवेफुगवे असल्याचे लाडीवाळ फोटो त्या काळात व्हायरल झाले. रेडिट, टम्बलर आणि ४चॅन अशा वेबसाईटवर अनेकांनी हे फोटो शेअर केले होते. एखादी गोष्ट प्रसिद्ध झाल्यानंतर त्याचा बाजार होतो. तसाच कबोसूच्या फोटोचा झाला. कबोसूच्या फोटोचे मिम तयार करून ते विविध कारणांसाठी वापरले जाऊ लागले. त्याच्या मिमला ओरियो आणि सबवे या सारख्या मोठ्या कंपन्यांनी अधिकृतपणे स्वीकारले.
Dogecoin क्रिप्टोकरन्सीची सुरुवात
कबोसूची प्रसिद्धी वाढत असतानाच त्या काळात क्रिप्टोकरन्सीचा बोलबोला चालला होता. शेअर मार्केटमधील गुंतवणुकीला पर्याय म्हणून डिजिटल कॉईन्सकडे अनेक लोकांचा ओढा लागला होता. बिटकॉईन या आघाडीच्या क्रिप्टोकरन्सीला पर्याय म्हणून डॉजकॉईनची सुरुवात झाली. या डॉजकाईनचा लोगो होता, कबोसू.
थट्टा मस्करीत सुरु करण्यात आलेल्या या डॉजकॉईन क्रिप्टोकरन्सीचे मूल्य हा लेख लिहीपर्यंत १३.९० बिलियन डॉलर्स एवढे वाढलेले होते. भारतीय शेअर बाजारात काल एका डॉजकाईनचा दर ६.३१ रुपये होता. तो ट्विटरच्या लोगोमुळे डॉजकॉईनचा दर अचानक ३४ टक्क्यांनी वाढला. मार्केट बंद होताना एका डॉजकाईनचा दर ८.२० रुपयांवर पोहोचला होता. साहजिकच आंतरराष्ट्रीय बाजारातदेखील डॉजकॉईनचे चढे दर पाहायला मिळाले. कॉईनमार्केटकॅप या संकेतस्थळाच्या माहितीनुसार डॉजकॉईन बाजारपेठीय मूल्यानुसार जगात आठव्या क्रमाकांची क्रिप्टोकरन्सी आहे.
डॉजकाईन आणि एलॉन मस्कचा काय संबंध?
उद्योगपती एलॉन मस्क नव्यानव्या उद्योगांना आपल्या कवेत घेण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांनी सध्या ओपनएआयच्या चॅटजीपीटी ४ (OpenAI ChatGPT 4) ला विरोध केला आहे. २०१५ साली याच ओपनएआयचा प्रमुख निधी पुरवठादार एलॉनच होते. तसंच २०१४ साली डॉजकॉईनबाबत एलॉन मस्क यांनी ट्विट करायला सुरुवात केली होती, त्यामुळे त्याची किंमत अचानक वाढली. तेव्हापासून डॉजकाईन मिम कॉईन म्हणूनही प्रचलित होते.
डॉजकॉईन आणि एलॉन मस्क यांच्यात वाद
एलॉन मस्कने शुक्रवारी अमेरिकन न्यायालयात अपील दाखल करत डॉजकॉईन क्रिप्टोकरन्सीच्या गुंतवणुकदारांनी त्यांच्यावर दाखल केलेल्या २५८ अब्ज डॉलरच्या खटल्यातून मुक्तता करावी, अशी मागणी केली होती. एलॉन मस्क यांनी ट्विटवर अनेकदा डॉजकाईन बद्दल ट्विट केल्यामुळे डॉजकॉईनच्या किंमतीमध्ये फुगवटा आला आणि कालांतराने कॉईनची किंमत कोसळली. गुंतवणुकदारांच्या या आरोपांना मस्कच्या वकिलांनी न्यायालयात आव्हान दिले आहे. एलॉन मस्क यांनी मस्करीत केलेल्या काही ट्विट्सवरून गुंतवणूकदारांनी आपल्या कल्पनेचे तारे तोडल्याचा प्रतिवाद मस्कच्या वकिलांनी केला. गुंतवणुकदारांची फसवणूक करण्याचा एलॉन मस्कचा हेतू होता, हे त्यांना पुराव्यासहीत सिद्ध करता आले नाही, असा युक्तिवादही मस्कच्या वकिलांनी कोर्टात केला.
खोडी काही थांबलेल्या नाहीत
डॉजकॉईनच्या गुंतवणूकदारांसोबत खटला सुरू असताना एलॉन मस्क पुन्हा एकदा डॉजकॉईनच्या मिमवर ट्विट करताना दिसले. ४ एप्रिल रोजी त्यांनी मिम ट्विट करून ट्विटरचा लोगो बदलणार असल्याचे सूतोवाच केले होते.
तसेच, मार्च २०२२ रोजी एका ट्विटचा स्क्रिनशॉट पुन्हा शेअर केला आहे. या स्क्रिनशॉटमध्ये एका युजरने ‘ट्विटर विकत घेऊन, चिमणीच्या जागी कुत्र्याचा लोगो लावा’ असे सुचविले होते. मस्क यांनी त्यावेळी ही कल्पना वाईट असल्याचा रिप्लाय दिला होता. पण आता जेव्हा खरोखर कुत्र्याचे मिम लोगोवर लावल्यानंतर एलॉन मस्क यांनी त्या जुन्या ट्विटचा स्क्रिनशॉट शेअर केला आहे.
मस्क यांच्या या कृतीनंतर डॉजकाईनच्या अधिकृत हँडलवरून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे. याआधी देखील फेब्रुवारी महिन्यात मस्क यांनी ट्विटरच्या सीईओच्या खुर्चीवर श्वान बसल्याचा फोटो पोस्ट करून त्याला ट्विटरचा ‘नवा सीईओ’ असे म्हटले होते.