सध्याच्या काळात अगदी अन्न-पाण्यासारखेच इंटरनेटही माणसाच्या मूलभूत गरजांपैकी एक झाले आहे. इंटरनेट कनेक्टिव्हिटी ही अलीकडे माणसांची अत्यावश्यक गरज बनली आहे. पृथ्वीवरून मंगळावर माणूस पाठविण्याच्या योजना अनेक देशांकडून आखल्या जात आहेत, मात्र, आता मंगळावर इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्याचादेखील विचार सुरू आहे. टेक उद्योजक एलॉन मस्क यांना त्यांची कंपनी ‘स्पेस एक्स’द्वारे ‘स्टारलिंक’च्या माध्यमातून पृथ्वीवर उपलब्ध करून दिलेल्या इंटरनेट सुविधा मंगळावर पोहोचवायच्या आहेत. त्यासाठी एलॉन मस्क यांचे विशेष प्रयत्न सुरू आहेत. यामागील त्यांचा उद्देश काय? मंगळावरील इंटरनेटचा फायदा नक्की कोणाला होणार? त्याविषयी जाणून घेऊ.
नासाला दिलेल्या प्रस्तावात काय?
ग्रहावरील इंटरनेट व्यवस्थेमुळे भविष्यात होणाऱ्या मोहिमांमध्ये संपर्क सुविधा सोईस्कर होतील. मार्सलिंक नावाचा हा प्रस्ताव नासाच्या नेतृत्वाखालील मार्स एक्सप्लोरेशन प्रोग्राम ॲनॅलिसिस ग्रुपच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत मांडण्यात आला. त्यामध्ये स्पेस एक्स कंपनी मंगळाच्या कक्षेत डेटा एक्स्चेंजसाठी एक प्रणाली तैनात करण्यासाठी स्पेस एक्स उपग्रह स्थापित करील. हा प्रस्ताव मंगळावरील शोधमोहिमांना पाठिंबा देण्याचे आणि ग्रहावर मानवी वसाहती स्थापन करण्याचे ‘स्पेस एक्स’चे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. ‘स्पेसफ्लाइट न्यूज’नुसार मार्सलिंक नेटवर्क सध्या पृथ्वीवर कार्यरत असलेल्या स्टारलिंक प्रणालीप्रमाणे काम करील. ‘स्टारलिंक’अंतर्गत पृथ्वीच्या कक्षेत उपग्रह स्थापित करून संपूर्ण ग्रहाला इंटरनेट सुविधा प्रदान केली जात आहे.
हेही वाचा : भारतीय विद्यार्थ्यांना नोकरी देणार ऑस्ट्रेलिया; काय आहे ‘MATES’ योजना? याचा लाभ कसा घेता येणार?
अशा नेटवर्कचे काम काय असेल?
सध्या, १०२ देशांमध्ये इंटरनेट सेवा पुरवण्यासाठी हजारो स्टारलिंक उपग्रह स्थापित केले गेले आहेत. मस्क यांना मंगळावर असेच नेटवर्क स्थापन करायचे आहे. ‘मार्सलिंक’च्या निर्मितीमुळे मंगळाच्या पृष्ठभागावरच नव्हे, तर मंगळ आणि पृथ्वी यांच्यातील संपर्क सुधारेल. मंगळाचा शोध आणि अभ्यास करण्यासाठी नासाच्या मोहिमांसाठीही हे खूप उपयुक्त ठरेल. मुख्य म्हणजे असा प्रस्ताव सादर करणारी स्पेस एक्स ही पहिली कंपनी नाही. नासाने ब्ल्यू ओरिजिन आणि लॉकहीड मार्टिन यांसारख्या कंपन्यांच्या पर्यायी प्रस्तावांवरही विचार केला आहे. ब्ल्यू ओरिजिन कंपनीने ब्ल्यू रिंग ऑर्बिटल टगची कल्पना दिली; ज्याचा वापर अवकाशात डेटा पाठविण्यासाठी आणि क्लाउड कॉम्प्युटिंग प्रक्रियेसाठी केला जाऊ शकतो. अहवालात असेही म्हटले आहे की, हा प्रकल्प पेंटागॉन-प्रायोजित ‘डार्क स्काय १’ मिशनसाठी वापरला जाईल. त्याची प्रक्षेपण तारीख अद्याप निश्चित झालेली नाही.
लॉकहीड मार्टिन कंपनीने मंगळाच्या वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी २०१३ मध्ये पाठविलेले ‘मॅवेन’ अवकाशयान वापरावे, असा प्रस्तावही दिला आहे. लॉकहीडने प्रस्ताव दिला आहे की, मॅवेन हे अंतराळयानाच्या संप्रेषण कक्षेत नेऊन, पृथ्वीवर तयार केलेल्या नासाच्या डीप स्पेस नेटवर्कप्रमाणे काम करेल.
हेही वाचा : बहुचर्चित बेलुगा व्हेलचे रहस्य उलगडले; हा मासा खरंच रशियन गुप्तहेर होता का?
नासा आणि खासगी क्षेत्र
नासा आता मंगळ शोध मोहिमेसाठी खासगी क्षेत्रातील प्रकल्पांवर अधिक भर देऊन, व्यावसायिक भागीदारीचा विचार करीत आहे. एजन्सीला अशा कंपन्यांशी भागीदारी करायची आहे, ज्या भविष्यातील मानवी मोहिमांसाठी आवश्यक तांत्रिक संसाधने प्रदान करू शकतात. नासा लेसर-आधारित तंत्रज्ञानावरदेखील काम करीत आहे. हे लक्षात घेणेदेखील महत्त्वाचे आहे की, आतापर्यंत नासा आणि इतर खासगी कंपन्यांना मंगळावरील लांबचा प्रवास मानवांसाठी सुलभ आणि शक्य करण्याच्या दृष्टीने सर्व आव्हानांवर उपाय शोधण्यात यश आलेले नाही. मानवाला मंगळावर नेऊन, त्यांना त्वरित परत आणण्याची व्यवस्था, मानवाला तेथे जास्त काळ राहता येणे, मंगळावर ऑक्सिजन, इंधन इत्यादींसाठी नासाचे सखोल प्रयोग सुरू आहेत.