विमान कर्माचाऱ्यांचा संप, तिकिटांचे वाढलेले दर आणि हजारो रद्द झालेली उड्डाणे यामुळे युरोपमधील प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला आहे. खराब हवामान, कर्मचाऱ्यांची टंचाई आणि संपाच्या कारवाईमुळे हजारो उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. मात्र, या समस्यामागे नेमके कारण काय आहे?
सध्याची परिस्थिती काय आहे?
करोनामुळे दोन वर्षांपासून लावण्यात आलेले प्रवास निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्यानंतर मोठ्या प्रमाणात लोक आपल्या घराबाहेर पडून देश- विदेशात प्रवास करत आहेत. परंतु दुसरीकडे करोनाकाळात कमी करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमुळे युरोपमधील विमान कंपन्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. सध्या युरोपमध्ये फिरण्याचा हंगाम असून मोठ्या प्रमाणात प्रवासी दाखल होत आहेत. मात्र, विमानतळांवर गोंधळाची दृश्ये पहायला मिळत आहेत. विमान उड्डाणांसाठी लागणारा उशीर, रद्द होणारी उड्डाणे, सामान हरवण्यासारख्या गोष्टींमुळे प्रवासी वैतागले आहेत.
हेही वाचा- विश्लेषण : पायथागोरसेचे प्रमेय हे वेद काळापासून ज्ञात होते का ?
यूएस पेक्षा जवळपास दुप्पट विमानांची उड्डाणे रद्द
मीडिया रिपोर्ट्सनुसार, विमान कर्मचाऱ्यांचा संप, कामगारांची कमतरता, प्रवाश्यांची जास्त मागणी आणि इतर तीव्र दबावांमुळे युरोपियन हवाई वाहतूक ठप्प झाली आहे. अहवालानुसार, युरोपियन युनियनमधील रद्द करण्यात आलेल्या विमानांची संख्या तिपटीने वाढली आहे. युरोपमध्ये अमेरिकेपेक्षा जवळपास दुप्पट विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आल्याचे समोर आले आहे.
इटलीमध्ये ५०० उड्डाणे रद्द
Cirium च्या आकडेवारीनुसार, ऑगस्टमध्ये संपूर्ण युरोपमध्ये १५,७०० उड्डाणे एअरलाइन्सने रद्द केली आहेत. ज्याचे प्रमाण जगभरातील उड्डाणे रद्द होण्यापैकी ६० टक्के आहे. रविवारी, १७ जुलै रोजी, लहान विमान कंपन्यांमध्ये जास्त वेतन मागणीसाठी कामगार आणि हवाई वाहतूक नियंत्रकांनी संप पुकारला आहे. याचा परिणाम विमान उड्डाणांवर झाला आहे. परिणामी इटलीमध्ये ५०० उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
हेही वाचा- विश्लेषण : आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेला २०२२ मध्ये भारताकडून सर्वाधिक कर्ज; चार महिन्यात दिले तब्बल ३७ कोटी डॉलर्स!
टाळेबंदीमुळे विमानांच्या तिकिट दरात कपात
करोना महामारीचा विमान उद्योगावर गंभीर परिणाम झाला आहे. याचा फटका अनेक अनुभवी कर्मचाऱ्यांना बसला असल्याचा दावा युरोपियन कॉकपिट असोसिएशन (ECA) आणि विमानचालन उद्योगातील व्यावसायिकांच्या एका गटाने केला आहे. या टाळेबंदीमुळे विमानांच्या तिकिट दरात कपात करण्यात आली आहे. मात्र, व्यवसायाच्या अस्थिरतेमुळे विमान क्षेत्रातील कंपन्यांमध्ये नवीन कर्मचाऱ्यांची भरती आणि नवीन पायलटच्या नियुक्तीवर संकट आले आहे. पायलट आणि केबिन क्रू कर्माचाऱ्यांची आता एजन्सीद्वारे करारावर आणि स्वतंत्र कंत्राटी पद्धतीने नियुक्ती केली जात आहे. परिणामी, कामाची परिस्थिती आणि मोबदल्याबाबत अनिश्चित दिसून येत आहे.
युरोप करोनाच्या केंद्रस्थानी
तर दुसरीकडे स्पेन आणि पोर्तुगालमध्ये तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वाढत्या तापमानामुळे स्पेनमध्ये किमान ३६० जणांचा मृत्यू झाला आहे. तर पोर्तुगालमध्ये ६५९ जणांचा बळी गेला आहे. सध्या या शहरातील तापमान ४६ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. तसेच, युरोप हा करोनाच्या केंद्रस्थानी असून पुन्हा या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात करोनाची तीव्र लाट निर्माण होण्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) व्यक्त केली आहे.