गेल्या काही वर्षात परभणीतल्या तापमानाने उच्चांक गाठला होता. उन्हाळ्यात ४६ अंशापर्यंत गेले होते. आता हिवाळ्यात नीचांकी तापमानही या जिल्ह्यात नोंदवले गेले. १५ डिसेंबर रोजी पारा ४.६ अंशावर घसरला आहे. या वाढत्या थंडीची कारणे नेमकी काय आहेत ?
परभणीत आजवर सर्वात कमी तापमान कधी?
राज्यात दहा अंशाखाली तापमान असणार्या शहरांमध्ये धुळे, निफाडबरोबर आता परभणीचाही समावेश झाला आहे. देशाच्या उत्तरेकडे थंडीचा कडाका वाढू लागल्याने उत्तर प्रदेशातील सारसवा येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी १०.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद या हिवाळ्यात झाली. परभणीत त्यापेक्षाही तापमानाचा पारा खाली गेला आहे. गेल्या पंचवीस वर्षांचा विचार केला तर १७ जानेवारी २००३ या दिवशी परभणीच्या तापमानाची २.८ अंश झाल्याची नोंद आहे. आजवरचे हे सर्वात कमी तापमान आहे. यादिवशी सामान्यपणे ११.५ असे तापमान असायला हवे होते. त्यानंतर १३ जानेवारी २००७ या दिवशी ४.१ अशी तापमानाची नोंद आढळते तर २९ डिसेंबर २०१८ या दिवशी ३ अंश सेल्सिअस एवढी तापमानाची नोंद आहे. १८ डिसेंबर २०१४ या दिवशी ३.६ अशी किमान तापमानाची नोंद आहे. आता तो ४.६ अंशापर्यंत पारा खाली आला आहे.
हेही वाचा : Red Fort:लाल किल्ल्यावर हक्क कोणाचा; निर्वासित सम्राटाची शोकांतिका काय सांगते?
या हिवाळ्यातील आलेख घसरता कसा?
११ डिसेंबरला परभणीचे तापमान १०.५ अंश सेल्सियसपर्यंत खाली गेले. त्यानंतर तापमानाचा पारा दररोजच घसरत आहे. आता तो ४.६ अशांपर्यंत घसरला आहे. कडाक्याच्या थंडीचा जनजीवनावर मोठा परिणाम जाणवत आहे. सायंकाळी रस्ते गर्दी नसते. बाजारपेठेतही शुकशुकाट असतो.
परभणीतच थंडी वाढण्याची कारणे कोणती?
नोव्हेंबर महिन्यात परभणीतील किमान तापमान कमी असण्याची कारणे काय असावीत याबाबत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील हवामानशास्त्रज्ञ डॉ. कैलास डाखोरे यांना विचारले असता ते म्हणाल, ‘ नोव्हेंबर मान्सून संपल्यानंतर ढगांचे प्रमाण कमी असते, ज्यामुळे रात्री उष्णता लवकर निघून जाते आणि तापमान कमी होते. परभणी हे मराठवाड्यातील अंतर्देशीय (inland) क्षेत्र आहे, जेथे अर्ध-शुष्क हवामान आहे. समुद्रालगतच्या प्रदेशांप्रमाणे येथे तापमानावर पाण्याचा सौम्य परिणाम होत नाही, त्यामुळे दिवस-रात्र तापमानामध्ये मोठा फरक पडतो. हवेमधील आर्द्रता खूप कमी होते. कोरडी हवा उष्णता लवकर गमावते, ज्यामुळे रात्रीचे तापमान तुलनेने कमी राहते.
उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रभाव किती?
नोव्हेंबरमध्ये दिवस लहान आणि रात्री मोठ्या होतात. दीर्घ रात्रींमुळे किरणोत्सर्गाद्वारे उष्णता गमावण्याचा कालावधी जास्त असतो, परिणामी तापमान घटते. परभणीसारख्या अंतर्देशीय भागात “स्थलखंडीय प्रभाव” (continental effect) असतो. यामुळे दिवस-रात्र तापमानामध्ये मोठा फरक जाणवतो, विशेषतः हिवाळ्यात रात्रीचे तापमान खूप कमी होते. हिवाळ्यात उत्तर भारतातील हिमालयाच्या परिसरातून येणारे थंड वारे (उत्तरेकडील वारे) दक्षिणेकडे वाहतात. या वाऱ्यांमुळे परभणीसारख्या मध्य भारताच्या अंतर्गत भागांतील तापमान घटते असेही निरीक्षण डॉ. डाखोरे यांनी सांगितले आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळेच राज्यात हा गारठा वाढला आहे.
हेही वाचा : २०२५ मध्ये ‘या’ देशांतील प्रवासाचे नियम बदलणार; याचा भारतीयांवर काय परिणाम होणार?
थंडीचे अस्तित्व आणखी किती दिवस?
दरवर्षी साधारणतः डिसेंबर महिन्यापासून कडाक्याच्या थंडीला प्रारंभ होतो. मात्र, यावेळी ती लवकरच जाणवू लागली आहे. थोडक्यात, उत्तर भारतातील थंड वारे आणि हिमालयीन प्रभाव हे नोव्हेंबर महिन्यातील परभणीतील थंड हवामानाची प्रमुख कारणे आहेत. महाराष्ट्रात थंडीला रोखणारे कोणतेही वातावरण नाही. आता थंडीची व्याप्ती वाढत चालली असून लातूर जिल्ह्यातील औराद शहराजानी येथे पारा सहा अंशावर गेला आहे.
aasaramlomte@gmail.com