जगप्रसिद्ध कापी हाऊस ‘स्टारबक्स’ आता स्वदेशी बनणार आहे. इकॉनॉमिक टाइम्समधील एका अहवालानुसार, भारतीय ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी स्टारबक्स आपल्या मेनूमध्ये मसाला चहा आणि फिल्टर कापीचाही समावेश करणार आहे. पण दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत सगळ्यांच्याच पसंतीस ही फिल्टर कापी का उतरत आहे, याचं कारण माहिती आहे का?
उडुपी हॉटेलच्या स्थापनेनंतर लोकांना फिल्टर कापीची ओळख
१९व्या शतकाच्या उत्तरार्धात म्हणजे २०व्या शतकाच्या सुरुवातीला तमिळ लोकांना कापी पिण्याची सवय लागली. म्हैसूर प्रदेशात १८ व्या शतकापासून कापीची लागवड झाली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे, परंतु त्यातील उत्पादन केलेली बहुतेक कापी युरोपला पाठवली जात होती. हळूहळू तमिळ मध्यमवर्गीयांमध्ये कापीची आवड निर्माण होऊ लागली. १९२६ मध्ये “कापी हॉटेल्स” (ज्याला “कापी क्लब” म्हणूनही ओळखले जाते) अधिकाधिक लोकप्रिय झाले होते:आणि दक्षिण भारतामध्ये कापी पेय सामान्य झाले. दक्षिण भारतात कापी पिण्याचे वेड इतके वाढले की दारूच्या व्यसनापेक्षा जास्त कापीचे व्यसन लोकांना लागले होते. आजही दक्षिण भारतात लोक अनेक हॉटेलमध्ये केवळ कापी पिण्यासाठी जातात. दक्षिण भारतानंतर त्यानंतर हळूहळू देशातील इतर भागांमध्येही विशेषत: मुंबई आणि दिल्लीत कापी पिणाऱ्यांची संख्या वाढू लागली. उडुपी हॉटेलच्या स्थापनेनंतर लोकांना फिल्टर कापीची ओळख झाली.
हेही वाचा- विश्लेषण : जीवनावश्यक वस्तूंवर ‘जीएसटी’ भार!
कशी बनते फिल्टर कापी
साधारण कापी पेक्षा फिल्टर कापी बनवण्याची पद्धत वेगळी आहे. यासाठी कापी, दूध, साखर, पाणी आणि फिल्टर पेपरचा वापर केला जातो. छिद्रित कंटेनरच्या वरच्या बाजूला कापी पावडर ठेवली जाते. जेणेकरुन ही कापी फिल्टर केल्यावर वरच्या भागापासून खालच्या भागात जाईल. त्यानंतर उकळलेले पाणी कापीवर ओतले जाते. त्यानंतर या मिश्रणात साखर आणि गरम दूध ओतले जाते. मिश्रण पूर्णपणे उकळल्यानंतर कपात गाळले जाते. शेवटी काही वेळ एका कपातून दुसऱ्या आणि दुसऱ्या कपातून परत पहिल्या कपात फिल्टर केले जाते.
पाहा व्हिडीओ –
स्टारबक्सलाही फिल्टर कापी ची भुरळ
स्टारबक्स ही जगातील सर्वात मोठी कापी हाऊस कंपनी आहे. या कंपनीचे केवळ यूएसमध्ये ११ हजाराहून हून अधिक स्टोअर्स आहेत, कॅनडामध्ये १ हजाराहून अधिक आणि युरोपमध्ये ७०० हून अधिक स्टोअर्स आहेत. पण भारतात या कंपनीला म्हणावे तितके यश मिळाले नाही. कारण भारतीयांच्या कापीची चव जगातील इतर कापीच्या चवीपेक्षा वेगळी आहे. भारतीय सामान्यतः किंचित गोड कल असलेली कापी पिण्यास प्राधान्य देतात. उर्वरित जगात, लोक थोडे गडद किंवा त्याऐवजी फिल्टर कापी पसंत करतात.
हेही वाचा- विश्लेषण- करोना लस ‘अपडेट’ : किती शक्य, किती आवश्यक?
भारतीयांची पसंती लक्षात घेऊन, स्टारबक्सने आपल्या मेनूमध्ये नवीन बदल केला आहे. स्ट्रीट स्टाइल सँडविच, मिल्कशेक आता मसाला चहा आणि फिल्टर कापीचाही समावेश करणार आहे. स्टारबक्सने मेनू बदलण्यापूर्वी त्याची चाचणी केली आहे. बंगळुरु, भोपाळ, इंदूर आणि गुडगाव या भारतातील चार प्रमुख बाजारपेठांमध्ये या मेनूची प्रथम चाचणी करण्यात आली होती. १९८० च्या दशकात नेस्लेने मॅगीची चव बदलली होती. त्यात मॅगी ब्रँडसाठी ‘गरम आणि मसालेदार’ सॉस मसाला दिला. त्यानंतर पिझ्झा हटचा पनीर पिझ्झा आणि मॅकडोनाल्ड्सचा प्रसिद्ध मॅकलू टिक्की बर्गर आला. त्यानंतर आता स्टारबक्स देखील आंतरराष्ट्रीय फास्ट फूड साखळींच्या या यादीत सामील होत आहे.