राखी चव्हाण
काजव्यांचे लकाकणे आणि एकाच वेळी लाखो काजव्यांना लकाकताना पाहणे ही एक सुखद अनुभूती असते. मात्र, निसर्गाच्या सान्निध्यात होणारा काजव्यांचा लखलखाट पाहण्यापेक्षा काजवा महोत्सवातून होणारा लखलखाट अधिक आहे. त्याचा परिणाम काजव्याच्या मीलन प्रक्रियेवर तसेच त्यांच्या अधिवासावर होत आहे. त्यामुळेच सच्च्या निसर्गप्रेमी व पर्यावरण अभ्यासकांनी महोत्सवाच्या नावावर चालणाऱ्या या धिंगाण्यावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
काजवा महोत्सव काय आहे?
वळिवाच्या पावसाचे वेध लागले की सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात काजव्यांच्या मीलनाचा उत्सव सुरू होतो. मादी काजव्यांना आकर्षित करण्यासाठी नर काजवे शरीरातून प्रकाश सोडतात. अशा वेळी लुकलुकणाऱ्या शेकडो काजव्यांमुळे संपूर्ण झाड प्रकाशमान होते. काजव्यांच्या प्रकाशाने लुकलुकणारी ही झाडे बघण्यासाठी आणि निसर्गाचा हा अद्भुत चमत्कार पाहण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन महामंडळासह अनेक पर्यटन संस्था काजवा महोत्सवाचे आयोजन करतात. मात्र, अलीकडे या महोत्सवाला व्यवसायाचे स्वरूप आल्यामुळे निसर्ग व पर्यावरण अभ्यासकांनी याला विरोध केला आहे.
काजवा महोत्सवाची ठिकाणे कोणती?
महाराष्ट्रातील सर्वात मोठा काजवा महोत्सव दरवर्षी भंडारदरा भागात आयोजित केला जातो. वेगवेगळ्या भागातून पर्यटक, निसर्गप्रेमी या महोत्सवात सहभागी होतात. त्याचबरोबर पांजरे, उडदावणे, कोलटेंभे या आदिवासी खेड्यांच्या शिवारात, रंधा धबधब्याजवळ, भीमाशंकरचा काही भाग, ताम्हिणी अभयारण्य, पौड-मुळशी, लोणावळ्यातील राजमाची वनक्षेत्रात काजवा महोत्सव आयोजित केले जातात.
काजवा महोत्सवाला गालबोट कसे लागले?
अनादी काळापासून वळिवाच्या पावसापूर्वी काजव्यांचे लुकलुकणे आणि परिसर प्रकाशमान करणे सुरू आहे. तेव्हा काजवा महोत्सव वगैरे हा प्रकार नव्हता. निसर्गप्रेमी आणि पर्यटक येण्यास सुरुवात झाली आणि हे प्रमाण वाढतच गेले. यात तरुणाईची संख्या अधिक. आधी पर्यटन वाढले आणि तरुणांना रोजगार मिळाला. आता मात्र व्यवसाय झाला आहे. पर्यटकांना खुणावण्यासाठी ‘मार्केटिंग’ सुरू झाले. राहण्याची, खाण्याची व्यवस्था सुरू झाली. हुल्लडबाजी आणि मद्यपान वाढले. महोत्सवाच्या नावाखाली अक्षरश: धिंगाणा घातला जातो. काजव्यांच्या झाडांपासून किमान पाच ते दहा मीटर अंतर राखणे गरजेचे असते. विजेरी किंवा गाडीचे दिवे लावू नये असे असतानाही गोंधळ घातला जातो.
काजव्यांचा अधिवास आणि काजवे धोक्यात का आले?
हिरडा, बेहडा, सादडा, जांभूळ, आंबा, उंबर अशा निवडक झाडांवरच काजव्यांचा मुक्काम असतो, पण गेल्या काही वर्षांत वृक्षतोड मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाढत्या मानवी हस्तक्षेपामुळे काजव्यांचा अधिवास धोक्यात आला आहे. त्याचवेळी काजव्यांचे अस्तित्वही धोक्यात आले आहे. काजव्यांचे लुकलुकणे पाहण्यासाठी आयोजित केल्या जाणाऱ्या महोत्सवामुळे त्यांच्या उरल्यासुरल्या अधिवासात पर्यटकांची गर्दी होत आहे. वाहने थेट त्यांच्या अधिवासात शिरत असल्याने प्रामुख्याने गवतावर असणाऱ्या काजव्यांच्या माद्या वाहनांच्या चाकाखाली चिरडल्या जातात. पर्यटकांनी धुडघुस घातल्यामुळे त्यांच्या मीलन प्रक्रियेवर आणि प्रजननावर परिणाम होत आहे.
जगभरात काजव्यांच्या किती प्रजाती?
जगभरात काजव्यांच्या दोन हजारपेक्षा अधिक प्रजाती लाखो वर्षांपासून आहेत. अंटार्क्टिका वगळता जगभरात काजवे आढळतात. अमेरिकेत ते उबदार आणि दमट असलेल्या जागी आणि विशेषकरून रॉकी पर्वताच्या पूर्वेस आढळतात. नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्रीनुसार काही प्रजाती पश्चिमेला राहतात, पण माणसांना ओळखू येईल, इतका त्यांचा प्रकाश नसतो. लोकांच्या आवडत्या कीटकांपैकी हा एक कीटक आहे.
काजव्यांच्या किती प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर?
झेर्सेस सोसायटी आणि इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर (आययूसीएन) या संस्थांनी धोक्यात आलेल्या प्रजातींच्या लाल यादीनुसार काजव्याच्या अनेक प्रजातींना धोका असल्याचे सांगितले. आययूसीएनने १२८ प्रजाती पाहिल्यानंतर त्यातील ११ टक्के नष्ट होण्याच्या तर सुमारे दोन टक्के प्रजाती धोक्यात असल्याचे सांगितले. अधिवास नष्ट होणे, कीटकनाशकांचा अतिवापर, हवामानातील बदल, वाढलेले प्रदूषण आणि पर्यटकांची गर्दी यामुळे काजव्यांवर वेगवेगळे परिणाम होत असल्याचे सांगितले आहे.
काजवा कसा असतो?
निशाचर कुळातील असल्याने काजवे रात्रीच सक्रिय होतात. त्यांच्या पाठीवर लुकलुकणारा प्रकाश दिसून येतो. जैविक कचरा विघटन, फुलांवर परागकण निर्माण करण्यात काजव्यांची भूमिका महत्त्वाची आहे. वर्षभर तो पालापाचोळा आणि झाडांच्या खोडावर राहतो. वळिवाचा पाऊस पडल्यानंतर तो बाहेर येतो. फुलपाखरांप्रमाणेच अंडी, अळी, कोश असे त्याच्या जीवनचक्राचे तीन भाग आहेत. काजव्यात रूपांतरित झाल्यानंतर दोन आठवड्याने तो स्वयंप्रकाशित होतो.
काजवा चमकण्यामागील नेमके कारण काय?
काजव्याच्या शेपटीतील एका अवयवात ल्युसीपिरियल नावाचे रसायन तयार होते. हे रसायन ऑक्सिजनच्या संपर्कात आल्यानंतर त्यातून प्रकाश बाहेर पडतो. काजव्यांच्या पोटात मॅग्नेशियम, प्राणवायू, लुसिफेरस, लुसिफेरीन यामध्ये रासायनिक प्रक्रिया होऊन प्रकाशनिर्मिती होते. यालाच आपण काजव्यांचे लुकलुकणे असेही म्हणतो. याचा वापर काजवे एकमेकांशी संवाद साधण्यासाठी करतात. हा संवाद प्रामुख्याने दोन कारणांसाठी होतो. एकतर मादी काजव्यासोबत मीलनासाठी किंवा दुसरा म्हणजे भक्षक आला तर त्यासाठी. मादीला आकर्षित करण्यासाठी नर काजवे प्रकाश सोडतात. ज्याचा प्रकाश जास्त त्याची निवड मादी काजवा करते. नर काजवा दर पाच सेकंदांनी तर मादी काजवा दर दोन सेकंदांनी शरीरातून प्रकाश सोडतात.
rakhi.chavhan@expressindia.com