-ज्ञानेश भुरे
इंडोनेशियात अलीकडेच झालेल्या फुटबॉल मैदानावरील चेंगराचेंगरीत १२५हून अधिक चाहत्यांचा मृत्यू झाला. इंडोनेशियातील फुटबॉल सामन्यांमधील ही सर्वांत मोठी हिंसक घटना ठरली. अर्थात, इंडोनेशियाला अशा हिंसक घटना नव्या नाहीत; परंतु जगात ‘सुंदर खेळ’ (ब्युटिफुल गेम) म्हणून ओळखला जाणारा खेळ इंडोनेशियात मात्र क्रूरतेच्या परिसीमा गाठतोय. यामागची कारणे कोणती?
इंडोनेशियात फुटबॉलमध्ये हिंसा का होते?
इंडोनेशियात फुटबॉल हा सर्वांत लोकप्रिय खेळ आहे. स्थानिक चाहते येथील क्लबशी घट्ट जोडले गेले आहेत. हे नाते अनेकदा अंधभक्तीमध्ये परिवर्तित होते. त्यामुळे क्लबशी जोडला गेलेला चाहता वर्ग आपल्या संघाचा पराभव पचवू शकत नाही. त्याचे पर्यवसान मग हिंसा आणि गुंडगिरीमध्ये होते. पर्सिजा जकार्ता आणि पर्सिब बांडुंग हे इंडोनेशियातील जणू पारंपरिक प्रतिस्पर्धी. त्यांच्या सामन्यांदरम्यान सर्वाधिक दंगली झाल्या आहेत.
इंडोनेशिया फुटबॉल विश्वातील सर्वांत धोकादायक लीग का ठरते?
अलीकडेच झालेल्या चेंगराचेंगरीच्या प्रकरणाने पुन्हा एकदा इंडोनेशियातील फुटबॉल लीगमधील दाहकता नव्याने समोर आली. त्यामुळे इंडोनेशियातील लीग सर्वात धोकादायक असल्याचा निष्कर्षही समोर आला. ऑस्ट्रेलियातील एबीसी न्यूजने या सगळ्या पार्श्वभूमीवर “जगातील सर्वात धोकादायक फुटबॉल लीगचे अंतरंग” असा माहितीपट तयार केला आहे. या माहितीपटात इंडोनेशियातील फुटबॉल संस्कृतीवर प्रकाश टाकला आहे.
काय दाखवतो हा माहितीपट?
हा माहितीपट इंडोनेशियातील फुटबॉलचे अंतरंग उलगडून दाखवत असला तरी प्रामुख्याने तो पर्सिजा क्लबवर केंद्रित आहे. त्याचबरोबर इंडोनेशियातील काही काळ्या घटनांवर प्रकाश टाकतो. यातील सर्वात विदारक घटना म्हणजे पर्सिजा संघाचा कट्टर समर्थक एरी याला प्रतिस्पर्धी क्लब पर्सिब बांडुंगच्या चाहत्यांनी अक्षरशः ठेचून मारले होते. विशेष म्हणजे हे सर्व जण अल्पवयीन होते. यात एरीचा काही दोष नव्हता. तो फक्त सामना बघत होता; पण हिंसेला सुरुवात झाल्यावर येथे फक्त क्रौर्य दिसून येते. हरिंगा सिरला हा असाच एक चाहता सामना पाहण्यासाठी लपतछपत मैदानावर जात होता; पण तो मैदानात कधीच पोहोचला नाही. या सगळ्यावर या माहितीपटात प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.
कशामुळे निर्माण होते इतके क्रौर्य?
अनेक समर्थकांना आपल्या क्लबला कसे प्रोत्साहन द्यायचे, अपयश येत असेल तर दंगल कशी पसरावयाची आणि त्यातून कसे बाहेर पडायचे याचे चक्क पद्धतशीर प्रशिक्षण दिले जाते. इंडोनेशियात फुटबॉल सामन्यात होणाऱ्या हिंसक घटनाच्या पडद्यामागील हे विदारक सत्य आहे. येथे दारू नाही, पण चाहत्यांना एक प्रकारचा बर्फाचा चहा (आइस टी) दिला जातो. ज्यामुळे चाहत्यांच्या उन्मादाला चालना मिळते आणि त्यांना आपण काय करतोय याचे भान राहात नाही.
अशा हिंसक घटनांनी आतापर्यंत किती जणांचे घेतले बळी?
आवडत्या फुटबॉल संघांचे अपयश आणि चाहत्यांमधील उद्रेक हा फुटबॉलविश्वात नवीन नाही; पण इंडोनेशियात या उद्रेकाने टोक गाठले आहे. त्यामुळेच इंडोनेशियात फुटबॉल हे मनोरंजन नाही, तर जीवघेणा खेळ ठरू लागला आहे. एकट्या इंडोनेशियात गेल्या २५ वर्षांत झालेल्या फुटबॉल हिंसाचारात सुमारे ७५ चाहत्यांचा मृत्यू झाला आहे. अलीकडील आठ महिन्यांच्या कालावधीत तर १६ जण मरण पावले. आणखी हजारो जखमी झाले आहेत. यात गेल्या महिन्यातील घटनेची भर पडली. या घटनेत तर १२५ जणांचा मृत्यू झाला. यात १७ मुलांचा समावेश होता.
पर्सिब आणि पर्सिजा यांच्यात इतके शत्रुत्व का?
इंडोनिशियातील पर्सिब आणि पर्सिजा या दोन क्लबचे शत्रुत्व हे आजचे नाही, तर पूर्वीपासून असल्याचेही या माहितीपटातून समोर येते. या शत्रुत्वाला भूतकाळातील घटनांचा बदला आहे. जेव्हा पर्सिब संघ पर्सिजाच्या मैदानावर खेळला, तेव्हा कुणी एक चाहता मरण पावला आणि जेव्हा पर्सिजा पर्सिबाच्या मैदानावर खेळला, तेव्हा कुणी मरण पावला असे सांगितले जाते आणि त्यातूनच या दोघांमधील शत्रुत्व वाढत गेले.
खेळाडूंची काळजी कशी घेतली जाते?
इंडोनेशियामधील क्लबमधील वैर हे फक्त वैर नसते, तर ते हाडवैर असते. आपल्या चाहत्यांना कसे प्रोत्साहन द्यायचे आणि कशी दंगल घडवायची याचे प्रशिक्षण घेतलेले गट मैदानात ठरलेल्या रंगाचे पोशाख करून उपस्थित असतात. अशा गटांचे स्वतंत्र प्रमुखही आहेत, जे या सगळ्या हिंसक घटना घडवायला कारणीभूत ठरतात; पण खेळाडूंना धोका निर्माण होऊ नये, यासाठी प्रतिस्पर्धी संघांना खेळण्यासाठी बंदिस्त गाडीतूनच मैदानावर आणले जाते.