गाझापट्टीमधील हमास दहशतवादी संघटनेने इस्रायलवर अभूतपूर्व असा हल्ला केल्यानंतर इस्रायलनेही त्याला चोख प्रत्युत्तर दिलेच. त्याशिवाय इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलंट यांनी गाझापट्टीला वेढा टाकण्याची घोषणा केली. गाझापट्टीत वीज, अन्न, पाणी आणि इंधन याचा कसलाही पुरवठा होऊ देणार नाही. सर्व काही बंद करण्यात येईल, अशी कठोर भूमिका गॅलंट यांनी व्यक्त केली. गाझापट्टीचा भूभाग असा आहे की, इस्रायलला अशाप्रकारचे निर्बंद लादणे शक्य होते. गाझापट्टीच्या एकाबाजूला इस्रायलचा भूभाग आहे, तर दुसऱ्या बाजूला भूमध्य समूद्र. २००७ पासून गाझापट्टीला इस्रायलने वेढा टाकलेला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गाझापट्टीचा नकाशा पाहिल्यानंतर स्पष्ट दिसते की, गाझाच्या पश्चिमेला भूमध्य सागर आहे, उत्तर आणि पूर्व दिशेला इस्रायल आणि दक्षिणेला इजिप्तचा थोडा भाग आहे. गाझामझ्ये २० पॅलेस्टिनी नागरिक राहतात. १९६७ पासून येथे लष्कराचे प्रशासन आहे. २००५ साली इस्रायलने गाझातू माघार घेतली असली तरी संयुक्त राष्ट्र आणि युरोपियन युनियन आणि इतर आंतरराष्ट्रीय संघटना गाझा हा नियंत्रित प्रदेश असल्याचे मानतात. इतरांनी ताबा मिळविल्यामुळे आणि सततच्या नाकेबंदीमुळे संयुक्त राष्ट्राचे तज्ज्ञ, विचारवंत, उजव्या विचारसरणीचे गट आणि ब्रिटनचे माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून हे ‘गाझा’ प्रदेशाला खुले कारागृह असे संबोधतात.

हे वाचा >> इस्रायल आणि पॅलेस्टाईनचे वैर कधीपासून आहे? आतापर्यंत कितीवेळा झाला संघर्ष?

गाझाच्या नाकेबंदीची सुरुवात कशी झाली?

१९६७ साली इजिप्त-सीरिया विरोधात झालेल्या सहा दिवसांच्या युद्धानंतर इस्रायलने इजिप्तच्या नियंत्रणाखाली असलेल्या गाझापट्टीवर नियंत्रण मिळवले आणि या प्रदेशात लष्करी प्रशासन लागू केले. १९६७ ते २००५ या काळात इस्रायलने गाझामध्ये २१ वसाहती स्थापन केल्या. तसेच पॅलस्टिनी नागरिकांवर निर्बंध लादून, प्रसंगी त्यांना आर्थिक आणि इतर लाभांचे आमिष दाखवून गाझापट्टीतून बाहेर जाण्यास सांगितले. या काळात इस्रायलच्या विरोधात पॅलेस्टिनी नागरिकांनी अनेकवेळा हिंसक आणि अहिंसक आंदोलने केली.

२००५ साली इस्रायलने गाझामधील आपल्या वसाहती नष्ट केल्या. २००७ पासून इस्रायलने गाझाची अनेकदा नाकेबंदी केली. गाझामधून वस्तूंची वाहतूक आणि लोकांच्या प्रवासावर बंधने घालण्यात आली.

गाझापट्टीचा नकाशा. तीन बाजूंना भूभाग आणि एका बाजूला समुद्र असल्याचे दिसत आहे. (Photo Credit – Wikipedia)

१९९३ साली ओस्लो करारानुसार, इस्रायलने हळूहळू गाझापट्टीतून काढता पाय घेतल्यानंतर पॅलेस्टाईन अथॉरिटीने प्रशासनाचा कारभार हाती घेतला आणि २००६ साली गाझामध्ये निवडणूक जाहीर झाली. इस्रायलची नाकेबंदी असतानाच मतदान पार पडले आणि दहशतवादी गट हमासने या निवडणुकीत बहुमत मिळवले. निवडणूक झाल्यानंतर गाझामध्ये पूर्वीपासून सक्रिय असलेल्या फताह आणि नव्यान सत्तेत आलेल्या हमास संघटनांमध्ये रक्तरंजित संघर्ष झाला. या संघर्षात शेकडो पॅलेस्टिनींनी प्राण गमावले.

हे वाचा >> इस्रायलचे रॉकेट हल्ल्यापासून संरक्षण करणारी आयर्न डोम यंत्रणा काय आहे?

२००७ साली हमासची गाझापट्टीवर सत्ता आल्यानंतर इस्रायलने कायमची नाकाबंदी जाहीर केली. गाझाच्या दक्षिणेच्या इजिप्तच्या सीमेवर वाहतूक करण्यासाठी असलेला मार्ग इजिप्तने बंद केला आणि एकप्रकारे इस्रायलच्या नाकेबंदीला सहकार्य केले. गाझाला लागून असलेल्या सीमेवरील वाहतुकीचे सर्व मार्ग बंद झाल्यामुळे आतल्या लोकांना बाहेर जाणे आणि बाहेरून आत येण्यावर बंधने लागू झाली. तसेच मालाची ने-आण करणेही अवघड होऊन बसले. गाझावर लादलेली नाकेबंदी ही इस्रायलच्यादृष्टीने सुरक्षेचे उपाय असल्याचे सांगत त्याचे समर्थन करण्यात आले.

भिंत आणि सीमा ओलांडण्याचे मार्ग

गाझापट्टीच्या तीन बाजूंनी भिंत बांधण्यात आलेली आहे, तर चौथ्या बाजूला भूमध्य समुद्र आहे. ज्यामुळे गाझापट्टीच्या अवतीभवती भौतिक अडथळे निर्माण झालेले आहेत. १९९४ साली इस्रायलने गाझाच्या सीमेवर ६० किमी लांब तारेचे कुंपण घातले. जसा काळ पुढे गेला, तसे इस्रायलने सीमा सुरक्षित करण्यासाठी आणखी अद्ययावत अशी यंत्रणा बसविली. सात मीटर उंच भींत सीमेवर बांधण्यात आली असून त्याला सेन्सर बसविण्यात आले आहेत. इस्रायल वसाहतीच्या बाजूने सीमा ओलांडण्यासाठी जे मार्ग आहेत, तिथे रिमोट कंट्रोले चालणाऱ्या मशीन गन बसविण्यात आल्या आहेत. जमिनीवरच्या भिंतीसोबतच जमिनीखालीही सुरक्षेच्या उपाय योजलेले आहेत. हमासकडून जमिनीखालून सुरुंग खोदण्यात येऊ नयेत, यासाठी जमिनीखालीही भिंत बांधण्यात आल्याची माहिती, द इंडियन एक्सप्रेसने दिली.

गाझापट्टीच्या उत्तरेपासून ते इस्रायलच्या पूर्व दिशेपर्यंत इस्रायलने भिंत बांधली आहे. तर गाझाच्या दक्षिणेला इजिप्तने अमेरिकेची मदत गेऊन १४ किलोमीटरची सीमा भिंत बांधून बंद केली आहे. भू-सुरुंगाच्या माध्यमातून चालणारी तस्करी रोखण्यासाठी जमिनीखालीही भिंतीच्या स्वरुपात अडथळे निर्माण करण्यात आले आहेत.

आणखी वाचा >> महात्मा गांधी यांनी पॅलेस्टाईनमधील ज्यू लोकांच्या देशाला विरोध का केला होता?

इस्रायलच्या पश्चिमेला असलेल्या भूमध्य समुद्रावर इस्रायलचे नियंत्रण आहे. गाझामधून लोक किंवा सामानाची ने-आण करण्यासाठी इस्रायलने बंदी घातली आहे. त्यामुळे गाझातील लोकांना सागरी मार्गाचाही वापर करता येत नाही. सध्या गाझामधून बाहेरच्या जगाशी संपर्क साधण्यासाठी तीन सीमामार्ग उपलब्ध आहेत. करीम अबू सालेम क्रॉसिंग आणि एरेज क्रॉसिंग हे दोन मार्ग इस्रायलकडून नियंत्रित केले जातात. तर रफाह क्रॉसिंग इजिप्तकडून नियंत्रित केली जाते. शनिवारी (७ ऑक्टोबर) हमासचा हल्ला झाल्यानंतर सर्व तीन सीमामार्ग बंद करण्यात आले आहेत.

दाट लोकवस्ती आणि गरीबी

गाझापट्टीचे क्षेत्रफळ ४१ किलोमीटर लांब आणि १२ किलोमीटर रुंद आहे. फक्त ३६५ चौरस किमी क्षेत्रफळावर २० लाख पॅलेस्टिनी नागरिक दाटीवाटीने राहतात. जगातील सर्वात दाट लोकवस्तीचा परिसर म्हणून याची ओळख आहे. संयुक्त राष्ट्रांच्या मानवतावादी व्यवहार समन्वय (OCHA) कार्यालयाने मागच्या वर्षी गाझापट्टीबाबत एक अहवाल प्रकाशित केला होता. गाझापट्टीची नाकेबंदी केल्यामुळे तेथील अर्थव्यवस्था धुळीस मिळाली असून बेरोजगारीचा दर प्रचंड वाढला आहे. तसेच अन्न सुरक्षा आणि इतर मुलभूत गरजांच्या बाबतीत गाझापट्टी परावलंबी झाली आहे.

हे वाचा >> मुंबईपेक्षाही लहान असलेली ‘गाझा’पट्टी गेल्या १०० वर्षांत युद्धभूमी कशी ठरली?

या अहवालानुसार, गाझापट्टीतील सुमारे ६१ टक्के लोकांना अन्न मदतीची गरज आहे, ३१ टक्के कुटुंबांना आर्थिक चणचण भासत असल्यामुळे ते आपल्या मुलांना शिक्षण देऊ शकत नाहीत. वह्या-पुस्तके, शैक्षणिक शुल्क भरणे त्यांना अवघड झाले आहे. येथील बेरोजगारीचा दर ४६ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. याठिकाणी विजेची कमतरता भासत असून दिवसाचे ११ तास वीज उपलब्ध होत नाही.

गाझापट्टीची नाकेबंदी केल्यामुळे सर्वच नागरिकांना एकप्रकारे शिक्षा दिली जात आहे, तसेच आंतरराष्ट्रीय मानवाधिकार हक्कांचे आणि कायद्यांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप या अहवालात करण्यात आला होता.

नाकेबंदीमुळे गाझामधील नागरिकांना वेस्ट बँक याठिकाणी जाता येत नाही. वेस्ट बँक हा पलेस्टाईनचा पूर्वेकडचा मोठा भूभाग आहे. गाझामधील अनेक नागरिकांचे कुटुंबिय वेस्ट बँकेतील असून त्यांचे व्यावसायिक हितसंबंधही आहेत. गंभीर वैद्यकीय उपचारासाठी गाझामधील अनेक नागरिकांना वेस्ट बँकेत जावे लागते. मात्र नाकेबंदी असल्यामुळे इस्रायलकडून त्याची परवानगी घ्यावी लागते. इस्रायलकडून दीर्घ पडताळणी प्रक्रिया पार पाडावी लागते. यातील बहुसंख्य प्रकरणात इस्रायलकडून नकारच देण्यात येतो.

खुले कारागृह

संयुक्त राष्ट्रांकडून गाझापट्टीमध्ये मानवी हक्कांबाबत वार्तांकन करणाऱ्या फ्रान्सिस्का अल्बानीज यांनी याचवर्षी जुलै महिन्यात म्हटले होते की, इस्रायलने पॅलेस्टाईनवर ज्याप्रकारे निर्बंध लादले आहेत, त्याला खुले कारागृहच म्हटले पाहीजे, त्याशिवाय दुसरा योग्य शब्द नाही.

फ्रान्सिस्का यांनी मोकळ्या जागेतील कारागृह अशी जी संज्ञा गाझासाठी वापरली तशाच प्रकारची संज्ञा अनेक वर्षांपासून विचारवंत, कार्यकर्ते आणि पत्रकारही वापरत आहेत. भाशाशास्त्रज्ञ आणि विचारवंत नोम चोम्स्की यांनी २०१२ साली लिहिले की, जगातील सर्वात मोठ्या खुल्या कारागृहात राहण्याचा अनुभव कसा असतो, हे जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही गाझापट्टीमध्ये एक दिवस घालवा. फक्त पत्रकार आणि विचारवंतच नाही तर इस्रायलचे मित्र राष्ट्र असलेल्या ब्रिटननेही अशाच प्रकारची प्रतिक्रिया दिली होती. २०१० साली ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून संसदेत म्हणाले होते की, गाझा हे एक मोठे खुले कारागृह आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why gaza is known as the worlds biggest open air prison kvg