गुजरातमधील अहमदाबाद येथे झालेल्या ‘ग्लोबल फिशरीज कॉन्फरन्स इंडिया २०२३’ या संमेलनात ‘घोळ’ माशाला गुजरातचा राज्य मासा म्हणून घोषित करण्यात आले. मच्छीमारांसाठी लॉटरी समजला जाणारा घोळ मासा भारतातील सर्वात मोठा मासा असल्याचे मानले जाते. जगातील इतर देशांमध्ये याला ‘ब्लॅक स्पॉटेड क्रोकर फिश’ म्हटले जाते. गुजरातने घोळ माशाला राज्य माशाचा दर्जा का दिला? याचा घेतलेला हा आढावा ….

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

घोळ माशाची निवड का केली गेली?

घोळ माशाचे आर्थिक मूल्य आणि त्याच्या वेगळेपणामुळे गुजरात सरकारने या माशाला राज्य माशाचा दर्जा दिला. पर्शियन आखाती समुद्रकिनाऱ्यापासून ते प्रशांत महासागराच्या किनारपट्टीलगत घोळ मासा आढळून येतो. घोळच्या संवर्धनाचा प्रयत्न करण्यासाठी त्याला राज्य माशाचा दर्जा दिल्याचे गुजरात सरकारमधील अधिकाऱ्यांनी सांगितले.

हे वाचा >> जाळ्यात सापडला लक्षावधी किंमतीचा घोळ मासा, मच्छिमाराची झाली चांदी

“प्रत्येक राज्याने त्यांचा राज्य मासा जाहीर केलेला आहे. गुजरातचा राज्य मासा ठरविताना त्या माशात काहीतरी वेगळेपण असावे, असा विचार आम्ही केला होता. असा मासा जो सहजासहजी प्राप्त होत नाही आणि जो कधी कधी मच्छीमारांच्या जाळ्यात अडकतो. दुसरे असे की, त्या माशाचे उच्च आर्थिक मूल्य असावे. तिसरे म्हणजे, या माशाचे जतन करणे आवश्यक असून त्याची शिकार रोखण्यासाठी प्रयत्न करायला हवेत”, अशी प्रतिक्रिया गुजरात सरकारचे मत्स्यव्यवसाय आयुक्त नितीन सांगवान यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना दिली.

माशाच्या इतर कोणत्या प्रजातींचा विचार केला गेला?

सांगवान पुढे म्हणाले की, राज्य माशाची निवड करण्याआधी सर्व जिल्ह्यांच्या प्रतिनिधींसह सल्लामसलत करण्याची प्रक्रिया पूर्ण केली गेली. रिबन मासा, पापलेट आणि बोंबिल (Bombay Duck) या माशांना आधीच राज्य माशांचा दर्जा कुठेना कुठे देण्यात आलेला आहे.

हे वाचा >> अबब! श्रीवर्धनमध्ये २२ किलोच्या घोळ माशासाठी लागली लाखोंची बोली; तब्बल २ लाख ६१ हजारात विक्री

घोळ माशाचे व्यावसायिक महत्त्व काय?

घोळ मासा महाग असल्यामुळे याचा स्थानिक बाजारात फारसा वापर होत असल्याचे ऐकिवात नाही, असे तज्ज्ञांनी सांगितले. मात्र, या माशाला चीन आणि इतर देशांच्या बाजारात चांगली मागणी आहे. “ज्या मच्छीमाराच्या जाळ्यात घोळ फसतो, त्याला लॉटरी लागली असे म्हणतात. चवीला उत्तम असणारा हा मासा बऱ्याच देशांमध्ये स्वादिष्ट मानला जातो. काही देशांमध्ये त्याचा औषधासाठी वापर होतो. घोळ माशाचे मांस काढून ते फ्रोझन फिलेटच्या स्वरुपात किंवा संपूर्ण मासच युरोप, मध्य आशियातील देशांमध्ये निर्यात होते. तसेच घोळ माशाचे वायू मूत्राशय पोटातून काढून ते वाळवले जाते. त्यानंतर चीन, हाँगकाँग आणि इतर आशियाई देशांमध्ये औषध निर्मितीसाठी त्याची निर्यात होते”, अशी माहिती नेटफिश (NETFISH) या संस्थेचे राज्य समन्वयक जिग्नेश विसावाडीया यांनी दिली. गुजरात सरकारने स्थापन केलेल्या सागरी उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणच्या अंतर्गत नेटफिश या संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे.

गुजरातमध्ये घोळ माशाचे एक किलो मांस ५,००० ते १५,००० रुपयांना विकले जाते. तथापि, घोळचे वाळवलेले वायू मूत्राशय सर्वात महाग असते. निर्यात बाजारात याची किंमत प्रति किलो २५,००० रुपयांच्याही वर जाते, अशीही माहिती विसावाडीया यांनी दिली. विसावाडीया यांच्या मते, एका घोळ माशाचे वजन २५ किलोपर्यंत असू शकते.

आणखी वाचा >> मच्छीमारांच्या जाळ्यात कोटय़वधीचे ‘घोळ’

गुजरात किती निर्यात करतो?

वर्ष २०२१-२२ मध्ये गुजरातमध्ये एकूण माशांचे उत्पादन ८.७४ टन इतके झाले. ज्याचे बाजारमूल्य ११,२२१ कोटी असल्याचे सांगितले जाते. त्यापैकी २.३ लाख टन मासे आणि माश्यांचे उत्पादन निर्यात केले गेले. ज्याचे बाजारमूल्य ५,२३३ कोटी रुपये इतके होते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why has gujarat chosen ghol as a state fish which is considered a lottery for fishermen kvg
Show comments