पाकिस्तानने ऑनलाईन ज्ञानकोश वेबसाईट Wikipedia वर बंदी घातली आहे. ईश्वरनिंदा असणारा मजकूर टाकल्याबाबत ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मागच्या आठवड्यात पाकिस्तानच्या दूरसंचार प्राधिकरण (Pakistan Telecommunication Authority – PTA) ने विकिपीडियाला वादग्रस्त मजकूर हटविण्याबाबत इशारा दिला होता. यासाठी ४८ तासांची मुदत देण्यात आली होती. सदर मुदतीच्या आत मजकूर हटविला न गेल्यास संकेतस्थळावर बंदी आणू असेही सांगितले होते.

पीटीएचे प्रवक्ते मलाहत ओबेद यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले की, “विकिपीडियाला त्यांची बाजू मांडण्यासाठी वेळ दिला गेला होता. मात्र विकिपीडियाने त्यांच्या संकेतस्थळावरुन निंदनीय मजकूर हटविला नाहीच आणि प्राधिकरणासमोर चौकशीसाठी देखील उपस्थिती लावली नाही. पीटीएला जो मजकूर नको आहे, तो जोपर्यंत काढला जात नाही, तोपर्यंत विकिपीडियाला पाकिस्तानमध्ये बंदी असेल.” Dawn ने दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तानमधील नागरिक जेव्हा विकिपीडिया साईटवर जात आहेत, तेव्हा त्यांना एरर दाखविला जात आहे.

विकिपीडिया, इंटरनेटवरील सर्वात लोकप्रिय आणि विनामूल्य ज्ञानकोश

विकिपीडिया हा इंटरनेटवरील सर्वात लोकप्रिय, विनामूल्य आणि लोकांकडून संग्रहित केलेला ज्ञानकोश आहे. कम्युनिटी स्वयंसेवकांकडून या साईटवर मजूकर लिहिला जातो, तसेच त्यावर देखरेख आणि संकलन केले जाते. विकिमीडिया नावाची संस्था विकिपीडिया वेबसाईट चालवते. बंदी घातल्यानंतर शनिवारी विकिपीडियाच्यावतीने सांगण्यात आले की, जगातील पाचवा सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशाला जगातील सर्वात मोठ्या विमामूल्य ज्ञान भांडारापासून वंचित राहावे लागणार आहे.

विकिमीडियातर्फे पुढे सांगितले गेले की, विकिपीडियावरील माहिती आणि मजकूर विकिमीडिया नियंत्रित करत नाही. मजकूराची खात्री करण्यासाठी कम्युनिटी स्वयंसेवक माहितीचे संपादन करत असतात. विकीमीडिया कोणत्याही मजकूराचा निर्णय घेत नाही. विकिपीडियावर कोणती माहिती घेतली जावी, यासाठी अनेक लोक एकत्र येऊन काम करत असतात. त्यामुळेच अधिक समृद्ध, अधिक तटस्थ लेख विकिपीडियावर आहेत.

अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला

पीटीएच्या कारवाईनंतर पाकिस्तानातील सामान्य जनतेकडून मात्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. देशात माध्यमांच्या स्वातंत्र्यावर गदा येत असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. डिजिटल हक्कांसाठी काम करणाऱ्या उसामा खिलजी म्हणाले, “देशात न्यायालय आणि नियामकांनी हे लक्षात घ्यावे की, विकिपीडिया हा क्राउड सोर्स्ड प्लॅटफॉर्म आहे. ज्याठिकाणी कुणीही एखादा लेख किंवा त्यातील मजकूर संपादित करु शकतो. संपूर्ण संकेतस्थळावर बंदी आणण्यापेक्षा ज्या लेखावर आक्षेप आहे, तो संपादित केला जाऊ शकतो.”

पाकिस्तानमध्ये इंटरनेटवर सेन्सॉरशिप

ईश्वरनिंदा हा पाकिस्तानमधील एक संवेदनशील विषय आहे. धर्मनिंदा करणाऱ्या मजकुरासाठी माध्यमे किंवा संकेतस्थळांना जबाबदार धरण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी पाकिस्तानने २०१२ ते २०१६ या काळात प्रेषित मोहम्मद यांच्यावर आधारीत असलेला एक चित्रपट प्रसारीत केल्याबद्दल युट्यूबवर देशात बंदी घातली होती. या चित्रपटामुळे अनेक मुस्लिम राष्ट्रात हिंसक आंदोलने झाली होती.

Story img Loader