संजय जाधव
फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये जिकडे पाहाल तिकडे ई-स्कूटर दिसायच्या. या स्कूटर तेथील नागरिक आणि पर्यटकांच्या अंगवळणी पडल्या होत्या. जवळच्या अंतरावरील प्रवासासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेपेक्षा ई-स्कूटरला प्राधान्य दिले जाई. प्रवासाचे त्या अतिशय लोकप्रिय आणि सोईचे साधन ठरल्या. परंतु, यापुढे पॅरिसमध्ये ई-स्कूटरवररून फेरफटका मारता येणार नाही. शहरात सार्वजनिक वापरासाठीच्या सुमारे १५ हजार ई-स्कूटर असून, त्या बंद कराव्यात की नाही यासाठी जनमत घेतले गेले. त्यातून मिळालेल्या कौलानुसार पॅरिसमधून ई-स्कूटर हद्दपार झाल्या आहेत.
ई-स्कूटरला लोकप्रियता कशामुळे?
ई-स्कूटर या केवळ पॅरिसच नव्हे तर जगभरातील अनेक प्रमुख देशांमध्ये वापरल्या जातात. शहरांतर्गत प्रवासासाठी छोटी असलेली इलेक्ट्रिक स्कूटर सोईची ठरते. पॅरिसमध्ये मोबाईल उपयोजनाच्या साह्याने तिचा वापर करता येत होता. ती कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध होत होती. तिचे भाडे कमी असल्यामुळे स्वत:चे वाहन परवडत नाही, असे स्थानिक नागरिक आणि पर्यटक तिला पसंती देत. ई-स्कूटरला पॅरिसवासीयांनी पाच वर्षांत केवळ स्वीकारले नाही तर ती त्यांच्या अंगवळणी पडल्याचे चित्र होते. मेट्रो आणि इतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेपेक्षा ई-स्कूटरला अधिक पसंती होती.
नेमकी समस्या काय?
शहर प्रशासनाने ई-स्कूटरवर बंदी घालण्यासाठी अनेक कारणे दिली आहे. शहरांचा सौंदर्याला कुठेही उभ्या केलेल्या ई-स्कूटरमुळे बाधा येते, असा मुख्य दावा होता. याचबरोबर ई-स्कूटरमुळे शहरातील वाहतुकीचा बोजवारा उडतो, असा दावा महापौर ॲनी हिडाल्गो यांनी केला होता. ई-स्कूटर ही कुठूनही उचलली जाते आणि कुठेही सोडली जाते. ती भाड्याने घेणारा त्याच्या मर्जीप्रमाणे ई-स्कूटर रस्त्यावर सोडतो. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. पुढील वर्षी पॅरिसमध्ये ऑलिम्पिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यासाठी शहर प्रशासनाने कंबर कसली होती. शेकडो अपघातास ई-स्कूटर कारणीभूत ठरत आहेत. पादचारी, दुचाकीस्वार अथवा बसने प्रवास करणारे यांच्यापेक्षा ई-स्कूटर चालवणारे पर्यावरणाची अधिक हानी करीत आहेत. गर्दीच्या ठिकाणी कशाही पद्धतीने ते ई-स्कूटर चालवतात, असा दावाही शहर प्रशासनाने केला होता.
अपघातांच्या प्रमाणात वाढ?
ई-स्कूटर पर्यटकांच्या हाती देण्यास सुरूवातीपासून नागरिकांच्या काही गटांनी विरोध केला होता. पॅरिसमधील रस्ते, वाहतूक याची पुरेशी माहिती नसताना ई-स्कूटर पर्यटकांना दिल्याने अपघाताचा धोका वाढतो. अनेक पर्यटक रस्ता सोडून पदपथावरून ई-स्कूटर चालवतात. गर्दीच्या ठिकाणी पादचाऱ्यांमध्येही ई-स्कूटरवरून फिरणारे पर्यटक दिसतात. यामुळे एकूणच शहराच्या शिस्तीला तडे जातात, असा युक्तिवाद यासाठी केला जात होता. याचबरोबर या स्कूटरमुळे अपघातांचे प्रमाण वाढल्याचाही दावा केला जात होता. या स्कूटरचा वेग ताशी २७ किलोमीटर असून, १२ वर्षांवरील मुलांनाही ती चालवण्याची परवानगी आहे. पॅरिसमध्ये २०२१ मध्ये इटलीतील पर्यटक महिलेचा ई-स्कूटरने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला होता. तेव्हापासून ई-स्कूटरचे अपघात चर्चेत आले. मागील वर्षाचा विचार करता ई-स्कूटरमुळे झालेल्या अपघातांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून, ४५९ जण जखमी झाले आहेत.
जनतेचा कौल काय?
पॅरिसमध्ये भाड्याने ई-स्कूटर वापरण्यास देणाऱ्या तीन कंपन्या आहेत. या कंपन्यांच्या ई-स्कूटरचा मागील वर्षी तब्बल २० लाख लोकांनी वापर केला आहे. त्यांचा वापर करणाऱ्या पॅरिसवासीयांपैकी ७१ टक्के ३५ वर्षांच्या आतील आहेत. या कंपन्यांकडून सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा वापर करून जनमत कौल आपल्या बाजूने करण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. त्यांच्याकडून नागरिकांना मोफत ई-स्कूटर वापरण्यास देऊन बाजूने मतदान करण्याचे आवाहनही करण्यात आले. परंतु, अखेर मतदारांनी या स्कूटरवर बंदी घालण्याचा कौल दिला. यात तब्बल ९० टक्के मतदारांनी ई-स्कूटरवर बंदी घालण्याच्या बाजूने कौल दिला. शहरात १३.८ लाख मतदार असून, यातील केवळ १ लाख ३ हजार मतदारांनी या प्रक्रियेत सहभागी झाले. त्यातील ९१ हजार ३०० जणांनी बंदीच्या बाजूने मत दिले. सार्वजनिक वापराच्या ई-स्कूटरवर बंदी आली असून, सप्टेंबर महिन्यापासून पॅरिसची रस्त्यांवर ई-स्कूटर दिसणार नाही. असे असले तरी खासगी ई-स्कूटरच्या वापरास परवानगी असणार आहे. मात्र, पॅरिसनंतर जगातील इतर मोठ्या शहरांमध्ये याचे अनुकरण केले जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
sanjay.jadhav@expressindia.com