२१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त श्रीनगरमध्ये केलेल्या भाषणात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरचे वर्णन “योग आणि ध्यानाची भूमी” असे केले. त्याच पार्श्वभूमीवर योगाभ्यास आणि काश्मीर खोऱ्याचा ऐतिहासिक आणि आध्यात्मिक संबंध काय आहे? हे जाणून घेणे समयोचित ठरणारे आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काश्मीरचा त्रिक शैव संप्रदाय

इसवी सन ८५० च्या सुमारास काश्मीरमध्ये एक अनोखी शैव परंपरा निर्माण झाली. उत्तर भारतावर मुस्लिमांचे आक्रमण होण्यापूर्वी गुर्जर-प्रतिहार या राजवंशानी तिथे राज्य केले होते, ते शेवटचे हिंदू- भारतीय राजे होते. त्यांनी उत्तर भारतातील मोठ्या भूभागावर राज्य केले होते.

अधिक वाचा: विश्लेषण: काश्मीरमधील १६०० वर्षे जुने मार्तंड सूर्यमंदिर उद्ध्वस्त करणारा ‘तो’ परकीय आक्रमक कोण?

काश्मीरच्या शैव तत्त्वज्ञानाचा प्रसार १० व्या शतकातील विख्यात तत्त्वज्ञ अभिनवगुप्ताने काश्मीर खोऱ्याच्या पलीकडे केला. त्याने ‘त्रिक’ ही संकल्पना मांडली होती. त्यामुळेच काश्मीर शैव संप्रदायाला ‘त्रिक शैववाद’ असेही म्हणतात. योगाचे तत्वज्ञान हे त्रिक शैवसंप्रदायाचे अविभाज्य अंग आहे. या परंपरेने गोरक्षनाथांच्या नाथ आणि संन्यासींच्या दशनामी संप्रदायातील हठ-योगासारख्या परंपरेला महत्त्वाचा छेद दिला. त्रिक योग साधनेत तांत्रिक परंपरेची दीक्षा घेणे महत्त्वाचे होते. मालिनीविजयोत्तर तंत्र याविषयीच्या माहितीसाठीचा प्रमुख स्रोत आहे. या ग्रंथात दीक्षेचे महत्त्व स्पष्ट केले आहे. दीक्षेशिवाय शैव योगासाठी इतर कोणतीही पात्रता नाही असे या ग्रंथात म्हटलेले आहे. या ग्रंथात असेही म्हटले आहे की, ज्याने मनावर विजय मिळवला आहे. ज्याने चेतनेवर नियंत्रण ठेवले आहे, इंद्रियांना वश केले आहे, झोपेवर विजय मिळवला आहे, क्रोध आणि दुःखावर मात केली आहे आणि जो कपटमुक्त आहे. अशा योग्याने सर्व अडथळ्यांपासून मुक्त शांत, प्रसन्न असलेल्या ठिकाणी, गुहेत किंवा मातीच्या झोपडीत योगाभ्यास करावा. (द योगा ऑफ द मालिनीविजयोत्तर तंत्र, अनुवाद: सोमदेव वासुदेव)

अभिनवगुप्त आणि ललितादित्य मुक्तपिडा

काही विद्वानांच्या मते, काश्मीर हे नाव वैदिक परंपरेतील सप्त प्राचीन ऋषींपैकी एक असलेल्या कश्यप ऋषींच्या नावावरून आले आहे. याच संदर्भांनुसार काश्मीर हा भाग कश्यप मीरा किंवा ऋषी कश्यपांच्या तलावाचा आहे. काश्मीरच्या योगिक परंपरा देखील पूज्य ऋषींनी केलेल्या ध्यान आणि आध्यात्मिक पद्धतींमधून निर्माण झाल्या आहेत असे मानले जाते. असे असले तरी काश्मीरच्या योग परंपरेचा विचार करताना एक गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे, ती म्हणजे अभिनवगुप्त हा या परंपरेचा केंद्रबिंदू आहे, त्याचा तंत्रलोक हा ग्रंथ तंत्र तत्त्वज्ञानासाठी प्रमुख मानला जातो, या तंत्रलोक ग्रंथाच्या ३७ अध्यायांमध्ये कौल आणि त्रिक परंपरांविषयी सविस्तर विवेचन केलेले आहे. अभिनवगुप्ताची शिकवण आणि तत्त्वज्ञान हे शारीरिक आसनांच्या पलीकडे, मानसिक आणि आध्यात्मिक शिस्तबद्धतेचा पाया घालणारे आहे.

अधिक वाचा: ज्ञानवापी मशिदीचे सत्य ‘या’ ब्रिटिश विद्वानाने आणले समोर? काय सांगते त्याचे संशोधन? 

अभिनवगुप्त

अभिनवगुप्ताचा जन्म इ.स. ९५० मध्ये एका सारस्वत ब्राह्मण कुटुंबात झाला. त्याला जन्मतः शिवाचे नाव देण्यात आले होते. परंतु त्याची योग्यता आणि अधिकार यांना अनुसरून त्याच्या गुरूंनी त्याला अभिनवगुप्त हे नाव बहाल केले. अभिनवगुप्ताचे कुटुंब मूळचे कन्नौजचे होते आणि त्याचे पूर्वज काश्मीरचा राजा ललितादित्य मुक्तपिडा यांच्या आमंत्रणावरून काश्मीरमध्ये स्थलांतरित झाले. ललितादित्याने इसवी सन ७२४ ते ७६० या कालखंडात राज्य केल्याचे मानले जाते. मराठी विश्वकोशातील संदर्भानुसार अभिनवगुप्ताच्या पूर्वजांपैकी अत्रिगुप्त हा अंतर्वेदीत, म्हणजे गंगा आणि यमुना या नद्यांच्या दुआबात, राहत असे. याच्या विद्वत्तेने प्रभावित होऊन ललितादित्याने त्याला काश्मीरमध्ये येण्याचे आमंत्रण दिले होते. अभिनवगुप्ताच्या पित्याचे नाव नृसिंहगुप्त किंवा नरसिंहगुप्त असे होते. तथापि तो चुखल या नावानेच ओळखला जाई. विमलकला अथवा विमला हे त्याच्या आईचे नाव असून त्याच्या धाकट्या भावाचे नाव मनोरथगुप्त असे होते. त्याच्या कुटुंबातच ज्ञानोपासनेची परंपरा होती. अभिनवगुप्ताला ‘म्‌हामाहेश्वर’ आणि ‘आचार्यपद’ अशा गौरवयुक्त पदव्या प्राप्त झाल्या होत्या. त्याच्या नावावर चाळिसहून अधिक ग्रंथ आहेत. त्याच्या ग्रंथांचे सर्वसाधारणतः चार वर्ग करण्यात येतात. तंत्र आणि प्रत्यभिज्ञादर्शन या दोन्ही विषयांवरील अभिनवगुप्ताचे ग्रंथ तद्विषयक अभ्यासास प्रमाणभूत मानले गेले आहेत. साहित्यशास्त्रात ध्वनिमताचा पुरस्कर्ता म्हणून अभिनवगुप्ताचे नाव विख्यात आहे. याशिवाय काश्मीरात अशी आख्यायिका रूढ आहे, की अभिनवगुप्त आपल्या बाराशे शिष्यांना बरोबर घेऊन भैरवस्तोत्र म्हणत एका गुहेत शिरला आणि त्यानंतर पुन्हा कोणास दिसला नाही. ही गुहा श्रीनगरच्या नैर्ऋत्येस सुमारे २१ किमी. अंतरावर असलेल्या भैरव या ठिकाणी दाखविण्यात येते

ललितादित्य मुक्तपिडा

१२ व्या शतकातील कल्हणाच्या राजतरंगिणीमधून ललितादित्याबद्दल माहिती मिळते. हा राजा दिग्विजय असण्याखेरीज, कला आणि संस्कृतीचा संरक्षक होता. तसेच त्याला मार्तंड सूर्य मंदिराचा निर्माता, तांत्रिक योगाच्या परंपरा आणि तत्त्वज्ञानाचा प्रचारक आणि प्रसाराकही मानले जाते. त्याच्याच राजाश्रयामुळे योगिक परंपरा ध्यान करणाऱ्या ऋषींच्या जगातून बाहेर पडून सर्वसामान्य जनतेत लोकप्रिय झाली.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why has pm modi called kashmir the ancient land of yoga and meditation what exactly is the relationship between kashmir and yoga philosophy svs