तेलंगणा सरकारने अलीकडील आरोग्यविषयक आव्हानांचा सामना करण्यासाठी कच्च्या अंड्यांपासून तयार होणार्या मेयोनीजवर बंदी घातली आहे. मेयोनीजचा लोकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे हैदराबादमधील अहवालामध्ये आढळून आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याच्या अन्न सुरक्षा आयुक्तांनी बुधवारी एक आदेश जारी करून अंडी-आधारित मेयोनीजच्या साठवणूक आणि विक्रीवर एक वर्षासाठी बंदी घातली आहे. अंड्यापासून तयार होणार्या मेयोनीजचा आजारांशी काय संबंध? बंदी घालण्यामागील नेमकी कारणं काय? त्याविषयी जाणून घेऊ.
अन्न विषबाधेची वाढती प्रकरणे
हैदराबादमध्ये अलीकडेच स्थानिक भोजनालयांशी संबंधित अन्न विषबाधा प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढ दिसून आली आहे; ज्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हैदराबादच्या बंजारा हिल्समधील रस्त्यावरील विक्रेत्याकडून मोमोज खाल्ल्यानंतर ३१ वर्षीय रेश्मा बेगम आणि तिच्या १२ व १४ वर्षांच्या दोन मुलींना अन्नाची विषबाधा झाली. ‘लाइव्हमिंट’च्या वृत्तानुसार, कुटुंबात त्वरीत उलट्या, अतिसार आणि ओटीपोटात दुखणे यासारखी लक्षणे दिसू लागली. त्यांनी २७ ऑक्टोबर रोजी त्यांची लक्षणे वाढल्यावर वैद्यकीय मदत घेतली. दुर्दैवाने, रेश्माचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला, तर तिच्या मुलींवर उपचार सुरू आहेत. अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत असे आढळून आले की, जवळपासच्या भागातील आणखी २० रहिवाशांनादेखील त्याच विक्रेत्याकडून अन्न खाल्ल्यानंतर तीच लक्षणे दिसून आली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर आरोग्य अधिकाऱ्यांनी शहरभर छापे टाकण्यास सुरुवात केली आहे, विशेषत: शवरमा आणि मंडी आउटलेटवर. काही दिवसांपूर्वी शवरमा आउटलेटमध्ये अशाच प्रकारच्या अन्न विषबाधेची प्रकरणे आढळून आली होती.
हेही वाचा : आयुष्मान योजनेसाठी तुमच्या आई-वडिलांची नोंदणी कशी करायची? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
मेयोचा अन्न विषबाधेशी संबंध कसा?
मेयोनीजला सामान्यतः ‘मेयो’ असे संबोधले जाते, जे अंड्यापासून तयार केले जाते आणि पांढर्या रंगाचे असते. बहुतेक वेळा त्याला व्हिनेगर किंवा लिंबाच्या रसाची चव दिली जाते. हे मेयो सँडविच, सॅलेड्स, मोमोज, शावरमा आणि चिकन यांसह विविध पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. त्याचे शेल्फ लाइफ लहान आहे आणि अयोग्यरित्या याची साठवणूक केली तर बॅक्टेरियाच्या वाढीचा धोका उद्भवतो, असे अन्नतज्ज्ञांचे सांगणे आहे. तेलंगणातील अन्न सुरक्षा विभागाच्या संचालक डॉ. शिवलीला यांच्या मते, अंड्यांपासून तयार होणार्या मेयोनीजमुळे विशिष्ट धोका निर्माण होतो. साऊथ फर्स्टला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी स्पष्ट केले, “कधीकधी कच्च्या अंड्यातून तयार होणाऱ्या मेयोनीजला योग्यप्रकारे साठवले न गेल्यास त्यामध्ये साल्मोनेला नावाचे जीवाणू तयार होऊ शकतात; ज्यामुळे मळमळ, उलट्या आणि अतिसाराचा त्रास होऊ शकतो.”
साल्मोनेला अन्नजन्य आजारांना कारणीभूत ठरणारा जीवाणू आहे. हा जीवाणू अंड्यांच्या कवचावर असू शकतो. व्यावसायिक मेयोनीज जेव्हा तयार केले जातात, तेव्हा त्यात कॅल्शियम डिसोडियम ईडीटीए आणि पाश्चराइज्ड अंडी यांचा वापर केला जातो. घरगुती मेयो तयार करण्यासाठी अनेकदा कच्च्या, पाश्चराइज्ड अंड्यांचा वापर केला जातो.
तेलंगणात मेयोनीजवर बंदी
बुधवारी, तेलंगणा सरकारने संपूर्ण राज्यात कच्च्या अंड्यापासून तयार करण्यात येणार्या मेयोनीजवर अधिकृतपणे बंदी घातली. “अंमलबजावणीच्या क्रियाकलापांदरम्यान निरीक्षणांनुसार आणि लोकांकडून आलेल्या तक्रारींनुसार, कच्च्या अंड्यांपासून तयार मेयोनीज गेल्या काही महिन्यांत अनेक घटनांमध्ये अन्न विषबाधाचे कारण असल्याचा अंदाज आहे,” असे प्रतिबंध आदेशात म्हटले आहे. अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत अधिकार्यांना कारवाई करण्याचा अधिकार आहे. अन्न सुरक्षा आयुक्तांनी मेयोनीजच्या उत्पादन, साठवणूक आणि विक्रीवर बंदी घालण्याचे आदेश दिले.
हेही वाचा : ‘या’ देशातील श्रीमंत लोक देश सोडून का जात आहेत? श्रीमंतांच्या संपत्तीत घट होण्याचे कारण काय?
सरकारी अधिसूचनेत असेही म्हटले आहे की, जेव्हा जेव्हा चिंतेचे वाजवी कारण असेल, तेव्हा लोकांना अन्न उत्पादनांशी संबंधित संभाव्य आरोग्य जोखमींबद्दल सतर्क केले जाईल. अधिकाऱ्यांनी खाद्य आस्थापना आणि ग्राहकांना या नवीन नियमाचे पालन करण्यास आणि कच्ची अंडी वगळून पर्यायी अंड्यातील बलक पर्यायांचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. २०२३ मध्ये केरळ हे कच्च्या अंड्यांपासून तयार करण्यात येणार्या मेयोनीजवर बंदी घालणारे पहिले भारतीय राज्य ठरले.