या सप्टेंबर महिन्यात मुंबई शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्सने ८२,७२५.२८ अंशांची सर्वोच्च पातळी गाठली तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने २५,३३३.६५ या ऐतिहासिक पातळीला स्पर्श केला. सलग १४ सत्रांत मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये भर पडली. मात्र विद्यमान आठवड्यात सलग तिसऱ्या सत्रांत मंदीवाले पुन्हा सक्रिय झाले असून सेन्सेक्सने ८२,००० आणि निफ्टीने २५,००० अंशांची महत्त्वपूर्ण पातळी मोडली आहे. या तीन सत्रांतील मोठ्या पडझडीमागची नेमकी करणे काय आहेत, पडझड अशीच सुरू राहणार का, याबाबत जाणून घेऊया…

सलग तीन सत्रांतील घसरणीमागील कारणे काय?

देशांतर्गत भांडवली बाजारातील सततच्या घसरणीला दोन प्रमुख कारणे आहेत. ते म्हणजे अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हच्या बैठकीपूर्वीची अनिश्चितता आणि मुंबई शेअर बाजार अर्थात ‘दलाल स्ट्रीट’वर जादा खरेदीची परिस्थिती. अमेरिकी चलनवाढीच्या सरासरीमध्ये सुधारणा केल्यानंतर डॉलरचे मूल्य रुपयासह परदेशी चलनांच्या तुलनेत वधारले आहे. याबरोबरच कमकुवत अमेरिकी रोजगार आकडेवारी आणि बेरोजगार दाव्यांमधील वाढीमुळे गेल्या तीन सलग सत्रांमध्ये शेअर बाजारात पडझड होते आहे.

हेही वाचा – विश्लेषण : मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी का होते? आणखी दोन वर्षे विघ्न कायम?

गुंतवणूकदारांना किती झळ?

सेन्सेक्समध्ये दुपारच्या सत्रात १,००० अंशांची घसरण झाली आणि तो ८१,३०० अंशांच्या पातळीपर्यंत खाली आला. दरम्यान, निफ्टी५० देखील २४,९०० पातळीच्या खाली घसरला. परिणामी मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ४.८ लाख कोटी रुपयांनी घसरून ४६०.८५ लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आले आहे. निर्देशांकात सर्वाधिक योगदान राखणाऱ्या, रिलायन्स इंडस्ट्रीज, स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक, एल अँड टी, इन्फोसिस, आयटीसी, एचसीएल टेक आणि एचडीएफसी बँक या कंपन्यांच्या समभागांमधील घसरणीने निर्देशांकांना अधिक कमकुवत केले. याबरोबर बँकिंग क्षेत्रात सर्वाधिक पडझड झाली. बँक कर्ज आणि ठेवींमधील वाढती दरी बँकिंग क्षेत्रासाठी चिंतेचा विषय बनली आहे. रिझर्व्ह बँकेच्या ताज्या आकडेवारीनुसार, जून २०२४ अखेर सरलेल्या तिमाहीत ठेवी ११.७ टक्क्यांनी वाढल्या आहेत, तर कर्ज वितरण (पत पुरवठा) १५ टक्क्यांनी वाढले आहे. ठेव आणि पत वाढ यांच्यातील या वाढत्या दरीमुळे संभाव्य तरलता समस्यांबाबत चिंता वाढली आहे.

आगामी फेडरल रिझर्व्ह बैठक का महत्त्वाची?

अमेरिकेच्या वायोमिंग राज्यातील जॅक्सन होल या गावात ‘फेड’ची नुकतीच परिषद पार पडली त्यात अमेरिकी मध्यवर्ती बँक ‘फेडरल रिझर्व्ह’चे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी व्याजदर कपातीची वेळ जवळ येऊन ठेपली आहे, असे सांगत व्याजदर कपातीचे स्पष्ट संकेत दिले होते. त्याचे जगभरातील भांडवली बाजारावर सकारात्मक पडसाद उमटले. आता चालू सप्टेंबर महिन्यात अमेरिकी फेडरल रिझर्व्ह बैठक पार पडणार आहे. मात्र अमेरिकी अर्थव्यवस्थेशी निगडित प्रतिकूल आकडेवारीमुळे व्याजदर कपातीबाबत अजूनही अनिश्चितता कायम आहे. याबाबत ‘प्रॉफिटमार्ट सिक्युरिटीज’चे संशोधन प्रमुख अविनाश गोरक्षकर म्हणाले की, ‘फेडरल रिझर्व्ह’ने व्याजदर दरात पाव टक्क्याची (२५ आधारबिंदू) कपात केल्यास देशांतर्गत भांडवली बाजारावर त्याचा फारसा परिणाम होणार नाही. मात्र ५० आधारबिंदू किंवा त्यापेक्षा अधिक व्याजदर कपात केल्यास जगभरातील भांडवली बाजारांना अतिरिक्त इंधन मिळेल.

भारतीय शेअर बाजार महाग आहे?

भारतासहित विकसित आणि विकसनशील देशातील बाजारांचा अभ्यास केल्यास अमेरिकी भांडवली बाजारातील निर्देशांक नॅसडॅक आणि एस अँड पी ५०० यानंतर भारताचा आघाडीचा निर्देशांक निफ्टी-५० महाग निर्देशांकापैकी एक आहे. म्हणजेच कंपन्यांचा वाढत असलेला नफा आणि शेअरची वाढत असलेली किंमत यांच्यात अंतर मोठे आहे. अजून सोप्या भाषेत समजून घ्यायचे झाले, तर शेअरची किंमत ज्या दराने वाढते आहे त्या दराने कंपनीचा नफा वाढेल की नाही, अशी शंका घेता येईल. याचाच अर्थ तुम्ही विकत घेत असलेल्या शेअरची किंमत वाढते आहे म्हणजे ही कंपनी ‘ओव्हर व्हॅल्यूड’ आहे असा त्याचा अर्थ काढला जातो. सध्या देशांतर्गत भांडवली बाजारात अशीच परिस्थिती उद्धवली आहे. सरलेल्या सलग दोन आठवड्यात म्हणजेच बुधवारी देशांतर्गत भांडवली बाजारात समभाग विक्री सुरू होण्यापूर्वी, सेन्सेक्स सलग १४ दिवस तेजीत होता. त्यामुळे, भारतीय शेअर बाजारात ‘ओव्हर व्हॅल्यूएशन’ची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शुक्रवारच्या सत्रात सेन्सेक्समध्ये झालेली १,००० अंशांची घसरण नफावसुलीमुळे (प्रॉफिट बुकिंग) देखील झाली आहे.

डॉलर निर्देशांक किती कारणीभूत?

गेल्या काही सत्रात अमेरिकी डॉलर इतर देशांच्या चलनांच्या तुलनेत वधारला आहे. गेल्या आठवड्यात अमेरिकी महागाईच्या सरासरीमध्ये सुधारणा केल्यानंतर, डॉलरची मागणी वाढली आहे. ज्यामुळे अमेरिकी डॉलर निर्देशांकाने ७ महिन्यांच्या खालच्या पातळीला स्पर्श केल्यानंतर पुन्हा उसळी घेतली आहे. डॉलर निर्देशांक सध्या १०१ पुढे पोहोचला आहे, गेल्या तीन सत्रात तो १ टक्क्याहून अधिक वधारला आहे. परदेशी चलन बाजार मंचावर डॉलरची मागणी वाढली असून रोखे परताव्यावरील दरात देखील वाढ झाली आहे.

हेही वाचा – शिवरायांच्या शिल्पकृतीत कपाळावरील जखमेच्या खुणेने नवा वाद; पुतळ्यावर खूण दाखवण्याचे कारण काय?

अमेरिकेत आर्थिक मंदीचे संकेत?

अमेरिकेतील नागरिकांना आणि व्यवसायांना येत्या काही दिवसांत प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागेल. परिणामी अमेरिकेत मंदी येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. महागाई कमी करण्यासाठी म्हणजे वस्तू-सेवांच्या किमती कमी करण्यासाठी ‘फेड’कडून करण्यात येणाऱ्या प्रयत्नांमुळे रोजगाराच्या संधीदेखील गेल्या काही काळात घटल्याने त्याचा एकंदर परिणाम निदर्शनास येतो आहे. अमेरिकेतील रोजगारासंबंधित आकडेवारी समाधानकारक नसल्याने चलनवाढीच्या चिंतेची भीती पुन्हा निर्माण झाली आहे, ज्यामुळे ‘फेड’ व्याजदर कपातीच्या निर्णयावर पुनर्विचार करण्यास भाग पाडले जाऊ शकते. शिवाय जरी व्याजदर कपातीबाबत निर्णय घेण्यात आल्यास, आगामी दर कपात २५ आधारबिंदूपेक्षा अधिक नसेल, असा अंदाज बाजारातील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. जुलैमध्ये अमेरिकेत नवीन रोजगाराच्या संधी सध्या साडेतीन वर्षांच्या नीचांकी पातळीवर घसरल्या आहेत, ज्यामुळे ‘यूएस लेबर मार्केट’मध्ये मंदीचे लक्षण दिसून येत आहे.

भारतीय भांडवली बाजारावर काय परिणाम?

अमेरिकेत व्याजाचे दर कमी झाले नाहीत तर परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (एफआयआय) पुन्हा स्वदेशी गुंतवणूक करण्यातच धन्यता मानेल. कारण भारतीय भांडवली बाजारापेक्षा अमेरिकेतील भांडवली बाजार त्यांच्यासाठी अधिक आकर्षक आहे. गेल्या ऑगस्ट महिन्यात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार निव्वळ विक्रेते बनले आहेत. आता मात्र ‘फेड’ने पुन्हा एकदा व्याजदर ‘जैसे थे’च राखले तर परदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजाराकडे पाठ फिरवण्याची शक्यता आहे. तसेच परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी २०२४ या वर्षात आतापर्यंत ४४ हजार कोटींचे शेअर विकले आहेत. या उलट भारतातील गुंतवणूकदारांनी दोन लाख कोटी रुपयांचे शेअर खरेदी केले आहेत, याचाच अर्थ शेअर बाजार तरले जात आहेत. मात्र देशांतर्गत आघाडीवर हिंडेनबर्ग-सेबी वाद, अनिल अंबानींवर सेबीकडून कारवाई याबरोबरच मिडकॅप आणि स्मॉलकॅप कंपन्यांच्या वाढलेल्या मूल्यांकनाबाबत सेबीने चिंता व्यक्त केली आहे.