हिरेजडित दागिने परिधान करणे, हे प्रत्येक महिलेचे स्वप्न असते. मग ती महिला जगाच्या पाठीवरील कोणत्याही देशातील का असेना. पण ब्रिटनने मात्र हिऱ्यांवर बंदी घातली आहे, विशेषतः रशियावरून येणाऱ्या हिऱ्यांवर. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी याची घोषणा केली. युक्रेन-रशियाच्या युद्धामुळे त्यांनी व्लादिमिर पुतिन यांच्याविरोधात आघाडी उघडली असून रशियाहून आयात होणाऱ्या हिऱ्यांवर बंदी घातली. युक्रेनला पाठिंबा देण्यासाठी सुनक यांनी ही योजना आखली, ज्याला आता जी-७ देशांनीही मंजुरी दिली असून हिरोशिमा येथे झालेल्या बैठकीत जी-७ देश युक्रेनसोबत असल्याचा संदेश दिला. हिऱ्यांसोबतच रशियातून आयात होणारे तांबे, ॲल्युमिनियम आणि निकेलवरही बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र यूकेने रशियाच्या हिऱ्यांवर बंदी घातली असली तरी रशियाचे कच्चे हिरे भारतात आयात होतात. इथे त्यांच्यावर पॉलिश केल्यानंतर हे हिरे जगभरात निर्यात केले जातात. त्यामुळे रशियाचे फारसे नुकसान होणार नाही, असा अंदाज या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
हिरोशिमा येथील जी-७ देशांच्या बैठकीत ऋषी सुनक यांनी यूकेला संबोधित करताना सांगितले, “हिंसाचार आणि बळजबरीला कोणताही लाभ मिळता कामा नये.”
रशियातून हिऱ्यांची निर्यात किती प्रमाणात होते, या बंदीमुळे रशियन हिरे व्यापारावर काही परिणाम होईल का? याचा आढावा फर्स्टपोस्ट या वेबसाइटने घेतला आहे. त्याबद्दलची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.
रशिया हिऱ्यांचा मोठा निर्यातदार
१९५० साली रशियन प्रजासत्ताक याकुटिया प्रदेशातील बर्फाच्छादित टुंड्रा प्रांतात पहिल्यांदा हिरे सापडले होते. या शोधामुळे पूर्वीच्या सोव्हिएत युनियनला हिऱ्यांचा एक महत्त्वपूर्ण देश मानले गेले. आजच्या घडीला रशिया हिऱ्यांनी समृद्ध असलेला देश तर आहेच, त्याशिवाय हिऱ्यांचे व्यापार केंद्र, उत्पादन, संशोधन आणि हिरे वापरण्यातही रशिया सर्वात पुढे आहे.
ऑब्जर्व्हेटरी ऑफ इकॉनॉमिक कॉम्प्लेक्सिटी या संस्थेने उपलब्ध करून दिलेल्या आकडेवारीनुसार रशियाने २०२१ साली केवळ हिऱ्यांची निर्यात करून ४.७ अब्ज डॉलर्सची कमाई केली होती. एवढेच नाही तर युक्रेनविरोधात युद्ध छेडल्यानंतरही रशियाची हिऱ्यांमधून कमाई सुरूच होती. आणखी एका माहितीनुसार, २०२२ साली युरोपियन युनियनने जवळपास १.५ अब्ज डॉलर्स किमतीचे हिरे रशियातून आयात केले होते. २०२१ मध्ये त्यांनी १.९ अब्ज डॉलर्सची आयात केली होती. युक्रेन युद्धामुळे यात केवळ किंचित घसरण झाली.
बेल्जियम देश रशियाकडून सर्वाधिक हिऱ्यांची आयात करतो. मात्र युरोपियन युनियनने बंदी घालण्याचा निर्णय घेतल्यानंतर बेल्जियमही हिऱ्यांची आयात करताना विचार करण्याची शक्यता आहे. यामुळे बेल्जियममधील हिऱ्यांचा जागतिक दर्जाचा बाजार असलेल्या अँटवर्प शहराला याचा चांगलाच तोटा सहन करावा लागू शकतो. त्याचप्रमाणे बेल्जियम अर्थव्यवस्थेलाही याचा फटका बसण्याची शक्यता आहे. जानेवारी २०२३ मध्ये बेल्जियमने १३२ दशलक्ष युरो किमतीचे हिरे रशियाहून आयात केले होते. जानेवारी २०२२ मध्ये आयातीची आकडेवारी ९७ दशलक्ष युरो एवढी होती.
रशियाचे हिरे ब्लड डायमंड?
जेव्हापासून रशियाने युक्रेनवर हल्ला केला, तेव्हापासून युक्रेनकडून रशियाच्या हिऱ्यांवर बंदी घालण्याची मागणी करण्यात येत होती. त्यांचे म्हणणे होते की, रशियाचे हिरे हे Blood Diamonds आहेत. ब्लड डायमंड म्हणजे ज्या हिऱ्यांमुळे संघर्ष पेटला आहे. युद्धक्षेत्रात असलेल्या हिरे खाणीमधून काढलेल्या हिऱ्यांतून पैसे मिळवणे आणि त्या पैशांतून सैन्याला रसद पुरविणे, दहशतवाद पसरविणे आणि युद्धावर खर्च करण्यासाठी वापरण्याला ब्लड डायमंड म्हणतात.
रशियन संघाकडून उत्पादित होणाऱ्या कच्च्या हिऱ्यांचा ९९ टक्के भाग हा अलरोसा या हिरे खाण कंपनीकडून येतो. विशेष म्हणजे अलरोसा आणि क्रेमलिनचे जवळचे संबंध आहेत. अलरोसा कंपनीमधील एकतृतीयांश भाग थेट रशियन राज्याच्या मालकीचा आहे.
अलरोसाच्या खाणीतील कच्चे हिरे जगभरात निर्यात केले जातात. बेल्जियमचे अँटवर्प शहर त्यांचे मुख्य खरेदीदार आहे. तसेच भारतातील सुरत आणि दुबईतही मोठ्या प्रमाणात निर्यात होते. अलरोसाने आपल्या वेबसाइटवरील ग्राहकांची यादी काढून टाकली आहे. याचा शोध घेतल्यानंतर लक्षात आले की, जगातील मोठमोठे ज्वेलर्स त्यांचे ग्राहक होते. न्यू यॉर्कमधील लिओ शॅक्टर (Leo Schachter), टिफनी आणि कंपनी (Tiffany & Co.) हे अलरोसाच्या खरेदीदारांच्या यादीत असल्याचे सांगितले जाते.
रशियाच्या हिऱ्यांवर जगभरात बंदी आहे का?
सध्या तरी यूकेने रशियन हिऱ्यांवर बंदी घातली आहे. जी-सेव्हनमधील देशांनी सकारात्मकता दर्शविली असली तरी त्यांनी अंतिम निर्णय घेतलेला नाही. युरोपियन युनियन परिषदेचे अध्यक्ष चार्ल्स मायकेल यांनी सांगितले की, रशियाचे हिरे काही नेहमीसाठी नसणार आहेत, आम्ही त्यांच्या हिऱ्यांवर निर्बंध घालू.
बेल्जियमला मात्र हिऱ्यांवरील पूर्णपणे बंदीबाबत साशंकता आहे. रशियाच्या निर्यातीवर जगाने एकमताने निर्णय घ्यावा, असे त्यांचे म्हणणे आहे. सध्यातरी त्यांनी युरोपियन युनियनच्या निर्णयाला असहमती दर्शविली आहे. कारण या बंदीमुळे त्यांच्यावर परिणाम तर होणार नाही ना? याचा विचार बेल्जियम करत आहे.
बेल्जियम सरकारचे म्हणणे आहे की, अशा प्रकारच्या बंदीमुळे रशियाची हिरेनिर्यात ही दुसऱ्या देशांमध्ये वळविली जाईल. त्याचा रशियाच्या अर्थव्यवस्थेला काहीच धक्का पोहोचणार नाही. बेल्जियममधील अधिकाऱ्यांनी दाखवून दिले की, बंदीशिवायदेखील लोकांचा दबाव आणि ग्राहकांमधील जागरूकतेमुळे रशियाकडून होणारी आयात आकुंचन पावली आहे.
तसेच रशियामधील हिऱ्यांवर बंदी आणून पुतिन यांच्या अर्थव्यवस्थेला धक्का बसणार नाही, उलट यातून संदेश जाईल की, पाश्चिमात्यांना युक्रेनच्या आडून आपला राष्ट्रीय उद्देश पुढे रेटायचा आहे, असाही विचार बेल्जियमकडून मांडण्यात आला.
रशिया आणि भारतातील हिरे व्यापार
या प्रश्नाचे उत्तर थोडे गुंतागुंतीचे आहे. काही तज्ज्ञांच्या मतानुसार, जी-७ देशांनी जरी हिऱ्यांवर बंदी आणली तरी त्याला काही अर्थ नाही. रशियाकडून मोठ्या प्रमाणात कच्चे हिरे निर्यात केले जातात. कच्च्या हिऱ्यांचा मोठा हिस्सा भारतात येतो, इथे त्याच्यावर पॉलिश केले जाते. ९० टक्के हिऱ्यांवर भारतात काम होते. त्यामुळे पॉलिश्ड हिरे हे भारताकडून निर्यात होतात, रशियाकडून नाही.
रॅपनेट या जगातील नावाजलेल्या हिरे कंपनीचे संस्थापक मार्टिन रॅपपोर्ट म्हणाले की, अशा प्रकारची रशियावरील बंदी काहीच कामाची नाही. हिऱ्यांच्या व्यापारावर त्याचा काहीच परिणाम होणार नाही. रॅपनेट ही जगातील सर्वात मोठी ऑनलाईन हिरे व्यापार करणारी कंपनी आहे. रशियाकडून भारत आणि अमेरिकेत होणारी निर्यात अखंडितपणे सुरू आहे. यूकेची बंदी फार प्रभावी नाही. यामुळे रशियाच्या व्यापारावर काहीच परिणाम होणार नाही.
तंत्रज्ञानाच्या आधारावर अशी बंदी यशस्वी ठरू शकते. स्पेसकोड (Spacecode) नावाच्या तंत्रज्ञानामुळे हिऱ्याचे मूळ स्थान काय आहे, हे शोधणे शक्य झाले आहे. मात्र स्पेसकोड हे उपकरण या वर्षीच्या अखेरपर्यंत किंवा २०२४ मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे तोपर्यंत हिऱ्याचे मूळ शोधणे कठीण काम आहे. त्यामुळे रशियातून इतर देशांत कच्चे हिरे पाठवून त्या देशातून जगभरात त्यांचा व्यापार करणे सुरूच राहणार आहे.