सीरिया सीमेलगतच्या जॉर्डनमधील अमेरिकेच्या तळावर झालेल्या ड्रोन हल्ल्यात तीन अमेरिकन सैनिक मारले गेल्यामुळे दहशतवादी संघटनांनी या आयुधाचा आक्रमकपणे वापर सुरू केल्याचे स्पष्ट झाले आहे. हे तंत्रज्ञान कट्टरपंथीय दहशतवादी संघटनांच्या हाती आहे. असे हल्ले रोखण्यासाठी सुरक्षा दलांना वेगळी व्यूहरचना आखावी लागणार आहे. भविष्यातील युद्धे प्रामुख्याने ड्रोनवर आधारित असतील. एक प्रकारे ड्रोन युद्धाची ही नांदी असून बहुआयामी मानवरहित प्रणालींनी आपले सामर्थ्य वाढविण्याची जागतिक पातळीवर स्पर्धा लागली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय घडले ?

जॉर्डन-सीरिया सीमेवर ‘टॉवर २२’ या ठिकाणी अमेरिकेचा लष्करी तळ आहे. तेथून सीरियात तैनात अमेरिकन सैन्याला रसद पुरवठा केला जातो. या तळावर सैनिक ज्या कक्षात झोपले होते, तिथे ड्रोनने हल्ला करण्यात आला. ज्यात तीन अमेरिकन सैनिकांचा मृत्यू तर सुमारे ३४ जण जखमी झाले. हा हल्ला सीरियातून झाल्याचे जॉर्डनचे म्हणणे आहे. इस्रायल-हमास दरम्यान युद्धाला तोंड फुटल्यापासून या क्षेत्रातील एखाद्या हल्ल्यात अमेरिकन सैनिकाचा मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ आहे. अमेरिकेने त्यासाठी कट्टरपंथीय इराण समर्थक अतिरेकी गटांना जबाबदार धरीत प्रत्युत्तराचा इशारा दिला, तर इराण ड्रोन हल्ल्यात आपला सहभाग नसल्याचा दावा करत आहे. गेल्या वर्षी इराणमधील अनेक अतिरेकी गट एका छताखाली कार्यरत झाले. त्यांनी अमेरिकेच्या तीन तळांवर हल्ला केल्याचे म्हटले आहे. इराकने हल्ल्याचा निषेध करत या क्षेत्रातील हिंसाचार संपुष्टात आणण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा : अर्थसंकल्प २०२४ : मुलींना सर्वाइकल कॅन्सरपासून वाचवण्यासाठी केंद्र सरकारची मोठी घोषणा; लवकरचं सुरु करणार लसीकरण मोहीम, वाचा सविस्तर…

लष्करी कारवाईला ड्रोनमुळे वेगळे वळण कसे?

गुप्त माहिती मिळवणे, टेहळणी आणि शत्रू प्रदेशात पाहणीतून शत्रुची ठावठिकाणे शोधण्यासह तोफखान्याच्या माऱ्याची पडताळणी (आयएसआर) आदी मोहिमेत मानवरहित विमान अर्थात ड्रोन अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. उच्च क्षमतेचे कॅमेरे आणि संवेदकांनी सुसज्ज ड्रोनकडून प्रत्येक क्षणाची माहिती लगेच प्राप्त होते. लक्ष्याची हालचाल, भौगोलिक स्थितीचे ते केवळ अवलोकन करत नाहीत तर सखोल माहिती संकलित करतात, लक्ष्याचा मागोवा घेऊ शकतात. जेणेकरून सैन्याला सर्वसमावेशक व प्रभावी कारवाईसाठी जलद निर्णय घेणे सुकर होते. आधुनिक ड्रोन शत्रूवर हल्ला करण्याची क्षमता बाळगतात. नौदलासाठी विशेष प्रकारच्या ड्रोनचा विकास होत आहे. आत्मघाती हल्ले करू शकणाऱ्या नौकांचाही समावेश आहे. विशेष पेलोडसह सुसज्ज ड्रोन इलेक्ट्रॉनिक युद्ध, सिग्नल इंटेलिजन्सचे कार्य करतात. अमेरिकेच्या ‘एमक्यू – ९ रिपर’ सारख्या ड्रोनमध्ये बहुपर्यायी लक्ष्यभेदाची खास व्यवस्था आहे. आठ लेझर मार्गदर्शित क्षेपणास्त्रे ते वाहून नेऊ शकते. हवेतून जमिनीवर अचूक मारा करू शकतात. लष्करी कारवाईला ड्रोनने नवी दिशा मिळाली. युद्धभूमीवर वरचढ राहण्यासाठी बहुतांश सैन्यदल ड्रोन तंत्राचा कौशल्यपूर्वक वापराच्या तयारीत आहे. रणांगणात जमीन, समुद्र आणि हवा या तिन्ही क्षेत्रात लहान, स्वस्त व परिणामकारकतेने वापरता येतील, अशा ड्रोनची लाट आली आहे.

अलिकडच्या युद्धात ड्रोनची कामगिरी कशी?

टेहळणी आणि हल्ले करण्यात ड्रोनचा वापर किती परिणामकारक ठरू शकतो, याचे रशिया-युक्रेन युद्ध हे साक्षीदार आहे. या युद्धात ड्रोनच्या वापरात लक्षणीय वाढ झाली. रशियाने जानेवारी २०२३ मध्ये मानवरहित वाहन (यूटीव्हीज्) समाविष्ट केले तर, युक्रेनने ऑक्टोबर २०२२ मध्ये सेवस्तोपोल बंदरावर हल्ला करण्यासाठी मनुष्यरहित वाहन (यूएसव्हीएस) अर्थात सागरी ड्रोनचा वापर केला. ड्रोनची क्षमता वाढवण्यासाठी रशियन आणि युक्रेनियन सैन्याने कृत्रिम बुद्धिमत्तेचा केलेला वापर जगातील सशस्त्र दलांसाठी उत्सुकतेचा विषय आहे. रशियन लक्ष्य प्रभावीपणे ओळखून ती नष्ट करण्यासाठी युक्रेनने एआयने सुसज्ज दीड हजारहून अधिक ड्रोन आघाडीवर कार्यरत ठेवले. २०२१ मध्ये इस्रायली सैन्याने गाझामधील संघर्षात ड्रोन तैनातीत एआयचा वापर केला होता. या युद्धाचे जगातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयवर आधारित युद्ध असे वर्णन झाले होते. गाझामधील ज्या भागातून रॉकेट डागली जातात, ती स्थळे शोधण्याचे काम इस्त्रायली ड्रोनने केले. जागतिक पातळीवर दहशतवाद्यांविरोधातील लढ्यात ड्रोनचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. ड्रोन हे बहुतांश सशस्त्र दलांचा महत्त्वाचा भाग झाले आहे. चार वर्षांपूर्वीच्या आर्मेनिया-अझरबैजान युद्धात ड्रोनचा वापर करण्यात आला. अझरबैजानी ड्रोनने आर्मेनियातील हवाई संरक्षण प्रणाली व तोफखान्याचे मोठे नुकसान केले होते.

हेही वाचा : विश्लेषण : निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पीय भाषणात उल्लेख केलेली ‘लखपती दीदी’ योजना काय आहे?

इराणच्या ड्रोन कार्यक्रमाचा विस्तार कसा झाला?

इराणच्या भात्यात किती मानवरहित विमाने आहेत, याबाबत आजवर गुप्तता पाळली गेली. मात्र १९८४ मध्ये ड्रोन निर्मितीचा संकल्प करणारा हा देश होता. इराणचे पहिले पाळत ठेवण्यासाठी वापरलेले ‘स्विस अल्फा’ हे ड्रोन ११० आणि १३५ कॅमेऱ्यांनी सुसज्ज होते. नंतर, ताशी १२० किलोमीटर वेग आणि ४५ मिनिटे उड्डाणासह ‘तलश’ नावाच्या मूलभूत ड्रोनची नवीन पिढी विकसित केली गेली. ‘मोहजेर’ हे ड्रोन इराण-इराक युद्धाच्या शेवटी विकसित केले गेले. लेबनॉनमधील हेझबोलादेखील ते वापरते. लष्करी निर्बंधात इराणने हे साध्य केले. युक्रेन युद्धात ‘शाहेद १३६’ हे इराणी ड्रोन रशियाने युक्रेनमधील लक्ष्यांवर हल्ला करण्यासाठी तैनात केल्याचे सांगितले जाते. ते ड्रोन ३० किलो वजनाचे बॉम्ब सुमारे दोन हजार किलोमीटरपर्यंत वाहून नेऊ शकते. ते मालमोटारीच्या मागून प्रक्षेपित करता येते. सीरियन गृह युद्धात इराणने सीरियाला ‘अबाबिब ३‘ हे ड्रोन विकले होते. असद सरकारविरोधात लढणाऱ्या सैन्याला टिपण्यासाठी त्याचा वापर झाला. ‘शाहेद १३६’ पेक्षा तंत्रज्ञानदृष्ट्या सरस ‘अराश २’ ची चाचणी झाल्याचे सांगितले जाते. सागरात हल्ले चढवण्यासाठी त्याने युद्धनौकेवरून ड्रोन प्रक्षेपित करण्याची चाचणी केली. इराणच्या ड्रोनचा रशिया ग्राहक आहे.

हेही वाचा : अर्थसंकल्प २०२४ : सरकार ‘मेड इन इंडिया’ नॅनो डीएपी खताचा वापर वाढवणार; नॅनो डीएपी खत म्हणजे काय? त्याचा कृषी क्षेत्रात कसा होणार फायदा?

ड्रोन तंत्रज्ञानात अग्रेसर कोण?

युद्धभूमीवर ड्रोन अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. जगातील अनेक देशांनी ड्रोन तंत्रज्ञान विकसित करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. मानवरहित विमानांच्या विकासात (यूएव्ही) अमेरिका आणि इस्रायल हे देश अग्रेसर आहेत. ड्रोन उद्योगावर त्यांचे वर्चस्व आहे. या शिवाय चीन, इराण, रशिया आणि तुर्कीये यांनीही या क्षेत्रात योगदान दिले आहे. जगातील बहुतेक सशस्त्र दलांच्या यादीचा ड्रोन एक महत्त्वाचा भाग बनत आहे. जागतिक पातळीवर ड्रोनची मागणी कमालीची वाढली आहे. भारतानेही सैन्य दलांच्या गरजा लक्षात घेऊन मानवरहित विमानांच्या विकासावर भर दिला आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why importance of drones increasing in world as 3 usa soldiers killed in jordan print exp css
Show comments