पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रभादेवी आणि मध्य रेल्वे मार्गावरील परळ रेल्वे स्थानकांवरील महत्त्वाचा असा १२५ वर्षे जुना प्रभादेवी उड्डाणपूल लवकरच वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. त्यानंतर या पुलाचे पाडकाम करण्यात येणार असून ते मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा भाग आहे. हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी का बंद करण्यात येणार, त्याचे पाडकाम कशासाठी करणार, या पुलाच्या जागी नेमके काय उभारणार आणि भविष्यात तेथून पुन्हा वाहतूक होणार का… याबाबत घेतलेला हा आढावा…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रभादेवी उड्डाणपूल अत्यंत महत्त्वाचाका?

दक्षिण मुंबईतील वाहतुकीच्या दृष्टीने प्रभादेवी (एल्फिन्स्टन) उड्डाणपूल अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रभादेवी आणि परळ रेल्वे स्थानकांना जोडणारा हा पूल डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मार्गाकडे जातो. परळमधील महत्त्वाच्या अशा टाटा रुग्णालय, केईएम रुग्णालय आणि वाडिया रुग्णालयात जाण्यासाठी रेल्वे प्रवासी, पादचारी तसेच वाहनचालक-प्रवाशांना याच पुलाचा वापर करावा लागतो. हा पूल दादरसारख्या महत्त्वाच्या ठिकाणालाही जोडतो. एकूणच वाहतुकीच्या दृष्टीने तो महत्त्वाचा आहे. हा पूल ब्रिटीशकालीन आहे. या पुलचे आयुर्मान १२५ वर्षांहून अधिक आहे. १८५३ ते १८६० या काळातील मुंबईचे गव्हर्नर लाॅर्ड एल्फिन्स्टन यांचे नाव पश्चिम रेल्वे मार्गावरील या स्थानकाला देण्यात आले होते. त्यामुळेच या स्थानकावरील पुलही एल्फिन्स्टन पूल या नावाने ओळखला जाऊ लागला. मात्र अलिकडेच एल्फिन्स्टन स्थानकाचे नाव बदलून प्रभादेवी स्थानक असे करण्यात आले. त्यामुळे आपोआपच हा पूलही प्रभादेवी पूल या नावाने ओळखला जाऊ लागला.

पुलाचे पाडकाम का?

प्रभादेवी उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार असून लवकरच या पुलाचे पाडकाम करण्यात येणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा शिवडी – वरळी उन्नत रस्ता प्रकल्पाअंतर्गत हे पाडकाम करावे लागत आहे. मुंबई – नवी मुंबई अंतर केवळ १२ मिनिटांत पार करता यावे यासाठी एमएमआरडीएने ‘अटलबिहारी वाजपेयी शिवडी – न्हावा शेवा सागरी सेतू’ बांधला. या सागरी सेतूला दक्षिण मुंबई, सागरी मार्ग (कोस्टल रोड) आणि वांद्रे – वरळी सागरी सेतूशी जोडण्यासाठी एमएमआरडीएने शिवडी – वरळी उन्नत रस्ता प्रकल्प हाती घेतला आहे. ४.५ किमी लांबीचा आणि १७ मीटर रुंदीचा शिवडी-वरळी उन्नत रस्ता प्रभादेवी उड्डाणपूल येथून जाणार आहे. त्यामुळे हा उड्डाणपूल पाडून त्याजागी नवीन पूल बांधण्यात येणार आहे. हा पूल जुना झाला असून या पुलाचा एमएमआरडीएच्या प्रकल्पात अंतर्भाव करण्यात आला आहे.

नवीन दुमजली उड्डाणपूल कसा बांधणार?

उन्नत रस्ता प्रकल्पासाठी प्रभादेवी उड्डाणपुलाचे लवकरच पाडकाम करण्यात येणार आहे. यासाठी एमएमआरडीएला वाहतूक पोलिसांच्या ‘ना हरकत’ प्रमाणपत्राची प्रतीक्षा आहे. हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर मार्चअखेरीस वा एप्रिलच्या सुरुवातीला या पुलाचे पाडकाम करण्यात येण्याची शक्यता आहे. हा उड्डाणपूल पाडल्यानंतर त्याजागी एमएमआरडीए नवीन दुमजली उड्डाणपूल बांधणार आहे. हा दुमजली पूल १३२ मीटर लांबीचा आणि २७ मीटर उंचीचा असणार आहे. दुमजली पुलावर प्रत्येकी दोन मार्गिकांचा समावेश असणार आहे. सध्याच्या पुलाच्या जागी उभारण्यात येणाऱ्या दुमजली पुलाच्या पहिल्या मजल्यावरून आतासारखीच वाहतूक सुरू राहणार आहे. तर दुसऱ्या मजल्यावरून अटल सेतूच्या दिशेने वाहतूक होणार आहे. स्थानिक वाहतुकीसाठी पुलाच्या पहिल्या मजल्याच्या दोन्ही टोकांना जोडरस्ता (अप्रोच रोड) असणार आहे. १५६ मीटर लांबीचा एक जोडरस्ता परळच्या, तर २०९ मीटर लांबीचा जोडरस्ता वरळीच्या दिशेने जाणार आहे. दरम्यान, या दुमजली पुलाच्या बांधकासाठी अंदाजे १६८ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

किमान एक वर्ष पूल बंद?

प्रभादेवी पुलाचे पाडकाम करून त्याजागी दुमजली उड्डाणपूल उभारण्यासाठी किमान १२ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे प्रभादेवी पूल किमान एक वर्षे वा त्यापेक्षा अधिक काळासाठी वाहतुकीसाठी पूर्णत: बंद ठेवावा लागणार आहे. यादरम्यान येथील वाहतूक इतर मार्गाने वळविण्यात येणार आहे. वाहनचालक – प्रवासी, पादचारी, रेल्वे प्रवाशांना कोणतीही अडचण होऊ नये या दृष्टीने एमएमआरडीए, रेल्वे आणि वाहतूक पोलीस आवश्यक त्या उपाययोजना करीत आहेत. असे असले तरी नवीन पूल बांधून पूर्ण होईपर्यंत नागरिकांची काहीशी गैरसोय होणार आहे. मात्र एकदा का दुमजली पूल कार्यान्वित झाल्यानंतर या परिसरातील वाहतूक सुरळीत होणार असून प्रभादेवी परिसर थेट नवी मुंबई आणि दक्षिण मुंबईशी जोडला जाणार आहे.