देशातील पहिल्या वातावरणीय संशोधन प्रयोगशाळेच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन मंगळवारी केंद्रीय मंत्री किरन रिजीजू यांच्या हस्ते करण्यात आले. ही प्रयोगशाळा भोपाळच्या वायव्येस ५० किमी अंतरावर असलेल्या सिहोर जिल्ह्यातील सिलखेडा गावात विकसित करण्यात आली आहे. तसेच या प्रयोगशाळेसाठी जवळपास १२५ कोटी रुपयांचा खर्चही करण्यात आला आहे. या प्रयोगशाळेचे भूमिपूजन २०१८ मध्ये करण्यात आले होते.
दरम्यान, ही प्रयोगशाळा का स्थापन करण्यात आली? ती इतकी महत्त्वाची का आहे? या प्रयोगशाळेची वैशिष्ट्ये काय आहेत? आणि महत्त्वाचे म्हणजे या प्रयोगशाळेसाठी भोपाळचीच निवड का करण्यात आली? याविषयी सविस्तर जाणून घेऊ.
हेही वाचा – आता गुगल ‘सिमा’च खेळेल तुमच्याबरोबर व्हिडीओ गेम्स, सवंगडी (पार्टनर) हवाय कशाला?
वातावरणीय संशोधन प्रयोगशाळा नेमकी कशी?
भोपाळजवळ स्थापन करण्यात आलेली वातावरणीय संशोधन प्रयोगशाळा हे खुल्या मैदानात विकसित करण्यात आलेले एक वातावरण निरीक्षण आणि विश्लेषण केंद्र आहे. हवामानाशी संबंधित घटक जसे की, तापमान, हवेचा वेग, हवेशी दिशा, तसेच जून ते सप्टेंबर महिन्यात निर्माण होणारे नैर्ऋत्य मोसमी वारे आणि बंगालच्या उपसागरात तयार होणारे कमी दाबाचे पट्टे इत्यादींचा अभ्यास करणे हा या प्रयोगशाळेचा मुख्य उद्देश आहे.
या प्रयोगशाळेद्वारे गोळा करण्यात येणाऱ्या माहितीचा वापर पाऊस आणि हवामानाचा अंदाज वर्तविण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. त्याबरोबरच या प्रयोगशाळेचा वापर उपग्रहावर आधारित निरीक्षणे प्रमाणित करण्यासाठीही केला जाण्याची शक्यता आहे. १०० एकरांमध्ये पसरलेली ही प्रयोगशाळा पृथ्वी विज्ञान मंत्रालयाद्वारे विकसित करण्यात आली आहे. तसेच या प्रयोगशाळेचे संचालन पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटिऑरॉलॉजीद्वारे केले जाणार आहे.
या प्रयोगशाळेच्या पहिल्या टप्प्यात हवामानाचा अभ्यास करण्यासाठी रिमोट सेन्सिंग आधारित २५ उपकरणे बसविण्यात आली आहेत. तसेच दुसऱ्या टप्प्यात रडार विंड प्रोफाइलर, बलून-बाउंड रेडिओसोंड, मातीची आर्द्रता व तापमान मोजणारी उपकरणे बसविण्यात येणार आहेत.
ही प्रयोगशाळा महत्त्वाची का?
भारतातील ४५ टक्के मजूरवर्ग कृषी क्षेत्रात कार्यरत असून, देशातील बहुतांश शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. तसेच बऱ्यापैकी शेती मॉन्सून कोर झोन म्हणजेच गुजरात ते पश्चिम बंगालपर्यंतच्या मध्य भारताच्या प्रदेशात पसरलेली आहे. त्याबरोबरच भारतात पडणारा एकूण पावसापैकी ७० टक्के पाऊस हा नैर्ऋत्य मोसमी हंगामात होतो. तसेच संपूर्ण भारतात खरीप हंगामातील लागवड जुलै व ऑगस्ट महिन्यात केली जाते. या महिन्यांत अनुक्रमे सरासरी २८०.४ मिलिमीटर व २५.९ मिलिमीटर पाऊस पडतो.
खरीप हंगामाच्या चार महिन्यांत बंगालच्या उपसागरात अनेकदा कमी दाबाचे पट्टे तयार होतात. यावेळी स्वाभाविकपणे वारे वायव्य दिशेला प्रवास करताना मॉन्सून कोर झोनमधून जातात. त्यामुळे या भागात चांगला पाऊस होतो. अशा वेळी या पावसाचा अचूक अंदाज असणे आवश्यक असते आणि त्यामुळे ही प्रयोगशाळा महत्त्वाची ठरते.
मध्य भारतातील मान्सूनची माहिती असणे का महत्त्वाचे?
हवामान शास्त्रज्ञांनी अनेकदा मध्य भारतात होणाऱ्या मान्सूनचे महत्त्व अधोरेखित केले आहे. दरवर्षी मान्सूनपूर्व काळात हवामान विभागाद्वारे देशाच्या चारही भागांत (पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण) होणाऱ्या पावसाचा अंदाज वर्तविला जातो. त्याचबरोबर मध्य भारतात होणाऱ्या पावसाचा अंदाजही वेगळा वर्तविला जातो. कारण- एकूण अन्नधान्य उत्पादनाच्या दृष्टीने मध्य भारताचा भाग अतिशय महत्त्वाचा मानला जातो. खरे तर कमी दाबाचे पट्टे, वारे यांचा मान्सूनवाढीवर नेमका किती प्रभाव पडतो, याविषयी माहिती अद्यापही मर्यादित स्वरूपाची आहे. त्यामुळेच भारतीय मान्सूनचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने मध्य भारत भाग हा हवामान शास्त्रज्ञांसाठी महत्त्वाचा आहे.
दरम्यान, आता भोपाळमधील प्रयोगशाळेमुळे आता ढगांमागचे सूक्ष्म विज्ञान, त्याचे गुणधर्म, त्याचे संवहन इत्यादींबाबतची दीर्घकालीन निरीक्षणे नोंदविता येतील. या निरीक्षणाची मदत पावसाचे अचूक अंदाज वर्तविण्यासाठी होईल. पर्यायाने त्याचा फायदा या भागातील शेतकऱ्यांना होईल.
हेही वाचा – आदर्श आचारसंहिता म्हणजे काय? ती कधी लागू होते अन् उल्लंघन केल्यास काय होतं, वाचा ‘हे’ नियम
प्रयोगशाळेसाठी भोपाळचीच निवड का?
वातावरणीय संशोधन प्रयोगशाळा ही भोपाळच्या वायव्येस ५० किमी अंतरावर असलेल्या सहोर जिल्ह्यातील सिलखेडा गावात विकसित करण्यात आली आहे. त्यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे सिलखेडा हे गाव अशा ठिकाणी आहे, थेट जिथून नैऋत्य मोसमी वारे वाहतात. तसेच हा भाग मानवीहस्तक्षेप आणि इतर प्रदुषकांपासून मुक्त आहे. त्यामुळे या प्रयोगशाळेसाठी सिलखेडा गावाची निवड करण्यात आली आहे.