भारताची संरक्षण क्षमता वाढविण्याच्या दिशेने सरकार वेगाने पावले उचलताना दिसत आहे. नौदलाची ताकद वाढविण्यासाठी म्हणून भारत सरकारने बुधवारी फ्रान्सबरोबर महत्त्वपूर्ण करार केला आहे. या करारांतर्गत भारत फ्रान्सकडून २६ राफेल मरीन फायटर जेटची खरेदी करणार आहे. तब्बल ६३,००० कोटी रुपयांच्या या कराराला भारत सरकारने मंजुरी दिली आहे. या करारात २२ सिंगल-सीट राफेल मरीन फायटर जेट आणि ४ ट्विन-सीटर राफेल मरीन फायटर जेटचा समावेश आहे.

करारावर अंतिम स्वाक्षऱ्या झाल्यानंतर येत्या तीन ते पाच वर्षांमध्ये ही विमाने भारताला मिळण्याची शक्यता आहे. मुख्य म्हणजे ही विमाने भारताच्या स्वदेशी बनावटीच्या विमानवाहू जहाज आयएनएस विक्रांतवर तैनात केली जाऊ शकतात. परंतु, राफेल मरीन फायटर जेटची भारताला आवश्यकता का आहे? त्यामुळे नौदलाची क्षमता कशी वाढणार? या विमानांचे वैशिष्ट्य काय? त्याविषयी जाणून घेऊ.

राफेल मरीन फायटर जेटच्या समावेशामुळे भारतीय नौदलाच्या क्षमतांमध्ये वाढ होईल. (छायाचित्र-रॉयटर्स)

भारतीय नौदलाची क्षमता कशी वाढणार?

राफेल मरीन फायटर जेटच्या समावेशामुळे भारतीय नौदलाच्या क्षमतांमध्ये वाढ होईल. कारण- ही ४.५ जनरेशनची लढाऊ विमाने आहेत. ही लढाऊ विमाने अत्याधुनिक अशा इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणाली आणि डॉग फायटिंग क्षमतांनी सुसज्ज आहेत. त्याव्यतिरिक्त राफेल मरीन फायटर जेट वजनाने इतर विमानांच्या तुलनेत हलके आहे. राफेल मरीन फायटर जेटचा भारतीय नौदलात समावेश झाल्यास भारतीय नौदलाची मलाक्का सामुद्रधुनी आणि दक्षिण चीन समुद्रासह इतर वादग्रस्त भागांत जलद हल्ला करण्याची क्षमता सुधारेल. मुख्य म्हणजे भारतीय नौदल या भागात अधिक कार्यक्षमतेने गस्त घालू शकेल. परिणामी हिंद महासागर क्षेत्रात भारताचा प्रभाव वाढेल. सध्या भारतीय नौदल आयएनएस विक्रमादित्य आणि आयएनएस विक्रांत यांसारख्या जहाजांवरून मिग-२९के विमाने चालवते. मिग विमानांच्या तुलनेत राफेल-एम हे अधिक कार्यक्षम असून, त्याचा फायदा नौदलाला होणार आहे.

भारताला राफेल मरीन फायटर जेटची गरज का होती?

सागरी क्षेत्रातील स्पर्धा दिवसेंदिवस वाढत आहे. यादरम्यान भारताला आपले राष्ट्रीय हित जपण्यासाठी अशा स्वरूपाच्या जेट्सची आवश्यकता आहे. आशिया-पॅसिफिकपासून हिंद महासागरापर्यंत प्रत्येक देश नौदलाला केंद्रस्थानी ठेवून, त्यांची ताकद वाढविताना दिसत आहे. चीनची कुरघोडी वाढत असताना प्रादेशिक सुरक्षितता सुनिश्चित करणे भारतासाठी अधिक महत्त्वाचे आहे. भारत स्वतःच्या राष्ट्रीय हिताला प्राधान्य देत, तसेच इतर राष्ट्रांचेदेखीलसार्वभौमत्व सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करीत आहे.

भारताला आपले राष्ट्रीय हित जपण्यासाठी अशा स्वरूपाच्या जेट्सची आवश्यकता आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

अलीकडील काही घटनांची उदाहरणे द्यायची झाल्यास, लाल समुद्र येथील जहाजांवर झालेल्या हल्ल्यांमध्ये भारतीय नौदलाच्या तत्परतेमुळे शेकडो लोकांचे प्राण वाचले. आशिया-पॅसिफिक प्रदेश आणि दक्षिण चीन समुद्र हे भारतासाठी महत्त्वाचे धोरणात्मक मुद्दे आहेत. या भागात चीन सातत्याने आपले वर्चस्व वाढवत आहे.

नौदल राफेल हवाई दलातील विमानापेक्षा वेगळे कसे?

हवाई दलातील राफेल जेट्सपेक्षा राफेल मरीन फायटर जेट वेगळे आहे. राफेल मरीन फायटर जेटमध्ये ऑपरेशन्ससाठी मजबूत अंडरकॅरेज आहे. राफेल मरीन फायटर जेट विशेषतः विमानवाहू जहाजांवरून चालवण्यासाठी डिझाइन केलेले आहे. ही जेट्स भारतीय नौदल ताफ्याला पूरक ठरतील. राफेल मरीन फायटर जेटमध्ये ‘RBE2-M’ रडार सिस्टीम आहेत. ही सिस्टीम विशेषतः सागरी मोहिमांसाठी तयार करण्यात आली आहे.

राफेल मरीन फायटर जेटचे वैशिष्ट्य काय?

  • राफेल मरीन फायटर जेट प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे.
  • ही फायटर जेट आयएनएस विक्रांतवरून उड्डाण घेऊ शकतील.
  • या फायटर जेटमध्ये खूप कमी जागेत लँडिंग करण्याची खासियत आहे.
  • या जेटची लांबी १५.२७ मीटर, रुंदी १०.८० मीटर आहे व उंची ५.३४ मीटर आहे.
  • राफेल मरीन फायटर जेटचा वेग प्रतितास १९१२ किलोमीटर आहे. हे जेट ५० हजार फूट उंचीपर्यंत उडू शकते.
  • विशेष म्हणजे या जेट्सला न्यूक्लिअर प्लांटवर हल्ले करण्याच्या दृष्टिकोनातूनदेखील डिझाईन करण्यात आले आहे.
  • या विमानात पाणबुड्यांचा शोध घेणे आणि त्यांच्यावर हल्ला करणे या कार्यांसाठी अत्याधुनिक पद्धतीचे रडार बसविण्यात आले आहेत.
  • या विमानात अँटी शिप क्षेपणास्त्रेदेखील बसवली जाणार आहेत.
  • तसेच या विमानात मिटीयोर आणि हॅमर क्षेपणास्त्रे बसवली जाण्याची शक्यता आहे.

राफेल मरीन जेटच्या वेगाबद्दल बोलायचे झाल्यास, हे विमान मॅक २ च्या वेगाने उडू शकते. राफेल जेट हिमालयाच्या पर्वतरांगांवरून अत्यंत थंड हवामानातही उड्डाण करू शकते. राफेल मरीन जेट एका मिनिटात १८ हजार मीटर उंचीवर पोहोचू शकते. राफेल जेट पाकिस्तानकडे असलेल्या एफ-१६ आणि चीनकडे असलेल्या जे-२० विमानांपेक्षा चांगले आहे. राफेल मरीन जेट त्यांच्या उड्डाणाच्या ठिकाणापासून ३७०० किलोमीटर अंतरापर्यंत हल्ला करू शकतात.

दोन देशांतील या करारात जेटची देखभाल, लॉजिस्टीक सपोर्ट, नौदलाच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, यासह भारतात तयार होणाऱ्या काही भागांकरिता तांत्रिक सहकार्य यांचा समावेश आहे. मुख्य म्हणजे या कराराच्या अंतर्गत भारतीय नौदलाच्या जवानांना राफेल मरीन जेट आणि त्याच्या देखभालीचे प्रशिक्षण सुद्धा दिले जाणार आहे.