-राखी चव्हाण

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिकार, अधिवास नष्ट होणे, संघर्ष यातून होणाऱ्या बिबट्यांच्या मृत्यूसाठी आणखी एक गोष्ट कारणीभूत ठरत आहे. भरधाव वाहनाच्या धडकेत होणाऱ्या अपघाताच्या रुपाने एक नवा धोका त्यांना निर्माण झाला आहे. भारतीय वन्यजीव संरक्षण संस्थेने (डब्ल्यूपीएसआय-वाईल्डलाइफ प्रोटेक्शन सोसायटी ऑफ इंडिया) एकत्रित केलेल्या माहितीनुसार २०१० ते २०१९ पर्यंत गेल्या दहा वर्षात रेल्वे आणि रस्ते अपघातात बिबट्यांच्या मृत्यूत २७८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०१९मध्ये भारतात ८३ बिबट्यांचा मृत्यू हा रेल्वे आणि रस्ते अपघातात झाला आहे.

रस्त्यांचे जाळे बिबट्याच्या मृत्यूसाठी कारणीभूत आहे का?

गेल्या दोन-तीन दशकांत रस्ते, रेल्वे, वीज आणि दळणवळणाच्या भौतिक पायाभूत सुविधा प्रचंड प्रमाणात वाढल्या आहेत. यातील ज्या सुविधा या पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील भागातून जातात, तेथे धोका निर्माण करतात. येथे वन्यजीव अधिवासांचे तुकडेच होत नाहीत, तर वाहनांच्या धडकेत वन्यजीवांच्या मृत्यूदेखील होतो. केंद्रीय वन्यजीव मंडळाने एकट्या २०१९मध्ये ९० टक्क्यांहून अधिक रेषीय पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी (रस्ते, रेल्वे, वीज वाहिन्या आदी) पर्यावरण मंजुरी जाहीर केली. ज्यामुळे बिबट्यासह सर्वच वन्यजीवांचे भविष्य धोक्यात आले आहे. अलीकडच्या काळात वाहनांच्या धडकेत त्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. प्रामुख्याने महाराष्ट्रात २०२१च्या सुरुवातीच्या चार-पाच महिन्यात झालेल्या ८७ बिबट्यांच्या मृत्यूपैकी ३३ मृत्यू हे रस्ते अपघातात झाले आहेत. 

बिबट्यांचा अधिवास कोणकोणत्या भागात?

भारतात अधिसूची एकमध्ये असलेला बिबट्या संरक्षित भागात, राखीव क्षेत्रात तसेच मानवी वर्चस्व असलेल्या भागात राहतो. मांजर कुळातील या प्राण्यांच्या नऊ उपप्रजाती असून त्यांचा अधिवास वेगवेगळा आहे. आययूसीएनच्या (इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर) लाल यादीत त्यांची धोकादायक श्रेणीत नोंद आहे. यातील काही उपप्रजाती गंभीर धोक्यात आहेत.

बिबट्याचे रस्ते अपघातात होणारे मृत्यू रोखण्यासाठी पर्याय काय?

बिबट्याच्या लोकसंख्येवर विशेषत: संरक्षित क्षेत्राबाहेरील लोकसंख्येवर त्याच्या प्रभावाचे मूल्यांकन करण्यासाठी वाहनांच्या धडकेमुळे होणाऱ्या मृत्यूचे निरीक्षण करणे महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रात दर दोन दिवसांनी एका बिबट्याचा मृत्यू होत आहे. सप्टेंबर महिन्यात पेंच व्याघ्र प्रकल्पालगतच्या राष्ट्रीय महामार्गावर अवघ्या आठ दिवसांत दोन बिबटे मृत्युमुखी पडले. तर आताही ऑक्टोबरमध्ये राष्ट्रीय महामार्गावर वाहनाच्या धडकेत दोघांचा मृत्यु झाला. राज्यातील बिबट्यांच्या अनैसर्गिक मृत्यूमागे रस्ते अपघात हे सर्वात मोठे कारण आहे. रस्ते, तसेच महामार्गाचे रुंदीकरण आणि वाहनांचा वाढता वेग यामुळे वन्यप्राण्यांचे मृत्यू होत आहेत. ते टाळण्यासाठी अधिक चांगले उपाय योजणे आवश्यक आहे.

भारतातील बिबट्यांची संख्या किती?

केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल विभागाने दोन वर्षापूर्वी भारतातील बिबट्यांच्या स्थितीचा अहवाल जाहीर केला. त्यानुसार महाराष्ट्रात एक हजार ६९९ बिबटे आहेत. देशातील तिसऱ्या क्रमांकाची बिबट्यांची सर्वात मोठी संख्या महाराष्ट्रात आहे. मध्य प्रदेशात तीन हजार ४२१ तर कर्नाटकात एक हजार ७८३ बिबट आहेत. १९९८ साली भारतात बिबट्यांची संख्या सुमारे ४५ हजार इतकी होती. गेल्या १७ वर्षांत त्यात सुमारे ८२ टक्क्यांनी घट झाली आहे. २००० ते २००९ दरम्यान, रस्ते आणि रेल्वेमुळे बिबट्याच्या मृत्यूची संख्या वर्षाला २० पेक्षा जास्त नव्हती. वाहतुकीचे प्रमाण कमी असतानादेखील राज्यातील प्रत्येक लहान रस्त्याचे रुंदीकरण केले जात आहे. रस्ते महामार्ग मंत्रालय आणि सार्वजनिक बांधकाम विभाग १५ हजार किलोमीटरपेक्षा अधिक रस्त्यांचा विस्तार करत आहे.

बिबट्यांच्या रस्ते अपघातात महाराष्ट्र कोणत्या क्रमांकावर?

सलग दुसऱ्या वर्षी, २०१९मध्ये २२ प्रकरणांसह (रस्तेवरील १९, रेल्वे अपघातात तीन) बिबट्यांच्या मृत्यूची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात नोंदली गेली. त्यानंतर उत्तराखंड, राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि गुजरात यांचा क्रमांक आहे. २०२०मध्ये संपूर्ण वर्षभरात रस्ते अपघातात ३४ बिबट्यांचा मृत्यू तर २०२१ मध्ये पाच महिन्यांपेक्षा कमी कालावधीत ३३ बिबटे मृत्युमुखी पडले आहेत.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why indian roads are becoming death traps for leopard print exp scsg
Show comments