भारतात विजेची मागणी दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे एक नवे आव्हान उभे ठाकले आहे. जमेची बाब म्हणजे सौरऊर्जेच्या उत्पादनात सध्या वाढ होत असली तरी सूर्यास्तानंतर उत्पादनक्षमता कमी होते. २०२२ साली, भारतात विजेची मागणी आठ टक्क्यांनी वाढली. आशिया खंडातील इतर देशांच्या तुलनेत हा वेग जवळपास दुप्पट असून मागील वर्षापेक्षा १४९.७ टेरावॅट-तास इतकी ही मागणी होती. वर्ष २०२३ च्या पहिल्या दोन महिन्यांतच विजेची मागणी मागील वर्षाच्या तुलनेत १० टक्क्यांनी वाढली. भारतात विजेची मागणी वाढण्यामागची कारणे खालीलप्रमाणे आहेत. या वाढत्या मागणीवर वेळीच उपाय न केल्यास येणाऱ्या काळात रात्रीच्या लोडशेडिंगला सामोरे जावे लागू शकते.
कोणत्या ठिकाणांहून मागणी वाढली?
ज्या राज्यांमध्ये अधिक विकास होतोय, त्या राज्यांना विजेची अधिक गरज भासत आहे. वायव्येकडील राजस्थान, पश्चिमेकडील गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांचा समावेश आहे. या तीन राज्यांत देशातील मोठी कारखानदारी एकवटलेली आहे. ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेने केंद्र सरकारच्या ऊर्जा विभागाने सादर केलेल्या आकडीवारीचे विश्लेषण करून काही निष्कर्ष काढले आहेत. पूर्वेकडील छत्तीसड राज्य हे खाणींसाठी ओळखले जाते. २०२२ चा पावसाळा संपल्यानंतर पाच महिन्यांत याठिकाणी विजेच्या मागणीत १६.६ टक्क्यांची वाढ झाली. तर राजस्थान राज्यात १५.१ टक्क्यांची वाढ झाली.
हे वाचा >> ‘सौर ऊर्जा’: विकासाचे राजनयन!
उत्तरेकडील राज्यातही विजेच्या मागणीचा आलेख चढता राहिला. पंजाबमधील कृषी क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणात वीज लागते. एकूण विजेच्या वापरापैकी सर्वाधिक वीज कृषी क्षेत्रासाठी खर्ची होते. तर मध्य प्रदेश, तेलंगणा आणि बिहार सारख्या राज्यांमध्ये निवासी विजेच्या मागणीत ऐतिहासिक अशी वाढ नोंदविण्यात आली आहे.
विजेची मागणी का वाढू लागली?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वाढलेल्या विजेच्या मागणीचा संबंध हा आर्थिक उलाढालीशी लावला होता. देशात आर्थिक व्यवहार वाढल्यामुळे ही मागणी वाढल्याचे ते म्हणाले. भारताच्या एकूण विजेचा निम्म्याहून अधिक वापर उद्योग आणि व्यापारासाठी खर्ची होतो. अलीकडच्या काळात निवासी वापर हा चौथ्या क्रमांकावर आहे, तर गेल्या काही वर्षांपासून शेतीचा वाटा सहाव्या क्रमाकांमागे गेला आहे. राज्य आणि हंगामानुसार विजेच्या वापरात कमीअधिक प्रमाणात बदल होत असतात.
केंद्रीय ऊर्जा खात्याने सादर केलेल्या आकडेवारीचे विश्लेषण केल्यानंतर ‘रॉयटर्स’ने (Reuters) असा निष्कर्ष काढला की, २०२२ च्या मध्यापर्यंत उष्णतेची लाट आणि करोना निर्बंध सैल झाल्यामुळे विजेच्या मागणीत मोठी वाढ झाली. अनियमित हवामान आणि कृषी क्षेत्रातील कामांमध्ये झालेली वाढ हेदेखील २०२२ मध्ये विजेच्या मागणीत वाढ होण्याचे माठे कारण आहे.
भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून बंगळुरूकडे पाहिले जाते. करोनानंतर आयटी क्षेत्रातील कर्मचारी वर्क फ्रॉम होमनंतर पुन्हा एकदा कार्यालयात परतले आहेत. त्यामुळे कर्नाटक राज्यातील विजेची मागणी वाढली. तसेच आंध्र प्रदेशात कारखानदारी अधिक असल्यामुळे तिथेही मागणीत वाढ झाली आहे.
हे वाचा >> कृषीपंपाचा वापर वाढल्याने राज्यातील विजेची मागणी २३ हजार मेगावॅटवर
दक्षिणेतील आणखी एक राज्य असलेल्या केरळमध्ये फुटबॉलच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमुळे विजेची मागणी वाढली. केरळमध्ये फुटबॉल लोकप्रिय आहे. त्यामुळे फिफा आणि इतर महत्त्वाच्या स्पर्धेवेळी तिथे सामन्यांचे लाईव्ह स्ट्रिमिंग केले जाते. यामुळे स्पर्धेच्या काळात विजेच्या वापरात ४.१ टक्के वाढ नोंदवली गेली, असेही ऊर्जा खात्याच्या सादरीकरणात दिसून आले.
पंजाब राज्यात सध्या आम आदमी पक्षाचे सरकार आहे. पंजाबमध्ये मोफत वीज देण्याच्या धोरणामुळे विजेच्या वापरात अचानक वाढ झाली आहे. तर राजस्थानमध्ये कृषी क्षेत्रासाठी वीजपुरवठ्याचे तास वाढविण्याचा निर्णय घेतल्यामुळे विजेच्या मागणीत नोव्हेंबरमध्ये २२ टक्के आणि डिसेंबरमध्ये १५ टक्के एवढी वाढ झाली.
आता पुढे काय?
यावर्षी उन्हाळ्यात वीजपुरवठा खंडित होऊ नये, यासाठी संबंधित अधिकारी झटत आहेत. उन्हाळ्यामध्ये साधारण सर्वच राज्यात विजेच्या मागणीचा दर उंचावलेला असतो. मात्र तरीही भारताने लवकरच जर नवीन कोळसा आणि जलविद्युत केंद्र उभारले नाहीत, तर येणाऱ्या काळामध्ये उन्हाळ्यात लोडशेडिंगचा त्रास सहन करावा लागू शकतो.