आयर्लंड देशाने एक नवीन कायदा मंजूर करून सर्व प्रकारच्या मद्याच्या बाटल्यांवर आरोग्याबाबत वैधानिक इशारा देण्याचा निर्णय घेतला आहे. यकृतासंबंधीचे आजार आणि कर्करोगाशी मद्य थेट निगडित आहे, असा हा इशारा छापण्यात येणार आहे. २२ मे २०२६ पासून अशा प्रकारचे सर्वसमावेशक लेबल किंवा स्टिकर मद्याच्या उत्पादनावर लावणे बंधनकारक असणार आहे. मद्य व्यावसायिकांना हा निर्णय अमलात आणण्यासाठी आणि त्याचे नियोजन करण्यासाठी हा वेळ देण्यात आला आहे. यासोबतच गरोदर महिलांनी मद्य न घेण्याबाबतचा इशाराही देण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. मद्याच्या बाटल्यांवर त्यात असणाऱ्या कॅलरीचीही माहिती यापुढे छापावी लागणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान वाईन उत्पादन करणाऱ्या इटली, स्पेन आणि युरोपियन युनियनचे सदस्य असलेल्या इतर सहा देशांनी आयर्लंडच्या निर्णयावर टीका केली आहे. आयर्लंडचे आरोग्यमंत्री स्टिफन डॉनेली यांनी घेतलेल्या या निर्णयाचे अनेक तज्ज्ञांनी स्वागतही केले आहे. मद्यपींना अनेकदा त्याचे दुष्परिणाम काय होणार याची कल्पना नसते, त्यामुळे ते मद्य घेत राहतात. डॉनेली यांच्या निर्णयामुळे एका योग्य दिशेने सरकारने पाऊल टाकले आहे, अशी प्रतिक्रिया तज्ज्ञांनी दिली.

हे वाचा >> मद्यामुळे होऊ शकतो कर्करोग

आयर्लंडमधील मद्याचे प्रमाण

आयरिश लोकांमध्ये मुळातच मद्य रिचवण्याचे प्रमाण अधिक आहे. आयर्लंडच्या संस्कृतीमध्ये मद्याचा महत्त्वाचा वाटा आहे. २०२१ साली आयरिश सरकारने केलेल्या एका सर्वेनुसार देशात मद्य रिचवण्याचे प्रमाण कमी होत आहे. मात्र काही वयोगटांत हे प्रमाण अद्यापही अधिकच आहे. १५ वर्षांहून अधिक ३७ टक्के लोक आठवड्यातून एकदा तरी मद्य घेतात. (२०१८ साली हे प्रमाण ४१ टक्के होते) तर १५ टक्के लोक हे मद्याचा अतिरेक करतात. (२०१८ साली सतत मद्य पिणाऱ्यांची संख्या २८ टक्के होती)

कोणकोणत्या देशांनी मद्याच्या बाटल्यांवर इशारा दिला आहे?

अनेक देशांमध्ये निहित केलेल्या वयाहून कमी लोकांना मद्य घेता येणार नाही, तसेच मद्य प्यायल्यानंतर गाडी चालवू नये, अशा प्रकारचे इशारे मद्याच्या बाटल्यांवर छापलेले असतात. द लॅन्सेट गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी आणि हिपॅटोलॉजी या संकेतस्थळाने त्यांच्या लेखात दिलेल्या माहितीनुसार, सध्या फक्त दक्षिण कोरियामध्ये मद्यामुळे कर्करोगाचा धोका उद्भवू शकतो, असा इशारा देण्यात येत आहे. असा इशारा देणारा आयर्लंड आता दुसरा देश बनला आहे.

याच लेखामधून मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण आफ्रिकेने २०१७ मध्ये मद्यांच्या बाटल्यावर अशा प्रकारे सावधानतेचा इशारा छापण्याचा प्रयत्न केला होता. मात्र स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय दबावानंतर २०२० साली हा निर्णय मागे घेण्यात आला.

जागतिक आरोग्य संघटनेने २०२२ साली मद्य आणि त्याच्या धोक्यासंदर्भात एक अहवाल तयार केला होता. त्या अहवालातील नमूद माहितीनुसार ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांनी मद्याचा दर्जा आणि त्यात अंतर्भूत असलेल्या पदार्थांबाबत माहिती देणारे लेबल मद्यावर लावले आहेत. तसेच १.१५ टक्क्यापेक्षा जास्त अल्कोहोलचे प्रमाण असलेले मद्य गर्भवती महिलांनी घेऊ नये, असा इशाराही त्या लेबलच्या माध्यमातून दिला आहे.

सावधानतेचा इशारा देण्याची गरज का?

जागतिक आरोग्य संघटनेने १९९० साली मद्याला पहिल्या श्रेणीतील कार्सिनोजेन (कर्करोगासाठी कारणीभूत ठरणारा घटक) पदार्थ घोषित केले आहे. याचवर्षी जागतिक आरोग्य संघटनेने इशारा दिला की, मद्यसेवनाच्या बाबतीत त्याचे निश्चित असे प्रमाण ठरलेले नाही, जे तुमच्या आरोग्यास हानिकारक ठरणार नाही. दिल्लीमधील यकृत आणि पित्तविषयक विज्ञान संस्थेचे कुलगुरू डॉ. एस. के. सरीन म्हणाले की, युरोपमध्ये यकृताचा कर्करोग होण्यास मद्य हे सर्वात मोठे कारण आहे. युरोपमधील ४० ते ५२ टक्के यकृताशी संबंधित कर्करोग हे मद्यसेवनामुळे होत आहेत.

हे वाचा >> ‘कर्क’विश्व : यकृताचा कर्करोग

डॉ. सरीन पुढे म्हणतात, मद्य हे अधिकतर समाजाने स्वीकारलेले ‘विष’ आहे. आमच्या रुग्णालयात मद्याशी संबंधित यकृताच्या आजाराचे जेवढे रुग्ण येतात त्यांना, मद्यामुळे असे गंभीर आजार होऊ शकतात, याची कल्पनाच नसते.

जागतिक आरोग्य संघटनेच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, सध्या अन्नपदार्थ आणि थंड पेयावर ज्याप्रमाणे लेबल लावलेली असतात, तशी लेबल जगभरातील अनेक देशांनी मद्याच्या बाटल्यांवर लावलेली नाहीत. (अपवाद वगळता) अशा प्रकारे मद्यावर जर त्यांच्या गंभीर परिणामांची माहिती दिली गेली, लोकांनी मद्याचे सेवन करण्यासंबंधी जर वेळीच हस्तक्षेप केला गेला, तर त्याचे नक्कीच चांगले परिणाम समोर येतील. लोकांना गंभीर परिणामांची माहिती दिल्यानंतर अशा वस्तू घ्यायच्या की नाही? हा सर्वस्वी त्यांचा निर्णय असेल.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why ireland will soon carry alcohol health labelling policy kvg
Show comments