कमी आणि दुबार मोहोर, कमी थंडी आणि अवकाळी पावसामुळे राज्यातील आणि प्रामुख्याने कोकणातील आंबा उत्पादनात घट होण्याचा अंदाज आहे. त्या विषयी…. मोहोराचे तीनही टप्पे वाया गेले? ‘गुदस्ता हंगाम बरा होता,’… म्हणजे गतवर्षी हंगाम चांगला होता, असे कोकणातील शेतकरी नेहमी म्हणतात. म्हणजे येणाऱ्या प्रत्येक वर्षात काही ना काही अडचणींचा सामना करावा लागतो आहे. आंब्याला तीन टप्प्यात मोहोर येतो. पहिल्या टप्प्यात नोव्हेंबरच्या थंडीत मोठ्या प्रमाणावर मोहोर येतो. यंदाही आला पण नर फुलांचे प्रमाण वाढल्यामुळे फळधारणा झाली नाही. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील मोहोर पूर्णतः वाया गेला. डिसेंबरमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मोहोर आला. आता मिळणारे आंबे डिसेंबरमधील मोहोरापासून मिळत आहेत. जानेवारीमध्ये येणाऱ्या तिसरा टप्प्यातील मोहोर वाढलेल्या तापमानामुळे वाया गेला आहे. जानेवारीतील मोहोरामुळे मे महिन्यात आंबा मिळतो. शेतकरी, आंबा उत्पादक संघटना आणि व्यापारी यंदा सरासरीच्या ४० टक्केच उत्पादन होईल, असे सांगत आहेत.
हवामान बदल, नैसर्गिक आपत्तींमुळे संकट?
यंदाचे वर्ष, हंगाम चांगला जाईल, अशी अपेक्षा होती. पण हंगामाच्या सुरुवातीला नोव्हेंबर २०२४ ला थंडी कमी होती. त्यामुळे मोहोर अपेक्षित प्रमाणात आला नाही. डिसेंबर २०२४ मध्ये थंडीत वाढ झाली. थंडीमुळे डिसेंबरपासून आंब्याच्या बागा मोहोरू लागल्या. डिसेंबरमध्येच कोकणातील ७० ते ८० टक्के बागांना मोठ्या प्रमाणात मोहोर आला. जानेवारी २०२५ च्या पहिल्या आठवड्यापर्यंत मोहोर सुस्थितीत होता. मात्र जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून प्रतिकूल स्थिती निर्माण झाली. थंडीचे प्रमाण वेगाने कमी झाले. कीड – रोगांचा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे मोहोर काळा पडला. त्यामुळे मोहोराचे आंब्यात रूपांतर होऊ शकले नाही. वाटाण्यापेक्षा मोठे झालेले आंबे गळून गेले. त्यानंतर थंडी कमी आणि तापमान वाढत गेले. परिणामी जास्तीच्या तापमानामुळे आंबे टिकणे मुश्कील झाले. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात रात्रीचे तापमान १५ ते १८ अंश सेल्सिअस आणि दिवसाचे तापमान ३५ ते ३६ अंश सेल्सिअसवर गेले. तापमानात १५ अंश सेल्सिअसहून जास्त तफावत पडल्यामुळे फळ करपून गळून पडण्याच्या घटना घडल्या. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात झालेल्या उन्हाळी पावसामुळे पुन्हा फुलमाशीचा प्रादुर्भाव वाढला, आंबा काळा पडू लागला आहे. हवामान बदल आणि नैसर्गिक आपत्तींचा मोठा फटका हापूस उत्पादकांना बसत आहे.
कोकणच्या आर्थिक उत्पन्नाचा प्रमुख स्रोत?
कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे व पालघर या जिल्ह्यांत आजघडीला दीड लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर आंब्याची लागवड आहे. आंबा, काजू, चिकू फळांसाठी शंभर टक्के अनुदानाची योजना राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी सुरू केली होती, ती आजतागायत सुरू आहे. त्यामुळे कोकणात आंबा, काजू, चिकूच्या क्षेत्रात सतत वाढ होताना दिसत आहे. कोकणातील आंबे कोल्हापूर, सांगली, पुणे व नवी मुंबई येथील बाजार समित्यांमध्ये विकले जातात. व्यापारी अनेक वेळा हापूस आंबा उत्पादकांना पावसाळ्यात, गौरी-गणपतीच्या सणाचे औचित्य साधून आगावू पैसे देतात. ही परंपरागत पद्धत कोकणात कमी-अधिक प्रमाणात आजही सुरू आहे. व्यापारी, दलालांच्या रेट्यामुळे त्यांना सुरुवातीला चांगला भाव असताना आंबे विक्रीसाठी पाठवावे लागतात. या पद्धतीमुळे शेतकऱ्यांना अगावू पैसे मिळत असले तरी आणि हक्काचा ग्राहक मिळत असला तरीही शेतकऱ्याचे शोषण होते. शेतकऱ्यांनी आगावू पैसे घेण्याचे टाळावे, रोखीने विक्री करावी, यासाठी महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाकडून सातत्याने जागृती करण्यात येते. मात्र व्यापारी आणि दलाल यात आडकाठी आणताना दिसतात. आजही ६० ते ६५ टक्के आंबा बाजार समित्यांमध्ये विकला जातो. उर्वरित २५ टक्के आंबा किरकोळ बाजारात विकला जातो. १५ टक्के आंबा निर्यात होतो.
ग्राहकांच्या खिशाला झळ?
दरवर्षी फेब्रुवारी ते जून हा चार महिन्यांचा कालावधी आंब्याच्या बाजारासाठी महत्त्वाचा असतो. मात्र, यंदा हवामानातील बदलामुळे आंब्याच्या उत्पादनावर गंभीर परिणाम झाला आहे. परिणामी देशभरात आंब्याची आवक घटली आहे. कोकणातील हापूस आंबा या वर्षी तुलनेने कमी प्रमाणात उपलब्ध होणार असून, मुख्य आवक १ एप्रिल महिन्यात होईल. दरवर्षी मे महिन्यात हापूस उपलब्ध असायचा. यंदा मे महिन्यात हापूसची उपलब्धता कमी असेल. कोकणातील आंबा उत्पादनात सरासरीपेक्षा ६० टक्क्यांनी घट झाल्याचा अंदाज आहे. यंदा गुजरात आणि दक्षिण भारतातील राज्यांमध्येही आंब्याचे उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे संपूर्ण देशभर आंब्याचा पुरवठा घटेल आणि परिणामी बाजारातील दर वाढण्याची शक्यता आहे. मे, जून महिन्यांत हापूसचे दर दरवर्षीपेक्षा चढेच राहण्याचा अंदाज आहे.
आंबा पल्प उद्योगही अडचणीत?
दरवर्षी हापूस हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात म्हणजे एप्रिलअखेरपासून हापूस आंबा पल्प उद्योगासाठी विकला जातो. यंदा उत्पादन कमी असल्यामुळे पल्पसाठी आंबा मिळणार नाही, असे म्हटले जात होते. पण, ढगाळ वातावरण, उन्हाळी पावसामुळे आंब्यावर काळे डाग पडले आहेत. हा डागाळलेला आंबा पल्प उद्योगासाठी विकला जात आहे. सध्या पल्पसाठी हापूसला प्रतिकिलो ६० ते ६५ रुपये किलो दर मिळत आहे. हा दर स्थिर राहण्याची शक्यता आहे. पण, पल्पसाठी आंबा कमी प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे पल्प उद्योगाला आंब्याचा तुटवडा भासेल. शिवाय आंबा चढ्या दराने खरेदी करावा लागेल. मागील काही वर्षे पल्पसाठीचा आंबा सरासरी २५ ते ३० रुपये किलो दराने खरेदी केला जात होता. त्यामुळे पल्प उद्योगाला यंदा अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
dattatray.jadhav@expressindia.com
© The Indian Express (P) Ltd