न्यूझीलंडमधील विमानतळाने आपल्या नातलगांना सोडायला येणार्‍यांसाठी एक अजब नियम लागू केला आहे. नातलगांना निरोप देण्याची आणि त्यांना मिठी मारण्याची वेळ केवळ तीन मिनिटे केली आहे. या नव्या नियमावरून देशातील नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. न्यूझीलंडच्या दक्षिण बेटावरील शहर ड्युनेडिनमधील आंतरराष्ट्रीय विमानतळाने त्यांच्या ड्रॉप-ऑफ झोनमध्ये म्हणजेच जिथे लोक आपल्या नातेवाइकांना सोडायला येतात तिथे एक सूचना पत्र लावले आहे. त्यावर लिहिले आहे, “मिठी मारण्याची जास्तीत जास्त वेळ तीन मिनिटे आहे. नातेवाइकांना निरोप द्यायचा असल्यास कार पार्किंगचा वापर करा.”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या विचित्र नियमाने सोशल मीडियावर वापरकर्त्यांचे लक्ष त्वरित वेधून घेतले आहे. काहींना ही कल्पना मनोरंजक वाटली आहे, तर काहींनी भावनिक निरोप देण्याविरोधात लागू करण्यात आलेल्या या नियमावर अमानवीय म्हणून टीका केली आहे. मात्र, हा नियम लागू करण्यामागील तर्क काय? नवीन नियमाबाबत विमानतळ अधिकाऱ्यांचे काय म्हणणे आहे? त्याविषयी जाणून घेऊ.

विमानतळावर लावण्यात आलेल्या सूचना पत्राचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला. (छायाचित्र-Rod ryan show/एक्स)

हेही वाचा : BRICS Summit: ब्रिक्स म्हणजे काय? यंदाची शिखर परिषद भारतासाठी महत्त्वाची का आहे?

नव्या नियमावरून सोशल मीडियावर वाद

विमानतळावर लावण्यात आलेल्या सूचना पत्राचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला; ज्यानंतर यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. या आठवड्याच्या सुरुवातीला “माझ्या खिडकीतून दृश्य” या फेसबुक ग्रुपवर पोस्ट केलेल्या चिन्हाच्या फोटोने विमानतळाच्या निर्गमन झोनमध्ये योग्य विदाई शिष्टाचाराबद्दल वादविवाद सुरू केले. एका व्यक्तीने टिप्पणी केली की, मला हा निर्णय आवडला. “या निर्णयात करुणा दिसून येते. कारण- ही बाब कळकळ आणि करुणा दाखवते. माझ्या स्थानिक विमानतळावर थांबता येण्याचीदेखील परवानगी नाही. तेथे थांबल्यास तुम्हाला १०० युरो इतका दंड भरावा लागतो आणि एखाद्याला ड्रॉप-ऑफ झोनमध्ये सोडण्यासाठी किमान ५.०० युरो दंड आहे.”

एका वापरकर्त्याने लिहिले की, विमानतळावर आपल्या आप्तजनांना सोडताना त्यांना किती वेळ मिठी मारायची, हे ठरविणारे विमानतळ प्रशासन आहे कोण? अनेकांनी तीन मिनिटांच्या मिठीचा नियम अगदी मनावर घेतला, तर काहींनी याच्याशी निगडित भावनिक पैलूवर विचार केला. “या निर्णयाने मला विचार करण्यास भाग पाडले की, तीन मिनिटे मिठी मारणारे लोक कोण आहेत? कारण- केवळ कुटुंबातील सदस्य आणि अतिशय जवळचे मित्र तीन मिनिटांपर्यंत मिठी मारू शकतात. आणखी एका वापरकरकर्त्याने या निर्णयाला अमानवीय, असे म्हटले आहे.

विमानतळाचे कार्यकारी अधिकारी काय म्हणाले?

न्यूझीलंडच्या ‘आरएनझेड’ रेडिओला दिलेल्या मुलाखतीदरम्यान ड्युनेडिन विमानतळाचे कार्यकारी अधिकारी डॅनियल डी बोनो यांनी विमानतळाच्या ड्रॉप-ऑफ झोनमध्ये नव्याने लागू केलेल्या नियमाविषयी आपले मत मांडले. ते म्हणाले, बरेच लोक त्यांच्या आप्तजनांचा निरोप देण्यासाठी खूप वेळ घेतात. “त्या ड्रॉप-ऑफ क्षेत्रात आमच्याकडे मोजकी जागा आहे आणि बरेच लोक ड्रॉप-ऑफ क्षेत्रात त्यांच्या लोकांना निरोप देण्यासाठी खूप वेळ घालवतात; ज्यामुळे इतरांसाठी जागा शिल्लक राहत नाही,” असे ते म्हणाले. डी बोनो यांनी यावर जोर दिला की निरोपाचा वेळ कमी केल्याने, सर्वांना आपल्या आप्तजनांना निरोप देण्यासाठी वेळ मिळेल. त्यांनी एका अभ्यासाचा संदर्भ देत सांगिताले की, केवळ २० सेकंदांच्या मिठीमुळे ऑक्सिटोसिन आणि सेरोटोनिन या ‘लव्ह हॉर्मोन’च्या उत्सर्जनास उत्तेजन मिळू शकते.

हेही वाचा : ट्रम्प यांनी McDonald’s मध्ये तयार केले फ्रेंच फ्राइज अन् केली नोकरीची मागणी; कारण काय? याचा कमला हॅरिस यांच्याशी काय संबंध?

डी बोनोने नमूद केले की, विमानतळ कर्मचारी लोकांना विनम्रपणे कार पार्कमध्ये जाण्यासाठी विनंती करतात. “लोकांनी किती वेळ मिठी मारावी हे आम्हालादेखील सांगायचे नाही; पण आम्हाला असे करावे लागत आहे,” असेही ते म्हणाले. त्याव्यतिरिक्त विमानतळाने सुरक्षितता वाढविण्यासाठी आणि टर्मिनलसभोवतालची गर्दी कमी करण्यासाठी ड्रॉप-ऑफ झोनची पुनर्रचना केली आहे. डी बोनो यांनी सांगितले, “आम्ही टर्मिनलच्या आसपास वाहतूक प्रवाह आणि सुरक्षितता सुधारण्यासाठी ड्रॉप-ऑफ झोन बदलला आहे.”

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why is a new zealand airport restricting hugs to 3 minutes rac