१५ ऑगस्ट रोजी शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन बांगलादेशातून पलायन केले आणि भारताकडे आश्रय मागितला. सुमारे १० दिवसांनंतर मंगळवारी (१३ ऑगस्ट) बांगलादेशच्या माजी पंतप्रधानांनी या घडामोडींवर आपले मौन सोडले. त्यांचा मुलगा सजीब वाझेद जॉय यांनी एक निवेदन प्रसिद्ध केले; ज्यात शेख हसीना यांनी लोकांना १५ ऑगस्ट रोजी त्यांचे वडील शेख मुजीबुर यांची हत्या झाली. त्यामुळे तो दिवस त्यांनी स्मृतिदिन म्हणून पाळण्यास सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विशेष म्हणजे मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारने १५ ऑगस्टची राष्ट्रीय सुट्टी रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर काही तासांतच त्यांनी हे विधान केले. “१५ ऑगस्टची राष्ट्रीय सुट्टी रद्द करण्याचा निर्णय सल्लागार आणि राजकीय पक्षांच्या परिषदेबरोबर झालेल्या चर्चेत एकमताने घेण्यात आला,” असे मुख्य सल्लागार कार्यालयाकडून पाठविलेल्या पत्रकात सांगण्यात आले. १५ ऑगस्टला राष्ट्रीय सुट्टी घोषित करण्यामागील इतिहास आणि युनूस सरकारने ती सुट्टी रद्द करण्यामागच्या संभाव्य कारणांविषयी जाणून घेऊ.

बांगलादेशमध्ये आंदोलनात अनेक स्मारकाची तोडफोड करण्यात आली. (छायाचित्र-एपी)

हेही वाचा : हिंडनबर्गच्या आरोपांनंतर संयुक्त संसदीय समितीमार्फत सखोल चौकशीची मागणी; ही समिती कसे काम करते? सरकारचा या समितीला विरोध का?

शेख हसीना यांची बांगलादेशला विनंती

हिंसक आंदोलनानंतर देशातून पलायन केल्यानंतर शेख हसीना यांचे पहिलेच विधान समोर आले. त्या म्हणाल्या की, दंगलखोरांना शिक्षा व्हायलाच हवी. अलीकडील दहशतवादी कृत्ये, हत्या व तोडफोड यांत सामील असलेल्यांची चौकशी झाली पाहिजे, त्यांची ओळख पटली पाहिजे आणि त्यांना शिक्षा झाली पाहिजे. त्यांनी या प्रकरणाचा तपास व्हायला हवा असल्याचे सांगितले. याच निवेदनात त्यांनी बांगलादेशातील जनतेला १५ ऑगस्ट हा दिवस ‘राष्ट्रीय शोक दिन’ म्हणून सन्मान आणि गंभीरतापूर्वक पाळण्याचे आवाहन केले.

“हिंसाचाराच्या घटनांमध्ये विद्यार्थ्यांसह अनेक निष्पाप जीवांना आपला जीव गमवावा लागला, त्यांच्या कुटुंबीयांबद्दल मला सहानुभूती आहे. या हत्या आणि दहशतवादी कृत्यांमध्ये सामील असलेल्यांची ओळख पटवण्यासाठी योग्य रीतीने तपास व्हावा आणि त्यांना योग्य शिक्षा व्हावी, अशी माझी मागणी आहे. मी तुम्हाला १५ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय शोक दिन योग्य त्या सन्मानाने आणि गंभीरतेने पाळण्याचे आवाहन करते. बंगबंधू भवन येथे पुष्पहार अर्पण करून आणि प्रार्थना करून सर्व आत्म्यांच्या उद्धारासाठी प्रार्थना करा,” असे आवाहन त्यांनी आपल्या निवेदनाद्वारे केले. नुकत्याच झालेल्या हिंसाचारात बंगबंधू संग्रहालय जाळले गेले. त्याबद्दल त्यांनी दु:ख व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, आमच्या अस्तित्वाचा आधार असलेल्या त्या स्मारकाची तोडफोड करण्यात आली. राष्ट्रपिता शेख मुजीबुर रहमान यांचा अपमान करण्यात आला.

शेख हसीना यांनी लोकांना १५ ऑगस्ट रोजी त्यांचे वडील शेख मुजीबुर यांची हत्या झाली. त्यामुळे तो दिवस त्यांनी स्मृतिदिन म्हणून पाळण्यास सांगितले.(छायाचित्र-रॉयटर्स)

बांगलादेशात शोक दिवस का पाळतात?

१९७५ मध्ये देशाचे पहिले राष्ट्रपती शेख मुजीबुर रहमान यांच्या निर्घृण हत्येची आठवण आणि शोक व्यक्त करण्याच्या दृष्टिकोनातून दरवर्षी बांगलादेशात १५ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय शोक दिवस पाळला जातो. ‘बंगबंधू’ (बंगालचे मित्र) म्हणूनही ते ओळखले जातात. शेख मुजीबुर रहमान हे बांगलादेशचे संस्थापक होते. बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठीच्या आंदोलनांचे आणि लढ्याचे नेतृत्व त्यांनी केले. २६ मार्च १९७१ रोजी त्यांनी बांगलादेशच्या स्वातंत्र्याची घोषणा केली. १५ ऑगस्ट १९७५ रोजी बांगलादेश लष्कराच्या जवानांच्या एका गटाने उठाव केला आणि शेख मुजीबुर रहमान यांच्या धामंडी ३२ येथील निवासस्थानावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांनी आपले प्राण गमावले.

पहाटे ५.३० वाजता हल्लेखोरांनी त्यांच्या घरावर हल्ला केला. त्यांनी निवासस्थानात प्रवेश करीत रहमान यांच्यावर १८ गोळ्या झाडल्या. त्यानंतर झालेल्या हत्याकांडात रहमान यांची पत्नी शेख फजिलातुन्नेसा, त्यांची मुले शेख कमाल, शेख जमाल व शेख रसेल आणि सून सुलताना कमाल व रोझी जमाल यांचा मृत्यू झाला. त्यांच्या दोन मुली शेख हसीना व शेख रेहाना या जर्मनीत असल्याने त्या या हल्ल्यातून बचावल्या. रहमान यांच्या हत्येने बांगलादेशचा इतिहास कायमचा बदलून टाकला. शेख मुजीबुर रहमान यांच्या हत्येनंतर ३५ वर्षांनी २०१० साली बांगलादेशने या गुन्ह्यातील पाच माजी लष्करी अधिकाऱ्यांना फाशी दिली.

१९९६ मध्ये हसीना यांच्या नेतृत्वाखालील अवामी लीग पक्ष देशात सत्तेवर आल्यानंतर १५ ऑगस्ट हा राष्ट्रीय शोक दिवस म्हणून घोषित करण्यात आला. २००१ मध्ये बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी आणि जमात-ए-इस्लामी युती सरकारने तो पुन्हा रद्द केला. परंतु, २००८ च्या उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर १५ ऑगस्ट हा राष्ट्रीय शोक दिवस म्हणून दरवर्षी पाळण्यात येत आहे. प्रत्येक वर्षी या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते. या दिवशी देशाचा राष्ट्रध्वज अर्ध्यावर खाली आणला जातो आणि तो अर्ध्यावर ठेवण्यासह काळा ध्वज फडकवला जातो.

देशाच्या शिल्पकाराचा सन्मान करण्यासाठी अवामी लीग नेत्यांकडून इतर कार्यक्रमही आयोजित केले जातात. यंदा देशात तणावाचे वातावरण असूनही देशातील अवामी लीगच्या काही नेत्यांनी १५ ऑगस्टची तयारी सुरू केली आहे आणि नवीन अंतरिम सरकारकडून सुरक्षेचे आश्वासन मागितले आहे, असे वृत्त ‘ढाका ट्रिब्यून’ने दिले आहे.

राष्ट्रीय शोक दिनाची सुट्टी रद्द करण्याचा निर्णय का?

अंतरिम सरकारने १५ ऑगस्टची सुट्टी रद्द करण्याचा निर्णय का घेतला आहे. मंगळवारी, युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारने अवामी लीग वगळून विविध राजकीय पक्षांबरोबर बैठक घेऊन हा निर्णय मंजूर केला. त्यातील काहींनी हा दिवस राष्ट्रीय सुट्टी म्हणून ठेवण्याच्या बाजूने; तर काहींनी त्याविरोधात मत दिल्याची माहिती ‘एनडीटीव्ही’ने दिली आहे. जनभावना लक्षात घेऊन ही सुट्टी रद्द करण्यात आल्याचे अनेकांचे मत आहे. शेख हसीना यांच्यावर लोकांचा खूप राग आहे. त्याचेच एक उदाहरण द्यायचे झाल्यास आंदोलकांनी शेख मुजीबुर रहमान यांना समर्पित असलेल्या बंगबंधू मेमोरियल म्युझियमवर हल्ला केला आणि त्याला आग लावली. त्याशिवाय आंदोलकांनी ढाका येथे असलेल्या रहमान यांच्या पुतळ्याचीही तोडफोड करण्यात आली.

हेही वाचा : पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच माजी ISI प्रमुखाचे कोर्ट मार्शल; कोण आहेत फैज हमीद? नेमके प्रकरण काय?

भारताच्या बायोकॉनचे संस्थापक व चेअरपर्सन किरण मुझुमदार-शॉ यांनी आपल्या ‘एक्स’वरील पोस्टमध्ये लिहिले, “राष्ट्रपिता यांच्या पुतळ्याची नासधूस? त्यांना त्यांचा इतिहासही माहीत आहे का? बांगलादेशसाठी हा दुःखद दिवस. त्यांनी त्यांच्या पोस्टसह एक व्हिडीओदेखील शेअर केला आहे; ज्यामध्ये दोन लोक हा पुतळा नष्ट करताना दिसत आहेत. मुजीब यांचा इतिहासचा पुसून टाकण्याचा प्रयत्न म्हणून आणि त्यांच्या मुलीच्या राजवटीचा विरोध म्हणून त्यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली, असे बऱ्याच बांगलादेशी निरीक्षकांनी सांगितले आहे. परंतु, सरकारच्या आदेशाला न जुमानता, हसीना यांना आता आपल्या समर्थकांना हा दिवस साजरा करण्यासाठी बोलावले आहे. त्यामुळे अंतरिम सरकारसाठी आणखी एक संकट उद्भवू शकते, अशी चिंता आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why is august 15 national mourning day in bangladesh rac