Aurangzeb hero in Pakistan: अकबर आणि औरंगजेब दोघेही मुघल शासक होते. त्यांच्या कारकीर्दीबाबत भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये वेगवेगळे दृष्टिकोन पाहायला मिळतात. भारतात अकबराचा गौरव केला जातो, तर पाकिस्तानमध्ये त्याच्या धार्मिक सहिष्णुतेसाठी तो बदनाम आहे. याउलट औरंगजेब त्याच्या धर्मप्रेमासाठी सुप्रसिद्ध आहे तर भारतात त्याच्या याच धर्मकट्टरतेसाठी तो कुप्रसिद्ध आहे. इतिहासाचा अभ्यास राष्ट्रनिर्माणाच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतो, हे सत्य भारत आणि पाकिस्तान यांसारख्या तुलनेने नवख्या असलेल्या देशांच्या संदर्भात खरे ठरते, असे इतिहासकार नेहमीच मानतात. दोन्ही देशांचा एक सामायिक भूतकाळ आहे. धर्माच्या आधारे झालेल्या हिंसक फाळणीमधून जन्मलेल्या या दोन्ही देशांमध्ये इतिहासाची समज भिन्न दिशांनी विकसित झाली.
हिंदूद्वेष्टा औरंगजेब
महत्त्वाचे म्हणजे मुघल वंशातील दोन प्रमुख शासक अकबर आणि औरंगजेब यांचे व्यक्तिचित्रण दोन्ही देशांमध्ये पूर्णपणे भिन्न प्रकारे केले जाते. भारतीय पाठ्यपुस्तकांमध्ये औरंगजेब याच्याकडे मुघल साम्राज्याच्या पतनाचे प्रमुख कारण म्हणून पाहिले जाते. तसेच, तो एक धर्मांध आणि कट्टर मुस्लिमशासक असून हिंदूंचा द्वेष करत असे, अशीच प्रतिमा भारतीय जनमानसावर कोरलेली आहे. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकात औरंगजेबाचे वर्णन एक धर्मांध, पुराणवादी व्यक्तीच्या स्वरूपात केले आहे.
गुरू तेगबहादूरजी
शिखांचे नऊवे गुरु तेग बहादूर यांनी यांच्या ४०० व्या प्रकाश पर्वाच्या निमित्ताने केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, …त्या काळात भारताला आपली ओळख वाचवण्यासाठी एक मोठी आशा गुरु तेगबहादुरजी यांच्या रूपाने दिसली होती. औरंगजेबाच्या अत्याचारी मानसिकतेसमोर त्या वेळी गुरु तेगबहादुरजी ‘हिंद दी चादर’ होऊन एका खडकासारखे ठाम उभे राहिले होते.
इकबालांचा द्विराष्ट्र सिद्धांत
तर दुसरीकडे, पाकिस्तानमध्ये औरंगजेबाला आदर्श मुस्लिम शासक म्हणून गौरवले जाते. पाकिस्तानमध्ये त्याच्या सैन्यवादी धोरणांचे, इस्लामच्या प्रति असलेल्या निष्ठेचे आणि साम्राज्याच्या सामाजिक रचनेत इस्लामी नैतिकतेच्या प्रसारासाठी त्याचे कौतुक केले जाते. ‘सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा’ ही कविता लिहिणारे अल्लामा इकबाल यांनी सर्वप्रथम दोन राष्ट्र सिद्धांत (टू नेशन थिअरी) मांडला होता. भारतापासून वेगळे एक स्वतंत्र मुस्लिम राष्ट्र स्थापन होऊ शकते हा विचार अल्लामा इकबाल यांचा होता.
पाकिस्तान सरकारच्या कार्यालयात औरंगजेब
कवी, राजकारणी आणि तत्त्वज्ञ असलेले अल्लामा इकबाल औरंगजेबाला एक राष्ट्रवादी नेता आणि भारतातील मुस्लिम राष्ट्रीयतेचा संस्थापक म्हणून पाहत असत. मौलाना अबुल अला मौदूदी यांसारख्या प्रभावशाली राजकीय नेत्यांनी इस्लामप्रती असलेल्या त्याच्या कट्टर निष्ठेच्या आधारावर औरंगजेबाचे कौतुक केले होते. पाकिस्तानच्या शालेय पाठ्यक्रमांमध्ये औरंगजेबाला इस्लामचा प्रमुख संरक्षक म्हणून दाखवले जाते. जनरल जिया उल-हक यांनी पाकिस्तानमध्ये कट्टर इस्लामिक विचारसरणीचा पाया घातला. त्यांच्या सत्ताकाळापासून मुघल सम्राट औरंगजेबाची व्यक्तिचित्रे (पोर्ट्रेट्स) अनेक सरकारी कार्यालयांमध्ये लावण्यात आली.
औरंगजेबचे व्यक्तिमत्त्व
औरंगजेबच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंवर चर्चा होऊ शकते, परंतु इस्लामप्रती त्याची निष्ठा निर्विवाद आहे, असे इतिहासकार मानतात. औरंगजेब हा शाहजहानचा पुत्र होता. परंतु, शाहजहान हयात असतानाच औरंगजेब आणि त्याच्या तीन भावांमध्ये, विशेषतः दारा शुकोह याच्याशी सत्तेसाठी प्रखर संघर्ष सुरू झाला. दारा शिकोह यांनी हिंदू-मुस्लिम ऐक्याचे खुलेपणाने समर्थन केले होते. शाहजहान यांनी दाराला उत्तराधिकारी म्हणून निवडले होते. परंतु, औरंगजेबाने शाहजहानला आग्रा किल्ल्यात कैद करून आपल्या भावांविरुद्ध सत्तासंघर्ष केला आणि अखेरीस त्याला ठार मारून सत्ता मिळवली.
१६५९ नंतरचा औरंगजेब आणि त्याचे धर्मनीतिसंबंधी निर्णय
१६५९ मध्ये दुसऱ्यांदा राज्याभिषेक झाल्यानंतर औरंगजेबाने इस्लामिक कायद्यांच्या पालनाच्या नावाखाली काही कडक नियम लागू केले. त्याने दारू, जुगार आणि वेश्यावृत्ती यांसारख्या प्रथा बंद करण्याचे आदेश दिले. याशिवाय, इस्लामिक कायद्यानुसार मंजूर नसलेले काही कर रद्द करण्यात आले. परंतु, घटता महसूल भरून काढण्यासाठी गैर-मुस्लिमांवर ‘जिझिया कर’ पुन्हा लादला. एकूणच यामुळे भारतीय नागरिक प्रामुख्याने हिंदू त्यास विरोधक मानतात तर पाकिस्तानातील मुस्लिम त्याचे कोडकौतुक करतात.