बॅटमिंटन हा कमी साहित्यात खेळाला जाणारा खेळ आहे. कुणालाही खेळता यावे असा खेळ, अशी या खेळाची ख्याती आहे. नंदू नाटेकर, प्रकाश पदुकोण, पुलेला गोपीचंद, सायना नेहवाल, पीव्ही सिंधू, किदाम्बी श्रीकांत, सय्यद मोदी, पारुपल्ली कश्यप, अपर्णा पोपट, ज्वाला गुट्टा या काही भारतीय नामवंत बॅटमिंटनपटूंनी या खेळावर आपली मोहोर उमटवली आहे. प्रत्येक खेळासाठी नियम असतात तसेच या खेळालाही आहेत. बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने ही संस्था या खेळाच्या नियमांवर नियंत्रण ठेवून असते. नियमबदल करण्याचे अधिकारही त्यांच्याचकडे आहेत. बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने (BWF) आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये ‘स्पिन सर्व्ह’ वर तात्पुरती बंदी घातली आहे. या ‘स्पिन सर्व्ह’ साठी शटलकॉक हे अंगठा आणि मधल्या बोटामध्ये धरून ते सर्व्ह करण्यासाठी फिरवावे लागते. या पद्धतीत शटलकॉक नेटच्या जवळ पडत असल्याने ते परतवणे कठीण जाते त्यामुळे ही बंदी घालण्यात आली आहे. त्यांनी घेतलेला हा निर्णय क्रीडाक्षेत्रात सध्या चर्चेचा ठरलेला आहे. त्याच पार्श्वभूमीवर बॅटमिंटन व त्याचे भारताशी असणारे नाते जाणून घेणे रंजक ठरावे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बॅटमिंटन

बॅडमिंटन हा खेळ कोर्ट किंवा लॉनवर लाइटवेट रॅकेट आणि शटलकॉक यांच्या साहाय्याने खेळला जातो. हा खेळ खेळण्याची शास्त्रीय पद्धत असली तरी हा खेळ मोकळ्या जागेत कुठेही खेळला जावू शकतो. सभोवतालच्या वाऱ्याच्या गतीवर त्या जागेची उपयुक्तता ठरते. या शटलकॉकला “पक्षी” किंवा “बर्डी” देखील म्हटले जाते. बॅडमिंटनमध्ये वापरण्यात येणारे शटलकॉक १६ पंखांच्या मदतीने तयार केले जात होते. पारंपारिकरित्या तयार करण्यात येणाऱ्या कॉकचे वजन साधारण ५ ग्रॅम इतके असायचे. पक्ष्यांच्या पंखांपासून शटलकॉक तयार करण्याची परंपरा आता जवळपास बंद झाली असून सिंथेटिक मटेरियलपासून तयार केलेल्या शटलला बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने परवानगी दिली आहे.

आणखी वाचा : विश्लेषण: क्लिओपात्रा खरंच गाढविणीच्या दुधाने अंघोळ करायची का?

या खेळाला बॅटमिंटन असे नाव कधी मिळाले?

बॅटमिंटन हा खेळ इंग्लंड मध्ये प्रथम १८७३ साली खेळला गेला होता. हा खेळ इंग्लंडमधील ग्लुसेस्टरशायरमधील ड्यूक्स ऑफ ब्यूफोर्टच्या यांच्या मालकीच्या इस्टेटीत प्रथम खेळला गेला. या इस्टेटीच्या ड्यूकने त्याच्या ‘बॅडमिंटन हाऊस’च्या नावावरून या खेळाला ‘बॅडमिंटन गेम’ म्हटले. त्या दिवसापासून हा खेळ बॅटमिंटन या नावाने प्रसिद्ध झाला.

या खेळाचे प्राचीनत्त्व किती आहे ?

या खेळाची नेमकी सुरुवात कधी झाली याविषयी ठोस पुरावे उपलब्ध नाहीत. प्राचीन भारत, चीन, ग्रीक यांच्या ऐतिहासिक संदर्भांमध्ये शटलकॉक व रॅकेट यासदृश्य साधनांच्या माध्यमातून काही खेळ खेळले जात होते याचे संदर्भ सापडतात. इतिहासकार या खेळाची ऐतिहासिकता दोन हजार वर्षे इतकी जुनी असल्याचे नमूद करतात. इतकेच नाही तर खुद्द युरोपातही या खेळासारखाच दुसरा एक खेळ अस्तित्त्वात असल्याचे दाखले ऐतिहासिक स्रोतांच्या माध्यमातून दिले जातात. ‘बॅटलडोर’ नावाचा खेळ मध्ययुगीन काळात युरोपात प्रसिद्ध होता. या खेळात ‘बॅटलडोर’ किंवा ‘पॅडलच्या’ मदतीने शटलकॉकला शक्य तितक्या लांब हवेत भिरकावण्यात येत असे. तसेच हा खेळ एकाच वेळी अनेकांमध्ये खेळण्याची परंपरा होती. हा खेळ लहानमुलांमध्ये विशेष प्रिय होता. हे जरी असले या स्थानिक खेळाला आंतरराष्ट्रीय खेळाचे स्वरूप प्राप्त होण्याची सुरूवात मात्र भारतात झाली.

बॅटमिंटन की पुना गेम?

१८६० सालच्या सुमारास भारतात- पुण्यात कार्यरत असलेल्या ब्रिटिश सैनिकांची येथे शतकानुशतके खेळल्या जाणाऱ्या बॅटमिंटन खेळाच्या भारतीय प्रकारच्या खेळाशी ओळख झाली. स्थानिक खेळांत ब्रिटिशांनी काही बदल घडवून आणले व खेळाचे काही नियम तयार केले. ब्रिटिश सैनिकांना या खेळाची ओळख पुण्यात झाली म्हणूनच ते या खेळाला ‘पुना गेम’ असे संबोधत असत. १८६७ साली या खेळासाठी ब्रिटिशांकडून नियमांचा पहिला संच तयार करण्यात आला होता. दक्षिण भारतात हा खेळ शटलकॉक ऐवजी बॉल वापरून खेळला जात असे. भारतातून मायदेशी परतलेल्या ब्रिटिश सैनिकांनी या खेळाची परंपरा आपल्या सोबत मायदेशी नेल्याचे लेखी संदर्भ उपलब्ध आहेत.

आणखी वाचा : विश्लेषण: स्टारबक्स- ‘इट स्टार्ट्स विथ युवर नेम’; नेमका वाद आहे तरी काय?

स्थानिक भारतीय खेळ ते आंतरराष्ट्रीय खेळ

भारतातून इंग्लंडमध्ये परतलेल्या सैनिकांमुळे हा खेळ लवकरच तेथेही प्रसिद्ध झाला. म्हणूनच १८७७ सालामध्ये पहिल्या बॅडमिंटन क्लबची स्थापना इंग्लंडमध्ये करण्यात आली. स्थापनेनंतर या क्लबने भारतात तयार केलेल्या बॅडमिंटन खेळाच्या नियमांचे पुनर्लेखन केले. बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाची (बीएआय) स्थापना इंग्लंड बॅडमिंटन असोसिएशनच्या (बीएई) स्थापनेनांतर सहा वर्षानंतर १८९९ मध्ये करण्यात आली. ही जगातील सर्वात जुनी बॅडमिंटन प्रशासकीय संस्था आहे.आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन फेडरेशनची (IBF) स्थापना १९३४ सालामध्ये झाली. या जागतिक प्रशासकीय संस्थेचे नामकरण नंतरच्या काळात बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन (BWF) असे करण्यात आले. भारत १९३६ साली या फेडरेशनमध्ये सहभागी झाला. १९४८ साली ‘थॉमस कप’ या नावाने पार पडलेली जागतिक पुरूष सांघिक चॅम्पियनशिप ही बॅडमिंटन या खेळाची पहिली मोठी स्पर्धा होती. त्यानंतर ‘सुपरसिरीज’ किंवा ‘बीडब्लूएफ वर्ल्ड टूर’ या नावाने या नावाने ओळखल्या जाणार्‍या अनेक जागतिक बॅटमिंटन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.

पुना गेम ते ऑलिम्पिक मधील बॅटमिंटन

१९९२ साली बॅटमिंटन हा खेळ बार्सिलोना येथील उन्हाळी ऑलिम्पिकचा एक भाग झाला. दीपांकर भट्टाचार्य आणि यू विमल कुमार हे बार्सिलोनामध्ये झालेल्या ऑलिंपिक खेळामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारे पहिले पुरुष खेळाडू ठरले होते. तर त्यावेळी मधुमिता बिष्ट या एकमेव महिला प्रतिनिधी होत्या. १९९२ च्या बार्सिलोना गेम्समध्ये बॅडमिंटनच्या ऑलिम्पिक पदार्पणानंतर जागतिक खेळ म्हणून बॅडमिंटनची लोकप्रियता प्रचंड वाढली. प्रथमच क्रीडा चाहत्यांनी शटलर्स-खेळाडूंना त्यांच्या देशासाठी लढताना आणि पदके जिंकताना पाहिले!

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why is badminton known as poona game svs
Show comments