bgmi ban in india: बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया म्हणजेच ‘बीजीएमआय’वर भारतात बंदी घालण्यात आलीय. गुगल प्लेस्टोअर आणि अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवरुन गुरुवारी हा गेम हटवण्यात आला आहे. भारतामध्ये पबजी या गेमवर बंदी घालण्यात आल्यानंतर बीजीएमआय हा गेम पर्याय म्हणून लॉन्च करण्यात आलेला. मागील वर्षी हा गेम भारतात लॉन्च करण्यात आला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारताने गलवान येथे झालेल्या संघर्षानंतर चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालती होती. भारताच्या सुरक्षेला या अ‍ॅपमुळे धोका निर्माण होत असल्याचं कारण देत ही बंदी घालण्यात आली होती. आता या या अ‍ॅपच्या यादीमध्ये बीजीएमआयचाही समावेश झाल्याचं चित्र दिसत आहे. कारण हा गेम आता अॅण्ड्रॉइड आणि आयओएस दोन्ही स्टोअर्सवर उपलब्ध नाहीय. पण या गेमवर बंदी का घालण्यात आलीय?

‘बीजीएमआय’वर नेमकी का बंदी घालण्यात आलीय याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसलं तरी प्राथमिक अंदाजानुसार पबजीसारख्या गेम्समुळे हत्याकांड घडल्याची प्रकरण समोर आल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं बोललं जातंय. काही दिवसांपूर्वीच समोर आलेल्या वृत्तानुसार १६ वर्षीय मुलाने आपल्या आईसोबत पबजीसारख्या ऑनलाइन गेमवरुन भांडण झाल्याने तिची हत्या केली होती. या प्रकरणाचा सखोल तपास सध्या सुरु आहे.

केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी पबजीवर भारतामध्ये २०२० पासून बंदी असल्याचं सांगतानाच अशा अ‍ॅप्सचे नवीन प्रकार त्यानंतर बाजारात आल्याचं म्हटलंय. या वक्तव्याचा थेट संबंध बीजीएमआयशी आहे. हिंसा कमी करुन नव्या स्वरुपामध्ये पबजी असं बीजीएमआयचं वर्णन करता येईल.

गुगलने यासंदर्भातील आपली भूमिका मांडताना, “आम्हाला देण्यात आलेल्या निर्देशांनुसार आम्ही ही बंदी घालती असून हा गेम प्ले स्टोअर इंडियावर उपलब्ध असणार नाही” असं स्पष्ट केलंय. हा गेम बनवणाऱ्या क्रॅफ्टॉन कंपनीने आम्हाला यासंदर्भातील जी माहिती मिळेल ती वेळोवेळी देत राहू असं सांगितलंय.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why is bgmi banned in india google and krafton offer statements scsg