Chanderi saree history गोऱ्या गोऱ्या वाहिनीची अंधाराची साडी… अंधाराच्या साडीवर चांदण्यांची खडी! …या ग. दि. माडगूळकरांच्या कवितेतील दोन ओळी लहानग्यांच्या मनातील भावना बोलून दाखवणाऱ्या असल्या तरी, साडी म्हटलं की …प्रत्येक भारतीय महिलेचा वीक पॉईंट ठरतो. फॅशन बदलत जाते, जीन्स, वनपीस, क्रॉप टॉप …असे कितीही वेगवेगळे प्रकार आले तरीही साडीची जागा मात्र त्यांना घेता आलेली नाही. साडीने नेहमीच एकाधिकार गाजवला आहे. भारतात साड्यांचे अनेक प्रकार आहेत. प्रत्येक प्रकाराचे स्वतःचे असे वैशिष्ट्य आहे. सध्या ट्रेण्ड मध्ये असणारा प्रकार म्हणजे ‘चंदेरी साडीचा’. या साडीला साड्यांच्या राणीची उपमा दिली जाते, असं का, याचा घेतलेला हा आढावा.
अधिक वाचा: का घातली होती चर्चने लिपस्टिकच्या वापरावर बंदी?
चंदेरी ही साडी मूळची मध्यप्रदेशातील, चंदेरी या शहरातली. नावावरूनच लक्षात आलं असेल की, या साडीला किंवा तिच्या फॅब्रिकला चंदेरी हे नाव का मिळालंय. चंदेरी हे अशोकनगर जिल्ह्यातील ऐतिहासिक महत्त्व असलेले शहर आहे. या शहराला प्राचीन इतिहास तर आहेच पण कापड उद्योगाच्या निमित्ताने मिळालेला सांस्कृतिक वारसाही आहे. म्हणूनच या ऐतिहासिक वारसा असलेल्या चंदेरी साडीविषयी अधिक जाणून घेण्यासाठी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने प्रसिद्ध फॅशन डिझायनर अंजू मोदी यांच्याशी संपर्क साधला. त्या म्हणाल्या, १९८५ साली त्यांनी चंदेरी या गावाला भेट दिली होती. ही गोष्ट त्यांना प्रसिद्ध फॅशन डिझायनर म्हणून ओळख मिळण्यापूर्वीची आहे. त्या सांगतात, या सगळ्याची सुरुवात चंदेरी या गावात झाली. मी एका कारागिराच्या घरात राहिले होते. त्यांनी मला चंदेरीतील प्राचीन विणकाम दाखवले. त्यातून मला प्रेरणा मिळाली आणि शिकण्यास मदत झाली.
चंदेरी ही कलाकृतीच!
चंदेरी फॅब्रिक हे प्रसिद्ध आहे. ज्या वेळी आपण भारताला कापड उद्योगाचा वारसा आहे असे म्हणतो, त्यावेळी चंदेरी हे कापड त्या ऐतिहासिक वारश्यातील महत्त्वाचा दागिना आहे. चंदेरीचे वर्णन काय वेगळे करावे? ज्याने स्पर्श केलाय त्यालाच त्याची अनुभूती. हे कापड नाजूक, तलम असते. अगदीच सांगायचे झाले तर वाऱ्यावर ऐकू येणारी हलकी कुजबुज असते, तसेच हे कापड मुलायम. या कापडाची ही वैशिष्ट्ये सुती आणि रेशमी धाग्यात गुंफली जातात. हीच गुंफण रसिकांना गेली अनेक शतकं मोहीत करत आहे. चपळ बोटांनी आणि धीरगंभीर हृदयाने कारागीर कच्च्या मालाचे उत्कृष्ट कलाकृतींत रूपांतर करतात. प्रत्येक धागा आणि आकृतिबंध कारागिरांच्या अनेक पिढ्यांचा वारसा सांगतो.
सोन्यात विणले जात होते हे कापड!
याच विषयी पर्ल अकादमीच्या फॅशन विभागातील प्राध्यापिका सरोज बाला यांनी चंदेरी या कापडाच्या पौराणिक संदर्भांविषयी माहिती दिली. त्यांनी चंदेरीची पाळेमुळे वैदिक कालखंडापर्यंत मागे जातात असे सांगितले. प्रचलित आख्यायिकेनुसार श्रीकृष्णाचा आत्येभाऊ शिशुपाल याने चंदेरी या शहराची निर्मिती केली. विशेष म्हणजे त्यालाच या कापड निर्मितीचे श्रेय ही दिले जाते. असे असले तरी या वस्त्र निर्मितीचा खरा विकास इसवी सनाच्या १३ व्या शतकात झाल्याचे मानले जाते. लघुचित्रांच्या उदयाबरोबर या तलम, झिरझिरीत कापडावर सुरु झालेल्या विणकामाने या कलेला नवीन झळाळी दिली. याच कालखंडात झांशीचे कोष्टी विणकर चंदेरी गावात स्थायिक झाले. त्यांना मुघलांचा राजश्रय मिळाला. या काळात राजघराण्यांसाठी चंदेरी कापड शुद्ध सोन्यात विणले जात होते. कालांतराने ही कला अधिक विकसित होत गेली. १९३० च्या दशकात विणकरांनी जपानी रेशीम शोधून काढले आणि सुती धाग्याच्या जागी रेशीम वापरण्यास सुरुवात केली,” असे बाला यांनी सांगितले.
चंदेरी साडीची निर्मिती कशी केली जाते? तिचे वेगळेपण काय?
पारंपारिक चंदेरी विणकामात कारागीर बारीक रेशीम आणि सुती धाग्यांचा वापर करतात. अधूनमधून जरी किंवा सोन्या-चांदीच्या धाग्यांचा समावेश करून त्याची समृद्धी वाढवली जाते. हे कापड त्याचा हलकेपणा, पारदर्शकता आणि सूक्ष्म चमक यासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे “मध्य प्रदेशचे रत्न” म्हणून ते ओळखले जाते. ARCVSH च्या डिझायनर पल्लवी सिंग यांच्या मते, चंदेरीचे अष्टपैलुत्व विविध कपड्यांमध्ये चमकते. सुरुवातीला केवळ साड्या विणल्या जात होत्या. आता या फॅब्रिकचा वापर करून लेहेंगा, कुर्ते यांसारखे पोशाखही तयार केले जातात. सध्या विणकर अनेक प्रयोग करत आहेत. ऑर्गेन्झाचा वापर करून या साड्या विणत आहेत. इतकंच नाहीतर वेगवेगळ्या नक्षीकामासाठी डिझाइन्सचा वापर यात केला जाते आहे, असे सिंग म्हणाल्या.
मोइरे प्रभाव
खरंतर चंदेरीच्या फॅब्रिकची जादू त्याच्या अनोख्या विणकाम तंत्रात आहे. यामुळे साडीवर पाण्याच्या लाटांचा विभ्रम निर्माण करत मंत्रमुग्ध करणारा मोइरे प्रभाव निर्माण होतो. एकूणच चंदेरीच्या निर्मितीत त्या कापडाला मिळालेले सौंदर्य, या कापडाच्या जगात एक विलक्षण दर्जा मिळवून देते, असे मत बाला यांनी व्यक्त केले. या फॅब्रिकमध्ये असणारा मऊसूत फील, चमक आणि मंत्रमुग्ध करणारे डिझाईन यांमुळे हे कापड फॅशनप्रेमींसाठी एक प्रतिष्ठित पर्याय ठरले आहे. साधी चंदेरी साडी तयार करायला १५-२० दिवस लागतात आणि ‘द जाल’ सारखी क्लिष्ट तंत्रे आणली तर हा कालावधी दोन ते तीन महिन्यांपर्यंत वाढू शकतो, असे मत मोदी यांनी व्यक्त केले.
अधिक वाचा:क्लिओपात्रा खरंच गाढविणीच्या दुधाने अंघोळ करायची का?
रेशीम आणि सुती चंदेरी म्हणजे काय?
चंदेरी पारंपारिकपणे रेशीम आणि सुती धागा वापरून तयार केली गेली होती, परंतु आज, शुद्ध सुती किंवा रेशीम असे दोन्ही प्रकार उपलब्ध आहेत. सिंग यांनी सांगितले की, पारंपारिक चंदेरी साडीमध्ये १०-१२ टक्के रेशीम असते अशा साड्यांना सिल्क चंदेरी म्हणून ओळखले जाते. चंदेरी ही साडी तिच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध तर आहेच परंतु भारतीय वातावरणानुसार ती उत्तम पेहरावही ठरते. दमट वातावरणात ती क्लेशदायक ठरत नाही, तर पावसाळ्यात जलदगतीने कोरडे होण्याती तिची क्षमता हा अतिरिक्त फायदा आहे.
खरी आणि नकली चंदेरी यात फरक कसा करता येईल?
शतकानुशतके, चंदेरी तिचे मूळ सार जपत विकसित होत आहे. हातमाग हे चंदेरी कारागिरीचे प्रतीक आहे, परंतु आधुनिक बाजारपेठेतील मागणी पूर्ण करण्यासाठी पॉवरलूमचा वापरकरून साड्या तयार करण्यात येतात. मोदींनी सांगितले की, शुद्ध कापूस आणि रेशमी धाग्यांपासून तयार केलेल्या पॉवरलूम चंदेरीस “नकली म्हणता येणार नाही.” यामुळे कारागिरांना लागणारा वेळ आणि श्रम कमी लागतात. हातमाग चंदेरीच्या तुलनेत या साड्या खूप स्वस्त असतात. तर हातमागावरील विणकामामुळे उत्तम दर्जाची आणि सूक्ष्म चमक असणाऱ्या चंदेरी साडीची निर्मिती होते. शिवाय मोइरे म्हणून ओळखला जाणारा चमकणारा प्रभावही निर्माण होतो असे बाला यांनी स्पष्ट केले. सिंग म्हणाल्या की, अस्सल चंदेरी मऊ, गुळगुळीत आणि त्यातून प्रकाश सहजतेने झिरपतो, तर नकली चंदेरी अनेकदा नायलॉन सिल्कसारख्या सामग्रीच्या वापरामुळे अधिक कडक आणि कमी तलम असते. अस्सल चंदेरी त्याच्या श्रम-केंद्रित उत्पादन प्रक्रियेमुळे अधिक महाग असतात.