अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह परराष्ट्र व्यवहार समितीचे अध्यक्ष मायकल मॅकॉल यांच्या नेतृत्वाखालील तेथील काँग्रेस (अमेरिकी कायदेमंडळ) सदस्यांच्या शिष्टमंडळाने नुकतीच सर्वोच्च बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांची भेट घेतली. चीनचा विरोध डावलून ही भेट घेतल्याने या देशाने संताप व्यक्त केला असून दलाई लामा यांच्या संपर्कापासून अमेरिकेने दूर राहावे, असा इशारा दिला. अमेरिकी शिष्टमंडळाने दलाई लामा यांची भेट का घेतली आणि चीन यावर आगपाखड का करत आहे, याविषयी…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमेरिकी शिष्टमंडळ भारतात का आले?

नोबेल शांतता पारितोषिक विजेते दलाई लामा यांना भेटण्यासाठी अमेरिकी प्रतिनिधीगृहाचा सात सदस्यीय गट भारत दौऱ्यावर आला. अमेरिकेने तिबेटी नागरिकांच्या धर्म आणि संस्कृतीचे पालन करण्याच्या अधिकारांचे दीर्घकाळ समर्थन केले आहे आणि भारताच्या सीमेला लागून असलेल्या दुर्गम हिमालयीन प्रदेशात मानवी हक्कांचे उल्लंघन केल्याचा आरोप चीनवर केला आहे. अमेरिकी प्रतिनिधीगृहाने या महिन्यात मंजूर केलेल्या द्विपक्षीय विधेयकाचे उद्दिष्ट आहे की चीनला तिबेटच्या नेत्यांशी चर्चा करण्यास भाग पाडणे. २०१० पासून तिबेटवरील वाटाघाटी करार थांबले असून ते सुरक्षित करणे आणि ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि भाषिक तिबेटच्या आकांक्षांना सामोरे जाण्यासाठी चीनला प्रेरित करणे हे या भेटीमागील उद्दिष्ट आहे. धर्मशाळा येथील मध्यवर्ती तिबेटी प्रशासनाच्या (सीटीए) मुख्यालयात अमेरिकी शिष्टमंडळाने दलाई लामांची भेट घेतली. लोकशाहीत नागरिक स्वतंत्र असतात. मात्र निरंकुश सत्तेत ते गुलाम होऊन राहतात, असे सांगत मॅकॉल यांनी चीनच्या हुकूमशाही राजवटीवर नाव न घेता टीका केली. तिबेटी नागरिकांचा स्वतंत्र धर्म, संस्कृती तसेच ऐतिहासिक ओळख आहे. त्यांना भविष्याबाबत आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार असायला हवा. त्यामुळेच चीनच्या कम्युनिस्ट पक्षाने दिलेल्या इशाऱ्याला न जुमानता आपण येथे आलो आहोत, असे ते म्हणाले.

हेही वाचा >>>ह्युंदाई मोटर इंडियाचा ‘महा-आयपीओ’ कसा असेल? देशात आजवरचा सर्वांत मोठा ठरणार?

अमेरिकी शिष्टमंडळात कोण कोण होते?

अमेरिकेच्या हाऊस ऑफ कॉमन्स परराष्ट्र व्यवहार समितीचे अध्यक्ष मायकल मॅकॉल यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ भारतात आले होते. अमेरिकी प्रतिनिधीगृहाच्या माजी अध्यक्षा नॅन्सी पॅलोसी, सदस्य मॅरिनेट मिलर, ग्रेगरी मिक्स, निकोल मॅलियोटॉकिस, जिम मॅकगनवर्न आणि ॲमी बेरा हे उपस्थित होते. मायकल मॅकॉल आणि जिम मॅकगनवर्न हे ‘प्रमोटिंग अ रिझोल्यूशन टू द तिबेट-चायना डिस्प्यूट ॲक्ट’ किंवा ‘रिझॉल्व्ह तिबेट ॲक्ट’ या कायद्याचे सहलेखक आहेत. शिष्टमंडळाने तिबेटच्या निर्वासित सरकारच्या अधिकाऱ्यांचीही भेट घेतली, जे भारतातून काम करतात.

दलाई लामा कोण आहेत?

दलाई लामा हा मंगोलियन शब्द असून ते नाव नाही, तर उपाधी आहे. दलाई म्हणजे महासागर आणि लामा म्हणजे ज्ञान. अर्थात ज्ञानाचा सागर म्हणजे दलाई लामा. सध्याच्या दलाई लामांचे मूळ नाव तेनजिन ग्यात्सो हे असून ६ जुलै १९३५ रोजी तिबेट येथील आम्दा प्रांतात एका गरीब शेतकऱ्याच्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला. ते १४ वे दलाई लामा आहेत. वयाच्या १६ व्या वर्षीच त्यांच्यावर तिबेट देशाची सुरक्षा, संस्कृती व बौद्ध धम्माच्या रक्षणाची जबाबदारी आली. तिबेटची राजधानी ल्हासा येथे त्यांच्या निवासस्थानावर चिनी सेनेने आक्रमण केले, त्यावेळी दलाई लामा हे आपल्या अनुयायांसोबत भारतात आले. १९५९ पासून ते भारतात राहत असून हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा येथे त्यांचे निवासस्थान आहे. दलाई लामांनी जगात अहिंसा, शांती व मानवतेच्या रक्षणासाठी कार्य केले. तिबेटी लोकांच्या हितरक्षणासाठी हयातभर कार्य केले म्हणून त्यांना १९८९ मध्ये शांततेसाठीचे नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.

हेही वाचा >>>पूनम पांडे, दु:खाचे भांडवल आणि लक्ष वेधण्याचा प्रकार; ‘सॅड फिशिंग’बाबतचे नवे संशोधन काय सांगते?

अमेरिकी शिष्टमंडळाची भारतभेट वादग्रस्त का?

चीन आणि अमेरिका द्विराष्ट्रीय संबंध सुधारण्यासाठी धडपडत असताना अमेरिकी शिष्टमंडळाने दलाई लामांची भेट घेतल्याने चीन संतप्त झाला आहे. २०२० मध्ये पूर्व लडाखमध्ये गलवान खोऱ्यात चिनी व भारतीय सैन्यांमध्ये झालेल्या लष्करी संघर्षात २४ भारतीय सैनिक शहीद झाले. त्यामुळे चीन व भारत यांच्यातील संबंधही ताणले गेले आहेत. त्यामुळे अमेरिकी शिष्टमंडळाची भारतभेट वादग्रस्त मानली जात आहे. तिबेट हा स्वायत्त प्रदेश चीनचा भाग असल्याचे अमेरिका मानत असली तरी विवादाचे निराकरण करण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन लवकरच तिबेट कायद्यावर स्वाक्षरी करण्याची अपेक्षा आहे. ‘‘या भेटीने तिबेटला त्यांच्या स्वत:च्या भविष्याबाबत सांगण्यासाठी अमेरिकी काँग्रेसमध्ये द्विपक्षीय समर्थन अधोरेखित केले पाहिजे,’’ असे मॅकॉल यांनी भारत दौऱ्यावर येण्यापूर्वी सांगितले होते.

चीनचे आक्षेप काय आहेत?

दलाई लामा यांची तिबेट चीनपासून मुक्त व्हावा अशी इच्छा आहे. त्यांना त्यांच्या दुर्गम हिमालयीन मातृभूमीसाठी खरी स्वायत्तता हवी आहे. मात्र चीन नेहमीच दलाई लामांवर विभाजनवादी किंवा फुटीरतावादी असल्याचा आरोप करत आहे. अमेरिकेन दलाई गटाचे चीनविरोधी आणि फुटीरतावादी स्वरूप पूर्णपणे ओळखावे आणि त्याच्याशी कोणत्याही प्रकारचा संपर्क ठेवू नये, असे चीनने म्हटले आहे. परदेशी नेत्यांनी दलाई लामा यांची भेट घेतली तर त्यावर चीनने नेहमीच आक्षेप घेतला आहे. सर्वात वादग्रस्त मुद्दा म्हणजे दलाई लामा यांचे उत्तराधिकारी नेमण्याचे काम सुरू आहे. दलाई लामा यांचे उत्तराधिकारी नेमण्याचा अधिकार त्यांना असल्याचे चीनने म्हटले आहे, तर दलाई लामा समर्थकांनी त्याला आक्षेप घेतला आहे. तिबेटवर आपले नियंत्रण मजबूत करण्याच्या हालचालींमध्ये, दलाई लामा म्हणतात की ‘‘केवळ तिबेटी जनताच हे ठरवू शकते की दलाई लामांचा उत्तराधिकारी कोण असेल आणि माझा उत्तराधिकारी भारतात सापडू शकतो.’’

sandeep.nalawade@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why is china angry with the visit of the dalai lama by the american delegation print exp amy