भारताने हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची चाचणी करून जगातील निवडक देशांच्या पंक्तीत बसण्याचा मान पटकावला आहे. क्षेपणास्त्र तंत्रज्ञानातील या भरारीने भारताची मान ताठ झाली आहे. संरक्षण दलात दाखल होईपर्यंतचा काळ अधिक महत्त्वाचा असतो. या क्षेपणास्त्राच्या आणखी काही चाचण्याही कदाचित पार पडू शकतात.
जगातील निवडक देशांच्या पंक्तीत…
हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी नुकतीच भारताने घेतली आणि जगातील निवडक देशांच्या पंक्तीत स्थान मिळवले. आवाजापेक्षा पाच पटींहून अधिक वेगाने जाऊन हे क्षेपणास्त्र शत्रूवर आग ओकते. या वेगामुळे शत्रूची संरक्षण फळी प्रसंगी भेदून क्षेपणास्त्रे त्यांचे लक्ष्य गाठतात. क्षेपणास्त्रसज्जतेत आजवर भारताने मोठी आघाडी घेतली आहे. विविध प्रकारची क्षेपणास्त्रे स्वबळावर विकसित केली असून, हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची निर्मिती हा या मालिकेतील कळसाध्याय ठरावा.
हेही वाचा >>>‘नासा’समोर नवं संकट, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर वायुगळती; नेमकी कशामुळे? परिणाम काय?
देशांत्रग्त निर्मिती
या क्षेपणास्त्राच्या चाचणीनंतर देशभरातून शास्त्रज्ञांचे अभिनंदन करण्यात आले. संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी ही चाचणी खूप मोठे यश असल्याचे म्हटले असून, हा क्षण ऐतिहासिक असल्याचे प्रतिपादन केले आहे. भारताचे हे पहिलेवहिले दीर्घ पल्ल्याचे हायपरसॉनिक क्षेपणास्त्र आहे. संरक्षण, संशोधन व विकास संघटनेने (डीआरडीओ) या क्षेपणास्त्राची निर्मिती केली आहे. दीड हजार किलोमीटरहून अधिक अंतरावरील लक्ष्यांना नष्ट करण्यासाठी या क्षेपणास्त्रांचा वापर करता येईल. हैदराबाद येथील डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम मिसाइल कॉम्प्लेक्ससह डीआरडीओच्या विविध प्रयोगशाळांमध्ये या क्षेपणास्त्राची निर्मिती झाली आहे.
हायपरसॉनिक क्षेपणास्त्र म्हणजे काय?
आवाजापेक्षा पाच पटींहून अधिक (माक-५) वेगाने क्षेपणास्त्रे शत्रूच्या दिशेने झेपावतात. मात्र, काही हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे १५ ‘माक’हून अधिक वेगाने जातात. पारंपरिक शस्त्रांबरोबरच अण्वस्त्रेदेखील या क्षेपणास्त्रांमधून डागता येतात. हायपरसॉनिक शस्त्रप्रणालीचे दोन प्रकार आहेत. हायपरसॉनिक ग्लाइड व्हेइकल (एचजीव्ही) आणि हायपरसॉनिक क्रूज मिसाइल्स (एचसीएम). ‘एचजीव्ही’ रॉकेटमधून, तर ‘एचसीएम’ हे अतिवेगाच्या इंजिनच्या किंवा ‘स्क्रॅमजेट’च्या सहाय्याने उडते.
हेही वाचा >>>विश्लेषण: वाघांचे अपघाती मृत्यू थांबणार कसे?
चीन, रशिया आघाडीवर
रशिया आणि चीन हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे बनविण्यामध्ये सध्या अग्रक्रमावर आहेत. अमेरिकाही विविध पल्ल्यांची अशी क्षेपणास्त्रे तयार करीत आहे. अमेरिकेने हायपरसॉनिक शस्त्रयंत्रणेसाठी लॉकहीड मार्टिन कंपनीबरोबर ७५.६ कोटी डॉलरचा करार केला आहे. फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, जपान, इराण, इस्रायल हे देश हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांच्या निर्मितीसाठी प्रयत्न करीत आहेत. बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या तुलनेत हायपरसॉनिक क्षेपणास्त्र अतिशय गतिमान आणि डागल्यानंतरही त्वरित दिशा बदलू शकतील अशी असतात.
हायपरसॉनिक क्षेपणास्त्राचे फायदे
प्रत्येक क्षेपणास्त्राची काही ठरावीक वैशिष्ट्ये असतात. शत्रू कुठे आहे, लक्ष्य किती अंतरावर आहे आणि भविष्यात कुठल्या भागातून धोका संभवू शकतो, आदी बाबी विचारात घेऊन विविध पल्ल्यांची क्षेपणास्त्रे तयार केली जातात. लघु, मध्यम, दीर्घ, आंतरखंडीय क्षेपणास्त्रांचे विविध प्रकार यामध्ये येतात. हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे त्याच्या वेगामुळे वेगळी ठरतात. बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे उंचावरून आणि एका विशिष्ट वक्राकार अशा मार्गाने शत्रूवर डागली जातात. या क्षेपणास्त्रांच्या तुलनेत हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे कमी उंचावरून उडत असल्याने शत्रूच्या संरक्षण फळीला ती चकवा देऊ शकतात. या क्षेपणास्त्रांचा वेध घेऊन ती रोखणे आणि नष्ट करणे अतिशय कठीण असते.
पुढील आव्हाने
क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी होणे आणि क्षेपणास्त्र प्रत्यक्ष संरक्षण दलात शत्रूवर मारा करण्यासाठी दाखल होणे यात खूप अंतर आहे. तंत्रज्ञान आणि इतर बाबींची अचूकता तपासण्यासाठी आणखी काही चाचण्या या क्षेपणास्त्राच्या होऊ शकतात. शास्त्रज्ञांनी निर्वाळा दिल्यानंतरच संरक्षण दलांमध्ये ही क्षेपणास्त्रे दाखल केली जातात. या प्रक्रियेला मोठा कालावधी लागतो. हा कालावधी कमी करण्याचे आव्हान शास्त्रज्ञांपुढे आहे. भारताची स्वबळावरील क्षेपणास्त्रभेदी यंत्रणाही अद्याप पूर्ण क्षमतेने तयार झालेली नाही. दीर्घ काळापासून ती विकासनाच्याच टप्प्यावर आहे. याखेरीज हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांसारख्या प्रकल्पांना लागणाऱ्या मोठ्या आर्थिक तरतुदीचाही विचार करावा लागतो. बॅलिस्टिक क्षेपणास्त्रापेक्षाही जास्त रक्कम हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे तयार करायला लागते. प्रत्यक्ष युद्धात वापर करण्यासाठी मोठा निधी यासाठी लागतो. एक जरब अर्थात डिटरन्स म्हणून या क्षेपणास्त्राकडे प्रामुख्याने पाहिले जाते.
prasad.kulkarni@expressindia.com