संशोधन कुणाचे आणि संशोधनात काय?

कर्नाटकमधील बेंगळूरु येथील वन्यजीव अभ्यास केंद्राच्या (सीडब्ल्यूएस-इंडिया) संवर्धन विज्ञान विभागाचे यशेंदू सी. जोशी आणि दक्षिण आफ्रिकेतील गन्सबाई येथील ब्लड लायन्स नॉन प्रॉफिट कंपनीच्या (एनपीसी) स्टेफनी ई. क्लार्मन आणि लुईस सी. डी. वाल यांनी हा अभ्यास केला आहे. भारतात चित्त्यांच्या स्थलांतरानंतर हवामान, शिकार प्रजाती यांतील तफावतींमुळे आफ्रिकन चित्त्यांना अधिवासाशी जुळवून घेणे जड जाते, हे त्यांनी या अभ्यासात मांडले आहे. चित्त्यांच्या उपस्थितीची सवय नसलेल्या समुदायांसाठी संभाव्य मानव-वन्यजीव संघर्ष निर्माण होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे. वन्य प्राण्यांच्या व्यापारात प्राण्यांच्या कल्याणाबाबत संशोधनाचा अभाव असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सिंह व चित्ता स्थलांतराचा संबंध काय?

अभ्यासकांनी मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात आशियाई सिंह आणि आफ्रिकन चित्त्यांच्या स्थलांतरासाठी तयार केलेल्या अहवालांचा आढावा घेतला. २००८ मध्ये सुरू होणाऱ्या दीर्घकालीन स्थलांतर कार्यक्रमासाठी कुनो राष्ट्रीय उद्यानाची सुरुवातीला निवड झाली होती. १९९९ ते २००१ दरम्यान २४ गावांमधील सुमारे पाच हजार लोकांना नियोजित आशियाई सिंहांच्या पुनर्प्रवेशासाठी विस्थापित करण्यात आले होते. मात्र, गुजरात राज्य सरकार दुसऱ्या राज्यात सिंह सोडण्यास इच्छुक नसल्याने ते शक्य झाले नाही. त्यानंतर भारतीय सरकारी अधिकारी, राज्य वन विभाग आणि संशोधकांमध्ये झालेल्या चर्चेमुळे पर्यावरण आणि वन मंत्रालयाने विनंती केलेल्या कुनो राष्ट्रीय उद्यानासह संभाव्य क्षेत्रांचा अहवाल प्रलंबित ठेवण्यात आला. त्याऐवजी आफ्रिकन चित्ते भारतात आणण्याचा प्रकल्प मार्गी लावण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी वापरलेली पद्धत चुकीची असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

नियोजनात कशाचा अभाव?

चित्ता कृती आराखडा आजवर कुनो राष्ट्रीय उद्यानावर लक्ष केंद्रित करत होता, पण तेथील उर्वरित मनुष्यवस्तीला चित्त्यांसाठी स्थलांतर करा म्हणून तयार करण्यात अयशस्वी ठरला. चित्त्यांमुळे उद्भवणारे धोके स्थानिक समुदाय सहन करेल, हे गृहीत धरणे अवास्तव असल्याचे या अभ्यासात म्हटले आहे. भारतात मानव आणि वन्यप्राणी संबंध गुंतागुंतीचे आहेत. आफ्रिकेतील जंगलातून त्यांना पकडले जाते आणि दूरवर स्थलांतरित केले जाते, तेव्हा ते तणावाखाली असतात.

अभ्यासाचा निष्कर्ष काय?

संवर्धन प्रयत्नांमध्ये केवळ जन्म- मृत्यू दरच नव्हे तर प्राण्यांच्या आरोग्यावर होणाऱ्या एकूण परिणामांचा विचार केला पाहिजे. २०२२ मध्ये सुरू झालेल्या चित्ता प्रकल्पाने कुनो राष्ट्रीय उद्यानात २० आफ्रिकन चित्ते आणले. १९५० च्या दशकात चित्ता प्रजाती नामशेष घोषित झाल्यानंतर भारतात चित्त्यांची संख्या स्थापित करण्याचे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. मात्र, या प्रकल्पाला उच्च मृत्यूदर आणि काही अडचणींसह आव्हानांचा सामना करावा लागला आहे. सप्टेंबर २०२२ मध्ये नामिबियातून आठ चित्ते स्थलांतरित करून प्रकल्पाची सुरुवात झाली. त्यानंतर फेब्रुवारी २०२३ मध्ये दक्षिण आफ्रिकेतून १२ चित्ते स्थलांतरित करण्यात आले. काहींना मुक्त अधिवासात सोडण्यात आले, तर उरलेले खुल्या पिंजऱ्यात राहिले. २०२३ च्या मध्यात, आरोग्याच्या कारणास्तव सर्व मुक्तपणे फिरणाऱ्या चित्त्यांना पुन्हा खुल्या पिंजऱ्यात परत करण्यात आले. प्रकल्प सुरू झाल्यापासून, १७ शावकांचा जन्म झाला, मात्र ४० टक्के प्रौढ आणि २९.४ टक्के शावकांचा मृत्यू झाला आहे. २०२४ च्या सुरुवातीपर्यंत, सर्व १२ जिवंत प्रौढ चित्ते आणि १२ शावक बंदिवासात आहेत. अभ्यासकांच्या मते भारतात चित्त्यांची संख्या स्थापित करण्यासाठी ३० ते ४० वर्षे लागू शकतात. नैसर्गिक मृत्यूदर भरून काढण्यासाठी या प्रकल्पाला दक्षिण आफ्रिकेतून दरवर्षी १२ चित्ते आयात करावे लागतील. प्रकल्पाचा आधारच अशास्त्रीय असून त्याने पर्यावरणीय सुदृढतेचे प्रश्न उद्भवतात, असे संवर्धनवादी संशोधकांचे म्हणणे आहे.

rakhi.chavhan@expressindia.com