शारीरिक व मानसिक आरोग्य राखण्यासाठी नियमित योगासने करणे गरजेचे आहे. ‘योग’ ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. निरोगी जीवनाच्या या पद्धतीला आंतरराष्ट्रीय मान्यताही मिळाली आहे. त्यामुळेच गेल्या दशकभरापासून दरवर्षी २१ जून रोजी ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा केला जातो. या दिवसाचे महत्त्व काय आणि याच दिवशी योग दिन साजरा का केला जातो, याविषयी…
‘आंतरराष्ट्रीय योग दिना’स कधीपासून सुरुवात?
भारताने जगभरात योगाचा प्रचार केला आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर योगाची विशेष ओळख आहे. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी २०१४ च्या सप्टेंबरमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला. भारताच्या नेतृत्वाखालील १७५ देशांच्या प्रतिनिधींकडून हा प्रस्ताव करण्यात आला होता. या प्रस्तावात योगासनांचे फायदे आणि त्याचे आरोग्यावरील परिणाम यांचे विस्तृत विवेचन करण्यात आले होते. संयुक्त राष्ट्रांमधील भारतीय वकिलातीत ऑक्टोबर महिन्यात या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. त्यानंतर अन्य देशांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून हा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत मांडण्यात आला. संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांचे सहप्रतिनिधी लाभले. विशेष म्हणजे संयुक्त राष्ट्रातील सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले चीन, फ्रान्स, रशिया, इंग्लंड आणि अमेरिका हे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी होते. या प्रस्तावावर चर्चा केल्यानंतर संयुक्त राष्ट्राने २१ जून हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली. २१ जून २०१५ या दिवशी पहिला ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा करण्यात आला.
हेही वाचा >>>रशिया-उत्तर कोरिया संरक्षण करार जगासाठी किती विध्वंसक? पुतिन यांचा नवा मित्र युक्रेन युद्धातही मदत करणार?
‘योग दिन’ साजरा करण्याचे कारण…
जगभरात योगाचा प्रसार करण्यासाठी आणि त्याच्या फायद्यांची जाणीव करून देण्यासाठी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाचे महत्त्व सांगितले होते. ‘‘योग ही भारताच्या प्राचीन परंपरेने दिलेली एक अमूल्य देणगी आहे. योग मन व शरीर, विचार व कृती, संयम व पूर्णता, मनुष्य व निसर्ग यांच्यातील ऐक्याला मूर्त रूप देतो. आरोग्य व स्वत:च्या कल्याणसाठी सर्वांगीण दृष्टिकोन प्राप्त करून देतो. योगासने हा केवळ एक व्यायाम नाही, तर स्वतःशी, जगाशी आणि निसर्गाशी एकरूपतेची भावना शोधण्याचा मार्ग आहे. आपली जीवनशैली बदलून आणि चेतना निर्माण करून आरोग्य सुधारण्यासाठी आंतरराष्ट्रीय योग दिन स्वीकारण्याच्या दिशेने काम करूया,’’ पंतप्रधानांच्या या भूमिकेनंतर संयुक्त राष्ट्रांतील विविध देशांनी योगांचे महत्त्व जाणून हा दिवस साजरा करण्यास मान्यता दिली.
२१ जून हाच दिवस का निवडला?
२१ जून या दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजर करण्यासाठी निवडण्यामागे खास कारण आहे. २१ जून हा वर्षांत सर्वात मोठा दिवस मानला जातो, ज्याला ‘उन्हाळी संक्राती’ असे म्हटले जाते. उन्हाळी संक्रांती हा उत्तर गोलार्धातील सर्वात जास्त प्रकाश असलेला दिवस आहे. पृथ्वीचा अक्ष त्याच्या कमाल कोनात सूर्याकडे झुकतो, त्यामुळे दिवस मोठा होतो. २१ जूननंतर सूर्य दक्षिणायनात प्रवेश करतो. योग आणि अध्यात्मासाठी हा दिवस खूप खास मानला जातो. त्यामुळे २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
हेही वाचा >>>विश्लेषण: ‘एन्व्हिडिआ’च्या उत्तुंग भरारीचे गमक कशात?
यंदा ‘मध्यवर्ती कल्पना’ (थीम) काय आहे?
दरवर्षी एक विशेष थीम लक्षात घेऊन योग दिनाचे आयोजन केले जाते. यंदा म्हणजे २०२४ या वर्षासाठी ‘महिला सक्षमीकरणासाठी योग’ अशी थीम ठेवण्यात आली आहे. यंदा या मध्यवर्ती कल्पनेसह महिलांचे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. महिलांचे सर्वांगीण कल्याण वाढवण्यात आणि परिवर्तनात महत्त्वपूर्ण योगदान देण्यासाठी त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. हे अधोरेखित करण्यासाठी ही थीम निवडण्यात आली आहे. हा दिवस महिलांच्या शारीरिक, मानसिक, भावनिक आणि सामाजिक विकासातील प्रगती साजरी करेल, असा विश्वास ही थीम निवडताना व्यक्त करण्यात आला.
यापूर्वीच्या मध्यवर्ती कल्पना काय होत्या?
२०१५ मध्ये पहिल्यांदा योग दिन साजरा करण्यात आला, त्यावेळी थीम होती, ‘सुसंवाद आणि शांततेसाठी योग’. त्याच्याच पुढील वर्षी म्हणजे २०१६ मध्ये ‘शाश्वत विकास उद्दिष्ट साध्य करण्यासाठी योग’ अशी थीम होती. २०१७ मध्ये ‘आरोग्यासाठी योग’, २०१८ मध्ये ‘शांततेसाठी योग’, २०१९ मध्ये ‘हृदयासाठी योग’, २०२० मध्ये ‘घरी आणि कुटुंबासह योग’, २०२१ मध्ये ‘निरोगीपणासाठी योग’, २०२२ मध्ये ‘मानवतेसाठी योग’ आदी थीम होत्या. गेल्या वर्षी म्हणजेच २०२३ मध्ये ‘वसुधैव कुटुंबकमसाठी योग’ ही योग दिनाची थीम होती. ‘एक विश्व-एक कुटुंब’ म्हणजेच सर्वांच्या कल्याणासाठी योग आहे, हे दर्शविण्यासाठी ही थीम निवडण्यात आली होती.
sandeep.nalawade@expressindia.com