अळी म्हटले की आपल्यापैकी बऱ्याच जणांना तिची किळस वाटते. अळी पाहिल्यावर तिच्याबद्दल मनामध्ये तिटकारा निर्माण होणे साहजिक असले तरीही आजवर वर्षानुवर्षे ‘मॅग्गॉट’ म्हणजेच अळ्या या वैद्यकीय क्षेत्रामध्ये महत्त्वाची कामगिरी बजावत राहिल्या आहेत. अनेक जुनाट जखमांवर उपचार करण्यासाठी त्या बऱ्याच फायदेशीर ठरतात. त्या या कामामध्ये कितपत प्रभावी ठरतात, याचे वैद्यकीय पुरावेही उपलब्ध आहेत. असे असूनही वैद्यकीय कारणांसाठी अळ्यांचा वापर फार कमी प्रमाणावर केला जातो. प्रामुख्याने त्यांच्याबाबत आपल्या मनात किळसवाणा आणि नकारात्मक दृष्टिकोन असल्यामुळे असे घडताना दिसते.
मॅग्गॉट थेरपीचे अनेक फायदे
मॅग्गॉट थेरपीच्या वापराला वैद्यकीय मंजुरी मिळालेली आहे. मात्र, डॉक्टर आणि रुग्ण या दोघांच्या इच्छेवर या थेरपीचा वापर अवलंबून असतो. या कीटकाबद्दल आपल्या मनात असलेला तिटकाऱ्यामुळे या थेरपीचा वापर फार मोठ्या प्रमाणावर होताना दिसत नाही. डॉक्टरांकडूनही बरेचदा या थेरपीबाबत तिटकाऱ्याची भावना व्यक्त होताना दिसते. जखम बरी करण्यामध्ये अळ्या या लहान वैद्यकीय उपकरणांसारख्याच काम करताना दिसतात. त्या मानवी शरीरावरील जखमा साफ करण्यामध्ये खूप कार्यक्षम आहेत. त्या मृत पेशी अत्यंत जलद गतीने काढून टाकतात; तसेच त्या हानिकारक जीवाणूदेखील नष्ट करू शकतात. बरेचदा जखम झालेल्या भागामध्ये प्रतिजैविकांना प्रतिरोध करू शकणाऱ्या जीवाणूंचाही समावेश असतो. मात्र, त्यांना प्रभावीपणे नष्ट करण्यात या अळ्या महत्त्वाची भूमिका बजावतात.
हेही वाचा : बेली ब्रिज म्हणजे काय? वायनाड दुर्घटनेनंतर असा पूल उभारण्याची गरज का भासली?
अळ्या कशा प्रकारे ठरतात फायदेशीर?
अळ्या बॅक्टेरियाच्या बायोफिल्म्सचेही विघटन करू शकतात. बायोफिल्म्स हे रोगजनकांनी भरलेले कठीण अडथळे असतात. जखम तातडीने बरी करण्याच्या दृष्टीने त्यांना नष्ट करणे फार गरजेचे असते. या बायोफिल्म्स जुनाट जखमांमध्ये अधिक वाढलेल्या असतात. जखमांना वाढण्यासाठी मदत करणाऱ्या घटकांना नष्ट करण्याबरोबरच अळ्या आणखी एक महत्त्वाचे काम करतात आणि ते म्हणजे त्या निरोगी पेशींच्या वाढीसाठी मदत करू शकतात. यामुळे, एकंदर जखम तातडीने बरी होण्यास फार मदत होते. अळ्यांबाबत अलीकडे झालेल्या संशोधनामधून त्या किती कार्यक्षम आहेत, याची अधिक माहिती प्राप्त झाली आहे. अळ्या ४७ प्रकारच्या विविध अँटीमायक्रोबायल पेप्टाइड्स तयार करू शकतात. अँटीमायक्रोबायल पेप्टाइड्स हे विविध जीवांच्या जन्मजात रोगप्रतिकारक प्रणालीचा महत्त्वाचा भाग असतात. अँटीमायक्रोबायल पेप्टाइड्सचे लहान रेणू जीवाणू मारतात. जेव्हा एखादी जखम होते आणि संसर्ग होतो, तेव्हा असे उपयोगी अँटीमायक्रोबायल पेप्टाइड्स वाढवण्याचे कामही अळ्या करू शकतात. इतके फायदे असूनही मॅग्गॉट्स थेरपी करण्यामध्ये काही आव्हाने नक्कीच आहेत. ही थेरपी घेताना काही रुग्णांना मानसिकदृष्ट्या अस्वस्थता जाणवते; तर काहींना जखमेच्या भागामध्ये वेदनाही जाणवतात. त्यामुळे ही थेरपी काळजीपूर्वक करणे फार गरजेचे ठरते. वैद्यकीय पर्यवेक्षणामध्येच ही थेरपी करणे आवश्यक आहे.
मॅग्गॉट थेरपीकडे पाहण्याचा खराब दृष्टिकोन
या थेरपीबाबतच्या संशोधनामधून असे आढळून आले आहे की, मॅग्गॉट थेरपीबाबत लोकांमध्ये फार कमी जनजागृती आहे. सामान्यत: मॅग्गॉट थेरपीबद्दल लोकांमध्ये नकारात्मक धारणा असते. बऱ्याच लोकांना अळ्या पाहून किळस येतो, त्यामुळेच ही थेरपी फार जणांकडून केली जात नाही. अगदी आरोग्य सेवकांमध्येही अळ्यांबाबत तिटकारा आणि तिरस्काराची भावना सामान्यत: दिसून येते. संशोधनामध्ये असे आढळून आले आहे की, जवळजवळ एक तृतीयांश परिचारिकांना अळ्या अत्यंत घृणास्पद वाटतात. अनेक परिचारिकादेखील मॅग्गॉट थेरपी देण्याबाबत नाखूष असतात. लेग अल्सर्स, डाएबेटिक फूट अल्सर्स वा प्रेशर अल्सर्स झाल्यावर होणाऱ्या जखमा या लवकर बऱ्या होणाऱ्या नसतात. अशा वेळी मॅग्गॉट थेरपी फारच फायदेशीर ठरते. मात्र, आपल्या जखमांवर अशा प्रकारच्या अळ्यांनी उपचार करण्यासाठी राजी होणे बऱ्याच जणांना कठीण जाते.
हेही वाचा : दुर्मीळ काळा वाघ ओडिशातील सिमिलीपाल व्याघ्र प्रकल्पामध्येच का आढळतो?
‘लव्ह अ मॅगॉट’ची मोहीम
सामान्यत: लोकांना फुलपाखरू आणि मधमाशांसारखे कीटक चांगले वाटतात, मात्र त्यांना अळी वा झुरळांसारख्या कीटकांचा तिटकारा असतो. अशा वेळी हा तिटकारा आणि चिंता दूर करण्यासाठी लोकांना मॅग्गॉट थेरपीचे फायदे समजावून सांगावे लागतात, असे स्वानसी विद्यापीठातील बायोमेडिकल सायन्सच्या प्राध्यापक यामनी निगम यांनी म्हटले. यासाठी त्यांनी एका मोहिमेचीही सुरुवात केली आहे. विज्ञानातील तथ्ये आणि माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी सार्वजनिक सहभागाची गरज आवश्यक असते. त्यामुळेच त्यांच्याकडून सध्या ‘लव्ह अ मॅग्गॉट’ ही मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेचा उद्देश वैद्यकीय उपचारांमध्ये अळ्या वापरण्याबाबत जनजागृती करणे हा आहे. या मोहिमेमध्ये अळ्या आणि त्यांचे महत्त्व लोकांना समजावून सांगितले जाते. वैद्यकीय उपचारांमध्ये त्या किती फायदेशीर ठरतात, याची माहितीही लोकांना दिली जाते. मॅग्गॉट्स थेरपीमुळे बरे झालेल्या लोकांच्या सक्सेस स्टोरीही लोकांना सांगितल्या जातात. त्यासाठी विविध खेळ आणि उपक्रम राबवले जातात. या माध्यमातून अळ्यांची प्रतिष्ठा वाढवण्याचे आणि त्यांच्याबद्दलचा तिटकारा दूर करण्याचे काम केले जाते.