Why Is it Raining in October: गणपती गेले, मागोमाग नवरात्र सरली, दसरा झाला आणि आता दिवाळी ऐन ८ दिवसांवर आली आहे मात्र अजूनही पावसाळा संपण्याची काही चिन्हे दिसत नाहीत. सहसा जून ते सप्टेंबर या कालावधीला पावसाळा म्हणतात हे आपण सगळेच शाळेत शिकलो आहोत पण मागील काही वर्षांपासून सप्टेंबर सोडाच पण पार जानेवारी पर्यंतही पाऊस टिकून असतो. पाऊस न पडणाऱ्या परिस्थितीला अनेकजण पर्यावरणाची हानी, वृक्षतोड अशी कारणे जोडतात पण जर पाऊस अधिक पडत असेल तर दोष कोणाचा? निसर्गाच्या या प्रक्रियेत नेमकं आपलं काही चुकतंय का? आताही ऑक्टोबर महिना सुरु आहे. महाराष्ट्राच्या गावोगावीच नव्हे तर मुंबई, पुणे अशा मुख्य शहरांमध्येही अजून पावसाचा जोर काही ओसरलेला नाही.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी लोकसत्ताचे अ‍ॅप डाऊनलोड करून लॉग-इन करा

अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी खालील क्यूआर कोड स्कॅन करा
download app

भारतीय हवामान विभागाने (IMD) ६ ऑक्टोबरपासून मुसळधार पावसाचा इशारा दिला होता यानुसार महाराष्ट्रातही मागील दोन दिवसांपासून कधी मुसळधार तर कधी संततधार पाऊस सुरु आहे. यामागे कारण काय आणि अजून किती दिवस पाऊस असाच पाहुणचार घेणार आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण पाहुयात..

पावसाळा लांबण्यामागे कारण काय?

हवामान अभ्यासकांच्या माहितीनुसार पावसाळा लांबण्यामागे अनेक कारणे असू शकतात, यातील मुख्य कारण म्हणजे हवेतील कमी दाबाचे पट्टे. जेव्हा उष्णता वाढते तेव्हा हवेचा दाब कमी होतो. त्यामुळे हवा वरच्या दिशेने जाते. त्यामुळे अधिक दाबाचा पट्टा असलेल्या परिसरातील ढग अपेक्षेनुसार कमी दाबाच्या परिसरात जातात यामुळेच पाऊस होतो.

यंदाची परिस्थिती पाहता ऑक्टोबर महिन्यात, नैऋत्य मोसमी पावसाने माघार घेत ईशान्य मान्सूनला मार्ग दिला आहे. दक्षिणेकडील द्वीपकल्पीय भागात, प्रामुख्याने पूर्वेकडे ईशान्य वाऱ्यांमुळे ऑक्टोबर व पुढील काळात पाऊस पडतो. भारताच्या उत्तर भागात पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे केवळ पाऊसच नव्हे तर हिमवर्षावही होतो.

नैऋत्य मान्सून साधारणपणे ऑक्टोबरच्या सुरुवातीस पूर्णपणे थांबतो. पण परतीच्या वेळी अनेक भागात गडगडाट, वादळे आणि मुसळधार पाऊस होऊ शकतो. यंदा बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण झाल्यामुळे मान्सून अद्याप परतलेला नाही. तसेच हवामान खात्याच्या अंदाजानुसार १२ ते १३ ऑक्टोबरपर्यंत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.

पाऊस मध्येच उसंत घेतो पण…

मोसमी पावसाच्या काळात समुद्रातून कोणतेही बाष्प येत नसताना किंवा कमी दाबाचे क्षेत्र कार्यरत नसताना होणारा पाऊस स्थानिक स्थितीतून होत असतो. आकाशाची स्थिती निरभ्र राहिल्यास सूर्यकिरणे थेट जमिनीपर्यंत पोहोचतात. साहजिकच जमीन तापू लागते आणि निसर्ग नियमाप्रमाणे त्यातून निर्माण होणारे बाष्प आकाशाकडे जाऊ लागते. या काळात आपल्याला प्रचंड उकाडा जाणवतो. बाष्पाच्या प्रमाणानुसार दुपारनंतर लगेचच किंवा संध्याकाळी आकाशात ढग तयार होतात. घर्षणातून ते गरजतात, विजांचीही निर्मिती होते आणि पाऊस पडतो. हा पाऊस खूप विस्तृत प्रदेशावर नसतो. पण, कधी-कधी मोठे आणि अधिक उंचीचे ढग तयार होऊन ठरावीक भागांतच ढगफुटीप्रमाणे पाऊस होतो.

पावसानंतर ‘ऑक्टोबर हिट’ ही वाढणार का?

साधारण पावसाच्या परतीला लागूनच मुंबईत थंडी पडण्याआधी हवामान उष्ण होते. ऑक्टोबर मध्ये मुंबईत ३० ते ३५ अंशापर्यंत तापामान वाढून ऑक्टोबर हिटचा सामना करावा लागतो. मात्र यंदा अद्याप पाऊसच कायम असल्याने काही दिवसांपासून वातावरणात गारवा वाढला आहे. शनिवारी मुंबईचे कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस होते. यामुळेच यंदा तरी मुंबईकरांना ऑक्टोबर हिटचा तडाखा सहन करावा लागणार नाही अशी चिन्हे आहेत.

मुंबईतून मान्सून उशिराने माघार घेतल्याने आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे सद्यस्थिती अशी असू शकते, असे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे. IMD नुसार, ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक मुसळधार पावसाची (64.5 मिमी-115.5 मिमी) शक्यता आहे.

Story img Loader