जपानमध्ये भात हे तेथील प्रमुख अन्न आहे. मात्र, आता भातच लोकांना मिळेना झालाय. याचे कारण म्हणजे जपानमध्ये तांदळाचा तुटवडा निर्माण झाला आहे. जपानमध्ये सुशीपासून ते मॅकडोनाल्डच्या बर्गर बनपर्यंत सर्व गोष्टींमध्ये प्रमुख पदार्थ म्हणून तांदळाचा समावेश होतो. पण आता तांदळावर अवलंबून असलेला हा देश संकटाचा सामना करत आहे. जपानमधील परिस्थिती इतकी गंभीर आहे की, जपानी सुपरमार्केटमध्ये तांदळाच्या खरेदीवर मर्यादा घालण्यात आल्या आहेत आणि रेस्टॉरंट्सनीदेखील किमती वाढवल्या आहेत. मुख्य म्हणजे आता जपानी सरकारने आपत्कालीन साठ्यात असणाऱ्या तांदळाचा लिलाव सुरू केला आहे. जपानमध्ये तांदळाच्या टंचाईचे नेमके कारण काय? याचा काय परिणाम होणार? त्याविषयी जाणून घेऊ.

जपानमध्ये तांदळाची टंचाई

जपानमध्ये तांदळाच्या वितरणाची पद्धत जरा किचकट आहे, त्यामुळे पुरवठा साखळी थोडी जरी गडबडली, तरी याचा परिणाम थेट नागरिकांवर होऊ शकतो. जपानमध्ये तांदळाच्या किमती जास्त ठेवण्यासाठी आणि देशांतर्गत शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी तांदळाचे उत्पादन मर्यादित केले जाते. शेतकरी आपला साठा घाऊक विक्रेत्यांना विक्री करणाऱ्या संकलन एजंटांना विकतात. दुकाने आणि रेस्टॉरंट्स या घाऊक विक्रेत्यांकडून तांदूळ खरेदी करतात. गेल्या वर्षीच्या उन्हाळ्यापासून तांदळाच्या पुरवठ्यात घट सुरू झाली. तज्ज्ञांनी सांगितले की, २०२३ मधील देशातील अतिउष्ण तापमानामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, तसेच सरकारने विनाशकारी भूकंपाचा इशारा दिल्यामुळे नागरिकांनी घाबरून मोठ्या प्रमाणात तांदळाची खरेदी केली. यामुळे परिस्थिती आणखीनच बिघडली.

जपानमध्ये सुशीपासून ते मॅकडोनाल्डच्या बर्गर बनपर्यंत सर्व गोष्टींमध्ये प्रमुख पदार्थ म्हणून तांदळाचा समावेश होतो. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

गेल्या वर्षी ६० किलोग्राम तांदळाच्या पोत्याची किंमत सुमारे २३,३५० येन (१६० डॉलर्स म्हणजेच १३,७०४ रुपये) पर्यंत वाढली. दोन वर्षांपूर्वी असणाऱ्या किमतीच्या तुलनेत यात लक्षणीय वाढ झाली. ९ मार्च पर्यंतच्या आकडेवारीनुसार पाच किलोग्राम तांदळाच्या पोत्याची किंमत सरासरी ४,०७७ येन (२७ डॉलर्स म्हणजेच २,३९४ रुपये) होती. गेल्या वर्षी याच वेळीच्या किंमतीच्या तुलनेत हा आकडा दुप्पट आहे. जानेवारी महिन्यात जपानच्या अंतर्गत व्यवहार मंत्रालयाने ग्राहक किंमत निर्देशांक जारी केला होता. या निर्देशंकातील आकडेवारीनुसार, टोकियोच्या २३ वॉर्डांमध्ये तांदळाच्या किमतीत गेल्या काही वर्षांमध्ये ७१ टक्क्यांनी वाढ झाली आहे, असे वृत्त ‘बिझनेस इनसाइडर’ने दिले आहे.

जपानमध्ये तांदळाची साठवणूक सुरूच आहे. लोकांनया अशी भीती आहे की तांदळाच्या किंमती दिवसेंदिवस वाढत जातील. याच भीतीपोटी लोकांनी तांदळाची खरेदी वाढवली आहे. याचाच फायदा घेत काही लोकांनी पैसे कामावण्यासाठी म्हणून तांदळाचा व्यवहार करण्यास सुरुवात केली आहे,असे उत्सुनोमिया विद्यापीठातील कृषी अर्थशास्त्राचे सहाय्यक प्राध्यापक मासायुकी ओगावा यांनी ‘द न्यू यॉर्क टाईम्स’ला सांगितले. क्योटो विद्यापीठातील प्राध्यापक शुजी हिसानो म्हणाले, काही धोरणात्मक बदलांमुळे आता शेतकरी प्रमुख वितरकांकडे न जाता विक्रीसाठी दुसऱ्या काही मार्गांचा अवलंब करत आहे. त्यामुळे नक्की किती वितरण होत आहे, हे जाणून घेणे अवघड झाले आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे देशात तांदूळ उत्पादकांची संख्या लक्षणियरीत्या कमी झाली आहे.

जपानमध्ये तांदळाच्या वितरणाची पद्धत जरा किचकट आहे, त्यामुळे पुरवठा साखळी थोडी जरी गडबडली, तरी याचा परिणाम थेट नागरिकांवर होऊ शकतो. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

जपानमध्ये शेतकऱ्यांची संख्या कमी होण्याचे कारण काय?

जपानमध्ये तांदूळ उत्पादकांची संख्या कमी होत असल्याचे चित्र आहे. जपानी कृषी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, २०१५ ते २०२० दरम्यान तांदूळ उत्पादकांचे सरासरी वय सुमारे ७१ वर्षे आहे आणि आता या शेतकऱ्यांची संख्या २५ टक्क्यांनी कमी झाली आहे, असे ‘ब्लूमबर्ग’च्या वृत्तात सांगण्यात आले आहे. तांदूळ उत्पादकांचे म्हणणे आहे की, त्यांना त्यांच्या मुलांना कमी नफा होणारा व्यवसाय करण्यास भाग पडायचे नाही, असे निगाता प्रांतातील नागाओका येथील ३०० वर्षे जुन्या तांदळाच्या शेतीचे मालक गेन्की सकुराई यांनी ‘जपान टाईम्स’ला सांगितले.

अनेक वर्षांपासून तांदळाच्या किंमती कमी होत्या, शेतकरी तोट्यात होते. त्यामुळे पालक मुलांना सल्ला देत आहेत की शेतात काम करण्यापेक्षा ऑफिसमध्ये काम करणे फायद्याचे, असेही त्यांनी सांगितले. गेन्की सकुराई यांनी सांगितले की, मी जेव्हा या कामाची सुरुवात केली म्हणजेच जवळपास १७ वर्षांपूर्वी या परिसरात तांदळाची शेती करणारे १२ हून अधिक उत्पादक होते. मात्र, एकूण परिस्थिती बघता आता ही संख्या तीनवर आली आहे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आता सरकार त्यांच्या तांदळाच्या साठ्याच्या दुर्मिळ लिलावावर अवलंबून आहेत.

जपानने साठ्यांचा लिलाव करण्याचा निर्णय का घेतला?

१९५५ मध्ये जपान सरकारने तांदळाचे साठे तयार करण्याची सुरुवात केली होती. दोन वर्षांनी देशातील अति उष्णतेमुळे आणि अति प्रमाणातील थंडीमुळे तांदळाच्या उत्पादनावर परिणाम झाला होता आणि सरकारवर तांदळाची आयात करण्याची वेळ आली होती. २०११ चा भूकंप आणि त्सुनामीमध्ये या साठ्यांचा वापर करण्यात आला. या आपत्तीत २०,००० लोकांनी आपला जीव गमावला होता. २०१६ च्या कुमामोतो भूकंपानंतरदेखील याचा वापर करण्यात आला. मात्र, वितरणाशी संबंधित समस्या निर्माण झाल्यामुळे आणि वाढत्या किमतींमुळे पहिल्यांदाच या साठ्याचा वापर केला जात आहे.

सरकारकडे तांदळाचा साठा किती?

सरकारकडे ३०० ठिकाणी सुमारे दहा लाख टन तांदूळ आपत्कालीन परिस्थितीसाठी साठवून ठेवण्यात आला आहे . सरकारने फेब्रुवारीमध्ये ही घोषणा केली होती, २३१,००० टनतांदळाचा लिलाव केला जाणार आहे. मार्चमध्ये अशा पद्धतीचे दोन लिलाव झाले आहे. हे त्यांच्या राखीव साठ्याच्या एक पंचमांशपेक्षा जास्त आहे. कृषी, वनीकरण आणि मत्स्यव्यवसाय मंत्री ताकू एटो म्हणाले, “किंमती तुलनेने अधिक आहेत. परंतु, माझे लोकांना आवाहन आहे की त्यांनी चिंता करण्यासारखे कोणतेही कारण नाही.

काही दिवसांत किंमती कमी होतील. वितरण साखळीतील गुंतागुंतीमुळे किंमती वाढल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, ” आम्ही ग्राहकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू. या लिलावामुळे तांदळाच्या वाढत्या किंमती कमी होण्यास मदत होईल, असा सरकारचा विश्वास आहे. आणखी आवश्यकता असल्यास सरकार ६६,००० टन तांदळाचा लिलाव करेल, असेही सांगण्यात आले आहे. परंतु, जो देश संपूर्णपणे तांदळावर अवलंबून आहे, त्या देशात अशा स्वरूपाची परिस्थिती निर्माण होणे, ही नक्कीच चिंतेची बाब आहे.