निमा पाटील
जपानने २४ ऑगस्टपासून फुकुशिमा दाइची अणुऊर्जा प्रकल्पातून प्रक्रिया केलेले किरणोत्सर्गी पाणी प्रशांत महासागरात सोडायला सुरुवात केली. पहिल्या टप्प्यात १७ दिवसांच्या कालावधीत काही पाणी सोडले जाईल. ही प्रक्रिया पूर्ण होण्यास काही दशके लागतील, असे सांगण्यात आले आहे. हा निर्णय का घेण्यात आला, त्याचे काय परिणाम होतील आणि इतर देशांकडून काय प्रतिक्रिया उमटत आहेत त्याचा हा आढावा.
फुकुशिमा दाइची अणुऊर्जा प्रकल्पाची सद्य:स्थिती काय आहे?
सध्या हा प्रकल्प बंद आहे. जपानमध्ये ११ मार्च २०११ रोजी आलेल्या विध्वंसक भूकंप आणि त्सुनामीमध्ये फुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्पाचे अतोनात नुकसान झाले होते. त्सुनामीमुळे प्रकल्पाच्या बॅकअप पॉवर आणि कूलिंग सिस्टीमला तडे गेले, त्यामुळे सहापैकी तीन अणुभट्ट्या वितळल्या. त्या धोक्यामुळे त्या भागातील जवळपास एक लाख ६० हजारांहून जास्त लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते.
या प्रकल्पातून प्रक्रिया केलेले किरणोत्सर्गी पाणी सोडण्याचा निर्णय का घेण्यात आला?
सध्या या प्रकल्पाच्या ठिकाणी १३ लाख टन किरणोत्सर्गी पाणी साठले आहे. इतक्या पाण्यातून ऑलिम्पिकसाठी असलेले ५०० तरणतलाव भरता येतील. त्सुनामीनंतर उद्ध्वस्त झालेल्या अणुभट्टीतील फ्युएल रॉडच्या संपर्कात आल्यामुळे हे पाणी दूषित झाले. या दूषित पाण्याने टाक्या भरल्या असल्यामुळे ते पाणी प्रक्रिया करून महासागरात सोडण्याशिवाय पर्याय नाही, असे जपानकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
किरणोत्सर्गी पाणी सोडण्यासाठी जपानने काय योजना आखली आहे?
या अणुऊर्जा प्रकल्पाची जबाबदारी टोक्यो इलेक्ट्रिक पॉवर (टेपको) या कंपनीकडे आहे. किरणोत्सर्गी पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी ते गाळून (फिल्टर करून) त्याच्यातून ट्रिटियमव्यतिरिक्त (हायड्रोजनचे समस्थानिक) अन्य समस्थानिके (आयसोटोप) काढून टाकली जातात. ट्रिटियम हे हायड्रोजनचे किरणोत्सर्गी समस्थानिक आहे आणि ते वेगळे करणे अवघड आहे. पाण्यावर प्रक्रिया करताना त्याचे ऊर्ध्वपतनही केले जाते. किरणोत्सर्गी पाण्यामधील ट्रिटियमचे प्रमाण नियामक मर्यादेच्या खाली जात नाही तोपर्यंत ते सौम्य केले जाईल, त्यानंतरच ते उत्तर टोक्योच्या किनाऱ्यावरून समुद्रामध्ये सोडले जाईल. सर्व पाणी समुद्रात सोडण्यास काही दशके लागतील.
पाण्यामध्ये ट्रिटियम असणे कितपत धोकादायक आहे?
जगभरातील अणुऊर्जा प्रकल्पांमधून ट्रिटियम असलेले पाणी समुद्रात सोडले जाते. याच प्रकारे फुकुशिमा प्रकल्पातून ट्रिटियमयुक्त पाणी समुद्रात सोडण्यास नियामक अधिकाऱ्यांनी मान्यता दिली आहे. ट्रिटियम हे किरणोत्सर्गी असले तरी ते तुलनेने निरुपद्रवी मानले जाते, कारण त्याच्या किरणोत्सर्गामध्ये मानवी त्वचेच्या आत शिरण्याइतकी ऊर्जा नसते. मात्र, सोडलेल्या पाण्यात ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त ट्रिटियम असेल तर त्यामुळे कर्करोगाचा धोका उद्भवू शकतो, असे २०१४ च्या ‘सायन्टिफिक अमेरिकन’च्या लेखामध्ये सांगण्यात आले आहे.
हे पाणी सुरक्षित आहे का?
प्रक्रिया केलेले किरणोत्सर्गी पाणी समुद्रात सोडण्यासाठी सुरक्षित आहे, असा दावा जपान आणि वैज्ञानिक संस्थांनी केला आहे. मात्र, सर्व संभाव्य परिणामांचा अभ्यास केलेला नाही अशी पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची तक्रार आहे. दुसरीकडे, या प्रकल्पातील सर्व टाक्या भरलेल्या असल्यामुळे पाणी सोडणे आवश्यक आहे, असे जपानचे म्हणणे आहे. संयुक्त राष्ट्रांच्या जगभरातील अणुप्रकल्पांवर देखरेख ठेवणाऱ्या आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेने (आयएईए) प्रक्रिया केलेले किरणोत्सर्गी पाणी सोडण्यास जुलैमध्ये परवानगी दिली. या प्रक्रियेमध्ये आंतरराष्ट्रीय मानकांचे पालन करण्यात आले असून लोक व पर्यावरणावर होणारा परिणाम क्षुल्लक आहे, असे आयएईएचे म्हणणे आहे.
पर्यावरणवादी संस्थांचे काय म्हणणे आहे?
ग्रीनपीस या पर्यावरणवादी संस्थेचे म्हणणे आहे की, किरणोत्सर्गाच्या सर्व धोक्यांचे पूर्णपणे मूल्यांकन झालेले नाही, तसेच पाण्यात सोडल्या जाणाऱ्या ट्रिटियम, कार्बन-१४, स्ट्रोनियम-९० आणि आयोडिन-१२९ यांच्या जीवशास्त्रीय परिणामांकडे दुर्लक्ष करण्यात आलेले आहे.
जपान सरकार आणि टेपकोचे काय म्हणणे आहे?
किरणोत्सर्गी पाणी गाळण्याच्या (फिल्टर) प्रक्रियेनंतर त्यातील स्ट्रोनियम-९० आणि आयोडिन-१२९ हे अणू दूर केले जातील, तर कार्बन-१४ ची संहती ही नियामक मानकापेक्षा किती तरी कमी आहे असे टेपको आणि जपान सरकारचे म्हणणे आहे. प्रक्रिया केलेल्या पाण्यातील ट्रिटियमचे प्रमाण हे जागतिक आरोग्य संस्थेने पिण्यासाठी सुरक्षित पाण्यासाठी आखून दिलेल्या मानकांपेक्षा कमी आहे, असे जपान सरकारचे म्हणणे आहे. जर या पाण्यामध्ये सुरक्षित प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात किरणोत्सर्गी पदार्थ आढळले तर पाण्याचा विसर्ग थांबवण्यासह योग्य उपाययोजना केल्या जातील, असे जपान सरकारने जाहीर केले आहे. दुसरीकडे दक्षिण कोरिया सरकारने स्वतः अभ्यास करून ही प्रक्रिया आंतरराष्ट्रीय नियमनाचे पालन करत असल्याचा निष्कर्ष काढला आहे.
जपानमधील लोकांची काय प्रतिक्रिया आहे?
फुकुशिमामधील मच्छीमारांच्या संघटनांना प्रक्रिया केलेले किरणोत्सर्गी पाणी समुद्रात सोडल्यास त्याचा मासेमारीवर विपरीत परिणाम होईल, अशी भीती वाटत आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून त्यांनी या प्रक्रियेला विरोध केला आहे. पाणी सोडण्याची प्रक्रिया वैज्ञानिकदृष्ट्या सुरक्षित असू शकते, पण त्याच्याशी निगडित भीतीमुळे आपल्याकडील माशांच्या विक्रीवर परिणाम होईल अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. टेपकोने जपानमधील मच्छीमार आणि इतर संबंधित गटांशी संवाद साधला आहे. तसेच संभाव्य नुकसान कमी करण्यासाठी कृषी, कृत्रिम मत्स्यपालन आणि वन उत्पादनांचा प्रसार करण्यावर भर दिला आहे, जेणेकरून मच्छीमारांना काही पर्यायी उपजीविका उपलब्ध होईल.
शेजारी देशांची काय प्रतिक्रिया आहे?
जपानच्या शेजारी राष्ट्रांनी या प्रक्रियेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यापैकी चीनने आपली भीती आणि संताप अगदी स्पष्टपणे व्यक्त केला आहे. जपानची ही योजना ‘बेजबाबदार, स्वार्थी, अप्रिय आणि एकतर्फी’ असल्याचे चीनचे म्हणणे आहे. चीन हा जपानमधील माशांचा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे. दक्षिण कोरिया, सिंगापूर या देशांमधूनही चिंतेचे सूर उमटले. मात्र, या दोन्ही देशांनी जपान सरकारने केलेल्या उपाययोजनांबद्दल समाधान व्यक्त करून जपानच्या सागरी उत्पादनांवर बंदी घालणार नसल्याचे जाहीर केले आहे.