महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांत आणि त्यातही मुंबईत भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिंगावर घेत आक्रमकपणे निवडणूक लढविणारे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला कोकण, ठाण्याच्या भूमीने मात्र यंदा बुचकळ्यात टाकले आहे. कोकणी मतदार हा अनेक दशकांपासून शिवसेनेची ताकद मानला जातो. ‘शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना’ हे बिरूदही एकसंध शिवसेनेला अनेक वर्ष चिकटले होते. त्यामुळे कोकण-ठाण्याच्या सहा जागांवर चांगले यश मिळेल अशी अपेक्षा उद्धव सेनेचे चाणाक्य बाळगून होते. ठाणे हा अलिकडच्या काळात भाजप आणि नरेंद्र मोदीनिष्ठ मतदारांचा बालेकिल्ला ठरतो की काय अशी परिस्थिती आहे. असे असताना कोकण-ठाण्याच्या पाचपैकी एकाही जागेवर उद्धव सेनेला यश मिळाले नाही. भिवंडीत सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांचा विजय झाला नसता तर कोकण पट्टीत महाविकास आघाडीचे खातेही उघडले नसते अशी स्थिती होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उद्धव यांच्यासाठी ठाणे, कोकण महत्त्वाचे का?

शिवसेनेच्या स्थापनेपासून काही वर्षातच ठाणे, कोकणाने या पक्षाला साथ दिल्याचे पाहायला मिळते. कोकणी माणून अनेक दशके शेतीत रमणारा नव्हता. मुंबईकर चाकरमानी हीच त्याची ओळख. मुंबई, ठाण्यातील वस्त्यावस्त्यांमधून कोकणी माणसचे वास्तव्य पहायला मिळते. मुंबईतील लालबाग, परळ, कांजूरमार्ग, भांडूप, दादर, ठाण्यातील सावकरनगर, लोकमान्यनगर, डोंबिवली, कल्याणात कोकणातील महाड, खेड, चिपळूणपासून थेट कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, गुहागर, दापोलीचा मूळ रहिवासी असलेला मतदार एकगठ्ठा पद्धतीने रहात असल्याचे पहायला मिळते. गेल्या काही वर्षात नागरीकरणाच्या वेगात कोकणी मतदार विखुरला गेला असला तरी अजूनही अनेक वस्त्यांमधून तो एकगठ्ठा आढळतो. मुंबई, ठाण्यातील शिवसेनेच्या शाखाशाखांमधून कार्यरत असलेला कोकणवासीय पदाधिकारी ही शिवसेनेची ताकद मानली जाते. शिवसेनेच्या कामगार सेनेच्या माध्यमातून मुंबई, ठाणेस्थित बड्या उद्योगांमधून कार्यरत असलेल्या कामगार संघटनेतही याच कोकणी चाकरमान्यांचा वरचष्मा दिसत असे. त्यामुळे मुंबई, ठाण्यात बहुसंख्येने असलेला हा कोकणी मतदार पक्षात दुफळी झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासाठी अधिक महत्त्वाचा ठरतो.

हेही वाचा >>>रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेट ‘जैसे थे’, कारण काय? जीडीपी वाढीचा अंदाज का वर्तविण्यात आला?

कोकणातील दोन जागांवर गणित कुठे चुकले?

रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि रायगड या दोन्ही मतदारसंघात उद्धव सेनेला विजयाची मोठी संधी होती. रत्नागिरी-सिंधुदुर्गात उमेदवारी मिळविण्यावरून भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अखेरपर्यत रस्सीखेच सुरू होती. उद्धव सेनेचे खासदार विनायक राऊत यांची उमेदवारी खूप आधीच स्पष्ट झाल्याने त्यांना प्रचारासाठी भरपूर वेळ होता. रत्नागिरी-सिंधूदुर्ग लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघात उद्धव सेनेची चांगली ताकद होती. असे असताना कुडाळ, कणकवली आणि सावंतवाडी या तळकोकणातील तीन मतदारसंघांवर लक्ष केंद्रित करत नारायण राणे यांनी उद्धव सेनेला मोठा धक्का दिल्याचे पाहायला मिळाले. कुडाळचे उद्धव सेनेचे आमदार वैभव नाईक यांच्या मतदारसंघातही राणे यांना मताधिक्य मिळाल्याने उद्धव सेनेचे विजयाचे गणित हुकले. रायगडातही अलिबाग, श्रीवर्धन, पेण या तीन मतदारसंघांनी सुनील तटकरे यांना मोठे मताधिक्य दिले. या पट्ट्यातील शेतकरी कामगार पक्ष अनंत गिते यांच्यासोबत होता. मात्र शिवसेनेतील फुटीचा सरळसरळ फटका गिते यांना बसल्याचे दिसते.

ठाण्याचा गड का ढासळला?

कोकणाप्रमाणे ठाणे जिल्हा हादेखील उद्धव सेनेसाठी भावनिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. शिवसेनेला पहिली सत्ता ठाण्याने दिली. शिवसेनेतील दुफळीनंतर मात्र हे चित्र बदलल्याचे पाहायला मिळते. मुंबईवर राज्य करत असताना उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना ठाणे जिल्ह्यात अमर्याद अशी सत्ता राबविण्याचे अधिकार दिले. त्यामुळे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, आमदार, पालकमंत्री, नगरविकास मंत्री या प्रवासात शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेवर एकहाती अंमल मिळवल्याचे दिसते. शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्याचा सर्वाधिक फटका ठाणे, कल्याण, भिवंडीतील उद्धव सेनेला बसल्याचे पहायला मिळते. ठाणे लोकसभा मतदारसंघात अलिकडे भाजपची ताकद वाढली आहे. मीरा-भाईदर, ओवळा माजीवडा इतकेच नव्हे तर ठाणे शहर विधानसभा क्षेत्रात भाजपला आणि त्यातही मोदींना मानणारा एक मोठा वर्ग तयार झाला आहे. एकनाथ शिंदे यांच्या विजयात या मोदीनिष्ठ मतदाराने निर्णायक भूमिका बजाविल्याचे पहायला मिळते. शिवसेनेतील दुभंगानंतर कल्याणात पक्षाची शकले झाल्याचे दिसले. येथे उद्धव सेनेकडे मुख्यमंत्री पुत्राविरोधात उमेदवारही नव्हता. असे असले तरी वैशाली दरेकर या तुलनेने दुबळ्या उमेदवाराला मिळालेली चार लाखांच्या घरातील मते पाहून शिंदेसेनेचे नेतेही आवाक झाले आहेत.

हेही वाचा >>>‘या’ देशातील संपूर्ण बेटच जाणार समुद्राखाली; ३०० कुटुंबांचे करणार स्थलांतर, कारण काय?

विधानसभा निवडणुकीत आव्हान कोणते?

ठाणे जिल्ह्यातील १६, पालघर जिल्ह्यातील ६ आणि कोकण-रायगड लोकसभा मतदारसंघातील १२ अशा विधानसभेच्या ३४ जागांवरील कामगिरी सुधारण्याचे मोठे आव्हान उद्धव सेनेपुढे असणार आहे. ठाण्यातील सहा आणि कल्याणातील पाच विधानसभा जागांवर उद्धव सेनेची मोठी पीछेहाट झाली आहे. पालघरातील सहाही जागांवर उद्धव सेनेचा उमेदवार मागे आहे. भिवंडीत सुरेश म्हात्रे यांच्या विजयामुळे येथील सहा विधानसभा क्षेत्रात महायुती आणि आघाडीमध्ये लढत होणार आहे. रायगडात पेण, अलिबाग, महाड, श्रीवर्धन येथे उद्धव सेनेला पुन्हा पाय रोवावे लागणार आहेत. राणे यांच्या विजयामुळे तळ कोकणात उद्धव ठाकरे यांच्यापुढील आव्हान मोठे आहे. पुढील तीन-चार महिन्यात कोकण-ठाण्यातील कामगिरी सुधारणे उद्धव सेनेला भाग पडणार आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why is konkan thane field challenging for uddhav thackeray print exp amy
First published on: 08-06-2024 at 07:28 IST