राज्यात सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. सेंद्रिय शेती उत्पादनात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. तरीही सेंद्रिय खत उत्पादनात महाराष्ट्र मागे का, याविषयी…

सेंद्रिय खतांची आवश्यकता का?

कीटकनाशक आणि रासायनिक खतांच्या अनावश्यक वापरामुळे मातीत बहुपोषकांची कमतरता जाणवू लागली आहे. मृदा आरोग्य आणि सुपीकता व्यवस्थापनविषयक राष्ट्रीय प्रकल्पाच्या (एनपीएमएसएचएफ) अहवालात राज्यात मातीतील नायट्रोजन, फॉस्फरस आणि झिंकच्या कमतरतेविषयी उल्लेख आहे. मृदा आरोग्य पत्रकांच्या माध्यमातून माती परीक्षणाला प्रोत्साहन दिले जात असले तरी बहुतांश शेतकरी त्यापासून वंचित आहेत. वर्षानुवर्षे घेत असलेल्या पिकांमुळे आणि अधिक उत्पादन देणाऱ्या पिकांच्या नवीन वाणांमुळे जमिनीतील अन्नद्रव्यांचा साठा दिवसेंदिवस कमी होत आहे. रासायनिक खतांचा अतिवापर आणि सेंद्रिय घटकाचा अल्प पुरवठा यामुळे जमिनीची उत्पादन क्षमता घटू लागली आहे. जमिनीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण योग्य ठेवण्यासाठी विविध एकात्मिक खतांचा संतुलित वापर करणे आवश्यक आहे.

राज्यात सेंद्रिय खतांचे उत्पादन किती?

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात २०२३-२४ या वर्षात १२६.६० लाख मेट्रिक टन सेंद्रिय खतांचे उत्पादन झाले. सेंद्रिय खत उत्पादनात देशात पंजाब प्रथम स्थानावर असून महाराष्ट्र सातव्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात २०२३-२४ या वर्षात केवळ ३ लाख ४३ हजार मेट्रिक टन सेंद्रिय खताचे उत्पादन झाले. २०२२-२३ मध्ये महाराष्ट्रात २ लाख ३७ हजार मेट्रिक टन तर २०२१-२२ मध्ये २ लाख ३१ हजार मेट्रिक टन सेंद्रिय खतांचे उत्पादन झाले होते. पंजाबसह, कर्नाटक, तमिळनाडू, मध्य प्रदेश ही राज्ये सेंद्रिय खतांच्या उत्पादनात अग्रेसर असताना महाराष्ट्र मात्र मागासलेला आहे.

सेंद्रिय शेती उत्पादनाची स्थिती काय?

देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून सेंद्रिय पिकांच्या उत्पादनांची मागणी वाढत आहे. राज्यात सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. संपूर्ण भारतात सेंद्रिय शेती उत्पादनामध्ये मध्य प्रदेशनंतर महाराष्ट्र २७ टक्क्यांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. २०२२-२३ या वर्षात महाराष्ट्रात १२ लाख ४ हजार ३१० हेक्टर क्षेत्र हे सेंद्रिय शेतीखाली होते. त्यातून ७ लाख ९० हजार मेट्रिक टन उत्पादन घेण्यात आले. २०२१-२२ मध्ये राज्यात ११ लाख ३३ हजार हेक्टरमधून ६ लाख ९१ हजार मेट्रिक टन सेंद्रिय खतांचे उत्पादन घेण्यात आले.

रासायनिक खतांचा वापर किती?

महाराष्ट्रात रासायनिक खतांचा वापर वाढला आहे. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार २०२३-२४ या वर्षात खरीप आणि रब्बी हंगामात ६४.५७ लाख मेट्रिक टन रासायनिक खतांचा वापर झाला. प्रति हेक्टरी वापर हा १०८ किलोग्रॅमपर्यंत आहे. शेणखतासारख्या सेंद्रिय खतांची उपलब्धता कमी झाली आहे. सेंद्रिय खते विकत घेऊन सर्व पिकांना देणे शक्य होत नाही. अनेक शेतकरी सेंद्रिय खतांच्या शिफारशींकडे दुर्लक्ष करून रासायनिक खत वापरताना दिसतात. परिणामी जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वेगाने कमी होत गेले. त्यातून पिकांना खतांमधील घटक शोषण्यात मदत करणाऱ्या सूक्ष्मजीवांची संख्याही कमी झाली आहे. त्यामुळे केवळ रासायनिक खतांच्या वापरातून चांगले उत्पादन मिळणेही कमी झाले आहे.

सेंद्रिय खतांचे महत्त्व काय?

सेंद्रिय पदार्थ हे वनस्पतींची पाने, फांद्या इत्यादी भागांपासून तयार होतात. याबरोबर प्राण्यांचे अवशेषही त्यात भर घालतात. सेंद्रिय पदार्थांमुळे मातीच्या कणांची रचना दाणेदार आणि स्थिर होते, त्यामुळे जमिनीची जलधारणशक्ती वाढते. निचरा चांगला होतो आणि हवा खेळती राहते. जमिनीची धूपही कमी होते. या खतांमुळे हवेतील नत्र स्थिरीकरण करणाऱ्या जमिनीतील जिवाणूंची संख्या वाढते. नत्राचे प्रमाण वाढण्यास मदत होते. शेतातील वाया जाणारा पालापाचोळा, काडीकचरा इत्यादींचाही सेंद्रिय खत म्हणून वापर करता येऊ शकतो. पण याकडे दुर्लक्ष होत आहे.

सरकारच्या योजना कोणत्या?

परंपरागत कृषी विकास योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्याचे कार्य करीत आहे. सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून थेट मदत दिली जाते. त्यात उत्पादन ते प्रक्रिया, पिकांच्या काढणीपश्चात व्यवस्थापनाचा समावेश आहे. सेंद्रिय खतांच्या उत्पादनासाठी पायाभूत सुविधा, गांडूळ खताच्या उत्पादनासाठी बेड, निंबोळी तेल, अर्क, पेंड, जैव खते, कचरा विघटन करणारे घटक इत्यादी निविष्ठांच्या खरेदीसाठी व्यवस्था आणि सेंद्रिय शेतीसाठी प्रशिक्षण आणि क्षमता वाढ हा या योजनेचा उद्देश आहे. सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने तीन वर्षांच्या कालावधीसाठी प्रति हेक्टर अनुदानही दिले जाते, असे सरकारचे म्हणणे आहे.
mohan.atalkar@expressindia.com

Story img Loader