पाकिस्तानकडून सीमावर्ती भागात अनेकदा वेगवेगळ्या प्रकारची आगळीक करण्यात येत असते. भारतीय सैन्यदल पाकिस्तानच्या प्रत्येक आगळीकीला नेहमीच चोख प्रत्युत्तर देत आले आहे. यावेळी मात्र पाकिस्तानने अतिशय विचित्र आणि धक्कादायक असे पाऊल उचलले असून, त्याची दखल सुरक्षा यंत्रणांनी घेतली आहे. पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेकडून सैनिकी शाळांमधील विद्यार्थ्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. देशातील लष्करी शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पाकिस्तानी इंटेलिजन्स ऑपरेटिव्हज (PIOs) या संस्थेकडून फोन आणि व्हॉट्सॲप मेसेजेस करून सोशल मीडियावरील ग्रुप्स जॉईन करण्यास सांगितले जात आहे. विद्यार्थ्यांनी हे ग्रुप जॉईन केल्यानंतर त्यांच्याकडून संवेदनशील माहिती काढून घेण्याचा प्रयत्न केला जातो.
शिक्षक असल्याचा बनाव करून विद्यार्थ्यांना शाळेच्या नवीन ग्रुपमध्ये सहभागी होण्यासंबंधी मेसेजेस आणि ओटीपी पाठविले जातात. एकदा का विद्यार्थी या ग्रुपचा सदस्य झाला की, त्यानंतर त्याच्याकडून संवेदनशील माहितीची मागणी होते, अशी बातमी पीटीआय या वृत्तसंस्थेने दिली. ‘पीआयओ’चे गुप्तचर विद्यार्थ्यांना फोन आणि मेसेजेस करून, त्यांच्या ओळखीचा एखादा संदर्भ देऊन आपण शिक्षकच आहोत, असा आभास निर्माण करतात. त्यामुळे विद्यार्थीही संभ्रमात पडून त्यांना शिक्षक समजतात आणि ग्रुपमध्ये सहभागी होतात. विद्यार्थी एकदा संपर्कात आला की, त्याच्याकडून कुटुंब, इतर शिक्षक आणि त्यांच्या दैनंदिन दिनक्रमाची माहिती गोळा करण्यात येते. ही बाब समोर आल्यानंतर शाळा आणि महाविद्यालयांनी सर्व व्हॉट्सॲप ग्रुप बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सैन्य अधिकारीही शाळा आणि महाविद्यालयाच्या संपर्कात असून, खबरदारीचे उपाय योजले जात आहेत, तसेच विद्यार्थ्यांना अशा हेरगिरीबाबत जागरूक करण्यात येत आहे. फर्स्टपोस्ट या वेबसाइटने याबाबतचा सविस्तर आढावा घेतला आहे.
हे वाचा >> पुण्यातील संगणक अभियंता पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या संपर्कात
संवेदनशील माहितीची मागणी
‘द इंडियन एक्स्प्रेस’ने दिलेल्या माहितीनुसार, विशेषकरून दोन मोबाईल नंबरवरून विद्यार्थ्यांना फोन आणि व्हॉट्सॲप मेसेजेस येत असल्याचे ‘आर्मी वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी’ने निदर्शनास आणून दिले आहे. पाकिस्तानी इंटेलिजन्स ऑपरेटिव्हजमार्फत सोमवार (२४ जुलै)पासून दोन मोबाईल क्रमाकांवरून फोन आणि मेसेज येत आहेत, अशी माहिती सुरक्षा यंत्रणेच्या हवाल्याने ‘हिंदुस्तान टाइम्स’ने दिली आहे. ‘पीआयओ’कडून विद्यार्थ्यांना त्यांच्या वडिलांची नोकरी, शाळेचे वेळापत्रक, शिक्षकांची नावे, गणवेश याबाबत माहिती विचारण्यात येत असल्याचे सैनिक सार्वजनिक शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितले आहे.
सीमाभागातल्या शालेय संस्थांतील विद्यार्थ्यांना लक्ष्य करण्याचे प्रमाण अधिक आहे. सीमावर्ती भागात सीमेपलीकडून घुसखोरीचे प्रमाणही अधिक असते. पाकिस्तानमधील सायबर हॅकर्स स्वतःच्या फायद्यासाठी सीमावर्ती भागातील विद्यार्थ्यांशी जवळीक साधून गंभीर आणि संवेदनशील माहिती मिळवताना दिसत आहेत.
आणखी वाचा >> “तर मी माझ्या मुलांसोबत…” सीमा हैदर पाकिस्तानी गुप्तहेर आहे? आरोप करणाऱ्यांना सचिनच्या प्रेयसीने दिलं उत्तर, म्हणाली…
दक्ष राहण्याचे आवाहन
जम्मू आणि काश्मीरमधील सुरक्षा आस्थापनांनी शेजारी देशाच्या या नव्या पद्धतीवर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. शाळा आणि महाविद्यालयांतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांना याबाबत जागरूक राहण्याची विनंती त्यांनी केली आहे. आपल्या मुलांना कोणते फोन येत आहेत, याबाबत पालकांनीही जागृत राहावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. भारतीय लष्कराचे प्रवक्ते म्हणाले, “आम्ही या प्रकरणी बारकाईने नजर ठेवून आहोत. संबंधित संस्थांशी समन्वय साधून, या सायबर हल्ल्याला आम्ही निश्चितच परतवून लावू. ऑनलाईन असताना काय काळजी घेतली पाहिजे? इंटरनेटवर कसा वावर असायला हवा? याबद्दल पालक आणि शाळांनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करावे.”
‘इंडिया टीव्ही’ने दिलेल्या बातमीनुसार, दिल्ली आणि उत्तर प्रदेशमधल्या सैनिकी शाळांतील विद्यार्थ्यांनाही अशा प्रकारचे फोन आले आहेत.